शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभय परमार ‘अखेर’ नियंत्रण कक्षातच! राहुरीचे निरीक्षक मुकूंद देशमुख संगमनरचे नवे प्रभारी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांना अखेर आज मुहूर्त लागला. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आज जिल्ह्यातील नऊ पोलीस ठाण्यांच्या प्रभार्यांमध्ये फेरबदल केले. सुरुवातीला ‘एलसीबी’च्या शर्यतीत असलेले संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभय परमार यांना अपेक्षेप्रमाणे नियंत्रण कक्षात बोलावण्यात आले आहे. परमार यांना ‘नियंत्रण कक्षातच’ जावे लागेल असे दैनिक नायकने परवाच्या वृत्तात ठळकपणे नमूद केले होते, त्यावर आज पोलीस अधीक्षकांनी शिक्कामोर्तब केले. परमार यांच्यासह जामखेडच्या निरीक्षकांनाही मुख्यालयाचं आवतणं धाडण्यात आले आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यासाठी राहुरीचे निरीक्षक मुकूंद देशमुख यांची नियुक्ति करण्यात आली आहे.

पोलीस उपअधीक्षक, सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक अशा सर्व दर्जाच्या अधिकार्यांची बदली प्रक्रीया पूर्ण होवूनही पोलीस ठाण्यांच्या प्रभारी बदलाची प्रक्रीया प्रतिक्षित होती. आज अखेर त्याला मुहूर्त मिळाला. जिल्ह्यातील सर्वाधीक ‘क्रीम’ पोलीस ठाणे म्हणून संगमनेर शहर पोलीस ठाण्याकडे बघितले जाते. येथे येण्यासाठी वरदहस्ताची नितांत गरज असते. मात्र यावेळी कडव्या शिस्तीचे अधिकारी म्हणून परिचित झालेल्या पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी ‘अपवाद’ वगळता दबाव झुगारुन आपल्या निकषांतूनच आजच्या बदल्या केल्याचे आदेशातून दिसून येते.
पोलीस निरीक्षकांसह आज सहाय्यक निरीक्षक दर्जाच्या चौघा अधिकाऱ्यांच्याही नियुक्त्या जाहीर झाल्या, त्यात गुटखा प्रकरणाने अचानक राज्याच्या पटलावर आलेल्या श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पवार यांना लोणीत धाडण्यात आले आहे. राहुरी पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक सचिन बागुल यांना शनी शिंगणापूरच्या सेवेत पाठविण्यात आले आहे. जिल्ह्यात नव्याने आलेले रामचंद्र कर्पे यांना सोनई पोलीस ठाणे देण्यात आले आहे तर लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रकाश पाटील यांना अहमदनगर शहर वाहतुक शाखेत नियुक्ति देण्यात आली आहे.
अकोल्यातील कारकीर्दीत संगमनेरशी जवळून संबंध आलेले पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख धाडसी आणि चाणाक्ष अधिकारी म्हणून पोलीस दलात परिचित आहेत. काही प्रकरणांची त्यांनी केलेली उकल त्यांच्या तपासाच्या वेगळ्या पद्धतीला दर्शविणारी आहे. संगमनेर शहरात फोफावलेले अवैध व्यवसाय, गुन्हेगारीचा वाढलेला स्तर याशिवाय राज्यातील राजकारणाचा मुख्य चेहरा असलेल्या नेत्याच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा दबाव अशा सगळ्याच बाबींना ते कशा पद्धतीने हाताळतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
सुरुवातीला संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभय परमार एलसीबीसाठी प्रचंड प्रयत्नशील होते. त्यासाठी त्यांनी अगदी शर्थीचे प्रयत्न करतांना राजकीय उंबरेही झिझवले. त्यात त्यांना काही अंशी यश येत आहे असे वाटत असतांना, त्यांच्याच अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक राणा प्रतापसिंह परदेशी यांना तब्बल एक लाख रुपयांची लाच घेतांना नाशिकच्या एसीबीने रंगेहात पकडल्याने परमारांचे मनसुबे धुळीस मिळाले. हे प्रकरण आपल्यावर शेकणार याचा अंदाज आल्याने संगमनेरातील मुक्काम वाढवून मिळण्याची दरखास्त घेवून त्यांनी गेल्या काही दिवसांपासून एका मंत्र्याला ‘मुजरे’ घालण्याचाही प्रयोग करुन पाहीला. पण त्यातही त्यांना अपयशच आले.

कोपरगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश मानगावकर यांना नगरच्या कोतवालीत नियुक्ति देण्यात आली आहे. कोतवालीचे निरीक्षक प्रवीण लोखंडे यांना शिर्डीचा पदभार देण्यात आला आहे. साई मंदिराच्या सुरक्षेत असलेल्या पो.नि.हनुमंत गाढे यांचे भाग्य उजळले असून त्यांना पुन्हा राहुरी पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. राहुरीत असतांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकलेल्या अविनाश शिळीमकर यांना अहमदनगर शहर वाहतुक शाखेची तर नियंत्रण कक्षातील निरीक्षक सुहास चव्हाण यांना आर्थिक गुन्हे शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे.

