‘एफआयटी’साठी धनश्री व वसुंधरा यांची निवड

नायक वृत्तसेवा, संगमनेर
भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालय अंतर्गत असलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमधून (निफ्ट) पदवीधर असलेल्या धनश्री सुनील कडलग व वसुंधरा धमेजा या विद्यार्थिनींची न्यूयॉर्कमधील जगतविख्यात फॅशन इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी (एफ. आय. टी.) या शैक्षणिक संस्थेत पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड झाली असून त्या नुकत्याच अमेरिकेसाठी रवाना झाल्या आहेत. संपूर्ण जगभरातून या अभ्यासक्रमासाठी दरवर्षी केवळ 15 विद्यार्थ्यांचीच निवड करण्यात येते.

संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील रहिवासी व येथील कडलग इन्व्हेस्टमेंटचे संचालक, आर्थिक सल्लागार सुनील कडलग व उपक्रमशील शिक्षिका वृषाली कडलग यांची धनश्री ही कन्या आहे. धनश्री हिची अचंबित करणारी शैक्षणिक कामगिरी युवा वर्गाला निश्चितच प्रेरणादायी आहे. एखाद्या विद्यार्थ्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिउच्च दर्जा धारण केलेली व जगाला दरवर्षी आंतरराष्ट्रीय ख्यात्तीचे 15 फॅशन डिझायनर देणार्या शैक्षणिक संस्थेने या दोन्ही विधार्थिनींना प्रवेश देण्यासाठी सन्मानाने निमंत्रित करणे निश्चितच गौरवास्पद आहे. फॅशन इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी न्यूयॉर्कमध्ये उच्च शिक्षण घेण्याची संधीची कदाचित ही अद्वितीय घटना असावी. आई-वडीलांना विश्वासात घेऊन शिक्षणतज्ज्ञ डॉ.संजय मालपाणी यांच्या मार्गदर्शनाने जागतिक पातळीवरील ख्यातनाम चित्रकार अनुराधा ठाकूर (अहमदनगर), विख्यात चित्रकार प्रा.दीपक वर्मा (नाशिक) आणि पहल इन्स्टिट्यूटच्या निधी मिथिल (पुणे), चित्रकार प्रशांत सोमवंशी (संगमनेर) यांचे मार्गदर्शन घेऊन धनश्रीने फॅशन डिझायनिंग हे करिअरचे सृजनात्मक असे क्षेत्र निवडून निफ्टची प्रवेश परीक्षा दिली. या प्रवेश परीक्षेतही तीने देशपातळीवर 61 वे स्थान पटकाऊन सर्वांना अचंबित केले.
