घोडेगाव चौफुला येथे दोन तास रास्ता रोको आंदोलन मुळा धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यास विरोध

नायक वृत्तसेवा, नेवासा
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाला नाशिकनंतर अहमदनगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शवला आहे. अहमदनगरच्या मुळा धरणातून मराठवाड्याच्या जायकवाडी धरणात पाणी सोडू नये या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर घोडेगाव चौफुला येथे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (ता.२) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तब्बल दोन तास हे आंदोलन सुरू होते.

चालू वर्षी मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरलेलं नाही. तसेच मुळा धरणाच्या लाभक्षेत्रातही पुरेसा पाऊस झालेला नाही. विहिरी आणि बोअरवेलच्या पाण्याची पातळी खालावली आहे. अशा परिस्थितीत अहमदनगर जिल्ह्यातल्या मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरणांची वस्तुस्थिती माहिती असतानाही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या अधिकार्यांनी मुळा धरणातून २.१० टीएमसी पाणी जायकवाडीला सोडण्याचा घेतलेला निर्णय एकतर्फी असल्याचे आमदार शंकरराव गडाख यांनी म्हटलं आहे.

दरम्यान नगर-नाशिक जिल्ह्यातील पाणी मराठवाड्याला मिळावे यासाठी मराठवाड्यातील नेते एकत्रित येतात. मात्र नगर-नाशिकचे नेते एकत्र येताना दिसत नाही अशी खंतही गडाख यांनी व्यक्त केली. नाशिकचे नेते एकत्रित येतील की नाही माहिती नाही पण अहमदनगर जिल्ह्यातील नेत्यांनी एकत्र यायला हवं आणि समन्यायी पाणी वाटपाबाबत पुनर्विचार व्हायला हवा अशी मागणी देखील माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी केली आहे.
