आदिवासी संस्कृती, रुढी व परंपरा टिकवणे काळाची गरज ः बरोरा चिंचोडी येथील भैरवनाथ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात
नायक वृत्तसेवा, अकोले
आदिवासी समाजावर वेगवेगळ्या पद्धतीने सातत्याने सामाजिक हल्ले होत असून धनगर समाज हा आदिवासी समाजाच्या आरक्षणावर डोळा ठेऊन आहे. धनगर समाज आणि आदिवासी समाज हे दोन्ही समाजातील घटक हे वेगवेगळे आहेत हे टाटा संस्थेच्या अहवालात स्पष्ट झाले असून सुध्दा भाजपचे काही लोक या दोन्ही समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न राजकीय स्वार्थासाठी करत आहे. ठाकरे सरकार हे सर्व सामान्य नागरिकांचे सरकार असून या राज्यातील एकाही समाजावर अन्याय होणार नाही याचा विश्वास आहे. आदिवासी समाजाच्या आरक्षणाला कोणताही प्रकारचा धक्का लागणार नाही. आपण जागृत रहाणे ही काळाची गरज असून आपल्या आदिवासी समाजाच्या रुढी, परंपरा, चालीरिती व संस्कृती टिकवण्यासाठी आपण एकसंघ रहाणे ही काळाची गरज असल्याचे मत शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी केले आहे.
अकोले तालुक्यातील चिंचोडी येथे महाराष्ट्रातील आदिवासी ठाकर समाजातील मधे आडनावाच्या कुळाचे कुलदैवत श्री भैरवनाथाचे मंदिर आहे. राज्यातील मधे आडनावाचे नागरिक चिंचोंडी येथे धार्मिक कार्यक्रमानिमित्ताने दीड वर्षातून एकदा एकत्र येत असतात. या निमित्ताने गतवर्षी देखील मधे आडनावाच्या कुळातील हजारो नागरिक येथे आले होते. नुकताच या मंदिरात जागरणाचा कार्यक्रम झाला. यावेही वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आदिवासी समाजाची खरी रुढी, परंपरा, चालीरिती व संस्कृती टिकवण्याचे काम अकोले तालुक्यातील घाटघर, पांजरे, उडदावणे, चिचोंडी या परिसरातील प्रमुख गावांमध्ये दिसून येते. वेगवेगळ्या सामाजिक, धार्मिक, लग्न सोहळा, दशक्रिया विधी या उपक्रमांमध्ये या जुन्या पद्धती दिसून येतात. काळाच्या ओघात महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी या जुन्या पद्धती नामशेष होत चालल्या आहेत. मात्र त्या परंपरा जोपासण्याचे काम आपण करत असून या चालीरिती, परंपरा कायम टिकवण्यासाठी आपली एकी कायम ठेवा. समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी या परिसरात पर्यटनाच्या व्यवसायाच्या माध्यमातून मोठी संधी आहे. घाटघर, चोंढे, शहापूर, मुंबई हा रस्ता होण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे. मागील काही दिवसांपूर्वी या रस्त्याची पाहणी केली आहे. हा रस्ता होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे साकडे घातले असून लवकर हा प्रश्न मार्गी लागण्याचे संकेत त्यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितले.
माजी उपसभापती मारुती मेंगाळ म्हणाले, राज्यातील आदिवासी समाजाचे हक्क, अधिकार, आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी समाजाला एकत्र ठेवणे ही काळाची गरज आहे. आपल्या समाजाच्या जुन्या पद्धती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. आपल्या जुन्या पद्धती नामशेष झाल्या तर भविष्यात आपले आरक्षण धोक्यात येईल, यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेऊन आपल्या समाजाच्या जुन्या रुढी, परंपरा, चालीरिती व संस्कृती टिकली पाहिजे. यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. अकोले तालुक्यात आदिवासी ठाकर समाजाची मोठी लोकसंख्या आहे. अनेक कुळांचे कुलदैवत आपल्या तालुक्यात आहेत. यानिमित्ताने हजारो लोक तालुक्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. याप्रसंगी माजी आमदार पांडुरंग गांगड, संदीप मेंगाळ, सुधाकर मेंगाळ, भरत गिर्हे, हनुमंता पथवे, चिमाजी मधे, सोमा मधे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.