आगामी काळात ‘दिशा’ कायदा सक्षमपणे पारित होणे गरजेचा ः भदाणे
आगामी काळात ‘दिशा’ कायदा सक्षमपणे पारित होणे गरजेचा ः भदाणे
संगमनेर जिजाऊ ब्रिगेडतर्फे कोविड योद्धा पुरस्काराचे वितरण
नायक वृत्तसेवा, संगमनेर
देशात महिलांवर होणारे अन्याय अत्याचार क्लेशदायक तेवढेच चिंताजनक आहेत. मात्र नकारात्मक मानसिकता यास कारणीभूत आहे. आगामी काळात ‘दिशा’ कायदा सक्षमपणे पारित होणे गरजेचे आहे. महिलांवर होणार्या अन्याय-अत्याचार विरोधात लढा देण्यासाठी देशातील सर्वात मोठ्या महिलांच्या जिजाऊ ब्रिगेड संघटनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिजाऊ प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे यांनी केले.
संगमनेर येथील जिजामाता विद्यालय येथे जिजाऊ ब्रिगेड आढावा बैठक व भारतातील पहिल्या महिला डॉक्टर रखमाबाई राऊत जयंतीनिमित्त महिला डॉक्टरांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगमनेर जिजामाता स्कूलचे संस्थापक मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक माणिक शेवाळे होते, प्रमुख अतिथी मराठा सेवा संघ विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे, संघटक सुधाकर थोरात, संभाजी ब्रिगेड अध्यक्ष मांजाबापू गुंजाळ, डॉ.राहुल शेवाळे, संपत देशमुख, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षा डॉ.दीपाली पानसरे, जिल्हा उपाध्यक्षा डॉ.श्रद्धा वाणी, सचिव स्नेहलता कडलग, अकोले तालुकाध्यक्षा उज्ज्वला देशमुख, उपाध्यक्षा माधुरी शेवाळे, शोभा गुंजाळ उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रदेशाध्यक्षा भदाणे म्हणाल्या कि, सुशिक्षित महिलांमधील अंधश्रद्धा, कर्मकांड सर्वात धोकेदायक आहे. मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड सातत्याने यावर प्रबोधन करत आहे. सर्वच महिला, महापुरुषांचा इतिहास समाजासमोर आणून चांगला देश घडविण्याची जबाबदारी महिलांवर आहे. एक महिला चांगले कुटुंब, समाज, गाव, देश घडवू शकते म्हणून महिलांचे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सक्षमीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी गाव तेथे जिजाऊ ब्रिगेडची शाखा स्थापन करावी असे आवाहन करत संगमनेर जिजाऊ ब्रिगेडचे कार्य कौतुकास्पद असल्याचे भदाणे यांनी आवर्जुन नमूद केले.
दरम्यान कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ, डॉ.रखमाबाई राऊत यांच्या प्रतिमचे पूजन करून झाली. यावेळी तालुका उपाध्यक्षा माधुरी शेवाळे यांनी जिजाऊ वंदना गायन केली. प्रास्ताविक जिल्हाध्यक्षा डॉ.पानसरे यांनी केले. सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्षा डॉ.वाणी यांनी केले.
नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांची सदिच्छा भेट घेत जिजाऊ ब्रिगेडच्या ऑनलाईन आंतरराष्ट्रीय अधिवेशनाची पुस्तिका देण्यात आली. तसेच आगामी काळात जिजाऊ ब्रिगेडच्या होणार्या उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. तर कोरोना संकटकाळात उत्कृष्ट वैद्यकीय सेवा देणार्या संगमनेर शहरातील डॉ.जयश्री दातीर, डॉ.शामा पाटील आणि डॉ.उज्ज्वला जठार यांचा जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे यांच्या हस्ते मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक, प्रबोधनात्मक ग्रंथ व डॉ.रखमाबाई राऊत यांची प्रतिमा देवून सन्मान करण्यात आला. तसेच उत्सव नवदुर्गा कार्यक्रमात उत्कृष्ट नियोजन करणार्या बंदावणे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.