संगमनेरचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांना बढती! पोलीस ठाण्याची खुर्ची पुन्हा रिकामी; खमक्या अधिकार्‍याची प्रतिक्षा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अवघ्या आठवड्याभरापूर्वीच संगमनेर शहर पोलीस ठाण्याचा पदभार हाती घेणार्‍या वरीष्ठ पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांना स्थीर होण्यापूर्वीच बढतीवर नाशिकला धाडण्यात आले आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर संवेदनशील समजल्या जाणार्‍या संगमनेर शहर पोलीस ठाण्याला नव्या प्रभारी अधिकार्‍यांची प्रतिक्षा करावी लागणार आहे. पोलीस अधिक्षकांनीही यापूर्वीच जिल्हातंर्गत बदल्यांची प्रक्रिया उरकल्याने संगमनेरला कोण लाभणार याविषयी आता नव्याने चर्चा रंगल्या आहेत. गेल्या काही कालावधीपासून बिघडलेले संगमनेरचे सामाजिक स्वास्थ पाहता शहराचा पदभार एखाद्या खमक्या अधिकार्‍याकडे देण्याची गरज असून यापूर्वी संगमनेरच्या कायदा व सुव्यवस्थेचा चांगला परिचय असलेल्या नितीनकुमार चव्हाण यांच्यासारख्या अधिकार्‍याकडे संगमनेर सोपवण्याची मागणीही पुढे आली आहे.


गेल्या आठवड्यात सोमवारी (ता.12) जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर एकाच ठिकाणचा कार्यकाळी पूर्ण करणार्‍या जिल्ह्यातील 16 पोलीस निरीक्षकांसह अकरा सहाय्यक व दहा उपनिरीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकार्‍यांची जिल्ह्यातंर्गत बदली केली होती. त्यानुसार येथील कार्यकाळ पूर्ण करणार्‍या पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांची कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तर, नियंत्रण कक्षातील बापूसाहेब महाजन यांची त्यांच्या जागी संगमनेरच्या पोलीस निरीक्षकपदी नियुक्ति झाली होती. त्यानंतर मंगळवारी (ता.13) त्यांनी मथुरे यांच्याकडून पोलीस ठाण्याचा पदभार घेत शहराची सूत्र हाती घेतली. त्यांनी पदभार घेतल्यापासूनच शहरातील सर्वच रस्ते वाहनांनी तुंबले, त्यामुळे गुन्हेगारीचा आलेख पाहण्यापूर्वीच त्यांना भरपावसात छत्री हातात घेत रस्त्यावर उतरावे लागले.


त्यातून शहराची जटील झालेली वाहतूक व्यवस्था समजून घेत असतानाच मंगळवारी (ता.20) रात्री उशिराने राज्य शासनाच्या गृहविभागाने वरीष्ठ पोलीस निरीक्षक (निःशस्त्र) श्रेणीतील राज्यातील 82 अधिकार्‍यांना बढती देत त्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यात जेमतेम आठवड्यापूर्वीच संगमनेर शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारणार्‍या पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांनाही बढतीवर नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत (प्रशिक्षण केंद्र) धाडण्यात आले. त्यामुळे अवघ्या आठ दिवसांतच संगमनेर शहर पोलीस ठाण्याची खुर्ची रिकामी झाली आहे.


त्यातच पोलीस अधिक्षकांनी यापूर्वीच जिल्ह्यातंर्गत बदल्यांची प्रक्रियाही पूर्ण केल्याने आता महाजनांची जागा कोण घेणार याविषयीच्या नव्या चर्चांना शहरात सुरुवात झाली आहे. मात्र त्यासोबतच शहराची बिघडलेली सामाजिक व्यवस्था, गेल्याकाही कालावधीत झालेले पोलिसांची प्रतिमा खराब करणारे आरोप आणि वाढलेला गुन्हेगारीचा स्तर यांचा विचार करुन संगमनेरच्या निरीक्षकपदी एखाद्या खमक्या पोलीस निरीक्षकांची नियुक्ति करावी अशी मागणी होवू लागली आहे. संगमनेरच्या पोलीस दलाची बूज राखून धरणार्‍या उपअधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांचीही बदली दृष्टीपथात असल्याने व आगामी गणेशोत्सवाचा विचार करुन पोलीस अधिक्षकांनी संगमनेरचा पदभार एखाद्या खमक्या पोलीस निरीक्षकांकडे देण्याची गरज आहे.


सध्या जिल्ह्यात असलेल्या पोलीस निरीक्षकांमध्ये आर्थिक गुन्हेशाखेचा पदभार देण्यात आलेले नितीनकुमार चव्हाण यांना संगमनेर शहर पोलीस ठाण्याचा यापूर्वीचा उनभव आहे. 2015 साली त्यांनी श्यामकांत सोमवंशी यांच्यानंतर शहराच्या निरीक्षकपदाची सूत्रे घेताना शहरातील गुन्हेगारांवर वचक निर्माण करतानाच पोलीस ठाण्यातील राजकीय दलालांची संख्या शून्यावर आणली होती. राज्यात संगमनेरची बदनामी करणार्‍या गोवंश कत्तलखान्यांबाबतही त्यांनी स्वीकारलेले कठोर धोरण आजही शहरात चर्चिले जाते. त्यांच्यासारख्या खमक्या अधिकार्‍याला आर्थिक शाखेऐवजी संगमनेरचा पदभार द्यावा अशीही चर्चा आता सुरु झाली आहे. त्यावर पोलीस अधिक्षक काय निर्णय घेतात हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.


जिल्ह्यात संगमनेर शहर नेहमीच संवेदनशील समजले गेले आहे. त्यामुळे येथील पोलीस ठाण्यात वरीष्ठ पोलीस निरीक्षकांचीच नियुक्ति करण्याचा प्रघात आहे. त्यातही जायकवाडी धरणाची स्थिती पाहता यंदाही गणेशोत्सवात विसर्जनासाठी वाहत्या पाण्याचा विषय समोर येण्याची दाट शक्यता असल्याने संगमनेरला धाडशी आणि खमक्या अधिकार्‍याची गरज भासणार आहे. सध्या जिल्ह्यात नितीन चव्हाण यांच्यासह पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांचासारखा धडाकेबाज अधिकारीही नियंत्रण कक्षातच आहे. संगमनेरची नियुक्ति करताना अशाच एखाद्या खमक्या पोलीस निरीक्षकाची नियुक्ति व्हावी अशी संगमनेरकरांना अपेक्षा आहे.

Visits: 19 Today: 2 Total: 80186

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *