भंडारदरा पाणलोटात कोसळताहेत हलक्या सरी शेतकर्‍यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम


नायक वृत्तसेवा, अकोले
उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरात गायब झालेला मान्सून पुन्हा सक्रीय झाला असून पाणलोटात अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळू लागल्या आहेत. पाऊस पुन्हा पडता झाल्याने पाणलोटातील शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. ११०३९ दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणातील पाणीसाठा सोमवारी (ता.२१) सायंकाळी १०७३५ दलघफू (९७.३५ टक्के) झाला आहे.

निळवंडेत धरणातही ६९३३ दलघफू पाणीसाठा झाला आहे. या धरणातून प्रवरा नदीपात्रात १५७० क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. पाणलोटात पाऊस कमी झाल्याने चार-पाच दिवसांपासून आवक कमालीची घटली होती. परंतु रविवारपासून पावसाचा जोर काहीसा वाढलेला आहे. घाटघरमध्ये २८ मिलीमीटर तर रतनवाडीत २५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत भंडारदरात ९८ दलघफू तर निळवंडेत ११७ दलघफू नवीन पाण्याची आवक झाली आहे. भंडारदरात दिवसभर अधूनमधून सरी कोसळत असून, १६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाळी वातावरण टिकून असून मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.

मुळा पाणलोटातून पावसाने काढता पाय घेतला होता. पण या पाणलोटातही अधूनमधून पाऊस कोसळत आहे. दरम्यान, जिल्ह्यातून पाऊस गायब झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. आणखी काही दिवस पाऊस न पडल्यास भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या काही शेतकरी तुषार पद्धतीने पाणी देऊन पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *