संगमनेरच्या सराफा बाजारात ‘एलसीबी’च्या वाहनाचा धुरळा! मोठं घबाड नेल्याची चर्चा; कारवाईमागील ‘गुपित’ मात्र संशयास्पद..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील सर्वच गुन्हेगार व अवैध व्यावसायिकांवर आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी वाट्टेल ते करणार्‍या स्थानिक गुन्हे शाखेच्या वाहनांनी सोमवारी संगमनेरच्या सराफा बाजारात मोठा धुरळा उडवला. त्यातून वेगवेगळ्या चर्चांना आता पेव फुटले असून चोरीचे सोने घेणार्‍या व्यापार्‍यांशी तडजोड करण्यासाठीच ही करामत राबविली गेल्याची जोरदार चर्चा सध्या शहरात सुरु आहे. सोमवारी सायंकाळी अशोक चौक ते चावडी आणि उपनगरातील एक अशा एकूण चार सुवर्णपेढ्यांमध्ये एलसीबीचे कर्मचारी दिसून आले. त्यांच्याकडून नेमकी कोणत्या प्रकरणाची चौकशी करण्यात आली हे मात्र कारवाईला तीन दिवस उलटूनही कळू शकलेले नाही. मात्र पथकाने गावठाण आणि उपनगरातील सुवर्ण पेढ्यांमधून शेकडों ग्रॅम वजनाचे सोने जप्त केल्याची चर्चा सोनारांमध्ये सुरु आहे. या प्रकारातून ‘एलसीबी’च्या कारनाम्यात आता आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे.

याबाबत सुरु असलेल्या चर्चेतून सोमवारी (ता.३०) अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) संगमनेरच्या सराफा बाजारात छापा घातला. यावेळी अशोक चौक ते चावडी चौक या अंतरातील तीन मोठ्या सुवर्णपेढ्यांमध्ये जोरदार तपासणी आणि चौकशीही करण्यात आली. जवळपास दोनतास सुरु असलेल्या या कारवाईची वार्ता काही वेळातच शहरभर पसरल्याने वेगवेगळ्या चर्चाही सुरु झाल्या. कारवाई पूर्ण झाल्यानंतर सदरील पथकाचे वाहन तेथून सुसाट वेगाने निघूनही गेले, मात्र त्यांनी पाठीमागे उडवलेल्या धुरळ्यात आपल्या सोबत शेकडों ग्रॅम वजनाचे सोनेही जप्त करुन नेल्याची चर्चा मागे सोडली. असाच प्रकार शहरालगतच्या अतिउच्चभ्रू भागातही घडला.

उपनगरात मोडणार्‍या या परिसरातील एका मोठ्या सुवर्णपेढीवरही याच शाखेच्या पथकाने छापा घातला. तेथेही दीड-दोनतास त्या सुवर्णकाराची कसून चौकशी केल्यानंतर त्याच्याकडूनही मोठ्या प्रमाणात (जवळपास तीनशे ग्रॅम) सोने हस्तगत करण्यात आल्याची जोरदार चर्चा सध्या संगमनेरच्या सुवर्णपेठेत सुरु आहे. संगमनेर शहराचा गावठाण आणि उपनगरीय भाग अशा एकूण चार सुवर्णपेढ्यांमध्ये सदरची कारवाई करण्यात आली. त्यातून तपास पथकांनी आपल्यासोबत सोनेही नेल्याची चर्चा सुरु झाल्याने स्थानिक गुन्हे शाखा दिवाळीच्या तोंडावर तपासाचा काहीतरी नवा ‘धमाका’ करेल असे वाटत असतांना या कारवाईला तीन दिवस उलटूनही काहीच समोर येत नसल्याने सदरची कारवाई संशयास्पद असल्याचे भासू लागले आहे.

वास्तविक चोरी, घरफोडी अथवा सोनसाखळ्या लांबविण्याच्या प्रकारात चोरट्यांनी लांबविलेले सोने कोठेतरी सोनारालाच विकलेले असते. त्यामुळे जेव्हा केव्हा असे चोरटे पोलिसांच्या हाती लागतात तेव्हा त्याच्या चौकशीतून त्याने त्यापूर्वी केलेली सगळी कृत्ये उघड होतात. अशावेळी चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी चोरट्याने तो माल ज्या दुकानदाराला विकलेला असतो त्याच्या दुकानावर छापा घातला जातो आणि मुद्देमाल हस्तगत केला जातो. सदरच्या प्रकरणातही असेच काहीतरी घडलेले असावे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमालही त्याच अनुषंगाने एखाद्या गुन्ह्याच्या तपासातून समोर आल्याने जप्त केला असण्याची शक्यता आहे.

मात्र मुद्देमाल जप्त केल्यानंतर त्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा पत्रकार परिषद बोलावून अथवा साचेबद्ध प्रसिद्धीपत्रक माध्यमांना पाठवून आपली पाठ थोपटवून घेण्यास कधीही विलंब करीत नाही. या प्रकरणात मात्र अद्यापपर्यंत असे काहीच घडलेले नाही. सोमवारी (ता.३०) रात्री संगमनेर शहरातील चार मोठ्या सुवर्णपेढ्यांवर कारवाई करीत शेकडो ग्रॅम वजनाचे सोने हस्तगत करण्यात आले, या घटनेला आज तीन दिवस उलटले आहेत. मात्र स्थानिक गुन्हे शाखेने अद्यापपर्यंत संगमनेरच्या कारवाईमागील सत्यताच दडवून ठेवल्याने सराफा बाजारासह नागरिकांमध्ये मोठा संशय निर्माण झाला आहे. स्थानिक गुन्हे शाखा अथवा पोलिसांकडून असे प्रकार नियमित असले तरीही यावेळी मात्र ‘एलसीबी’च्या वाहनांनी मोठा धुरळा उडवून दिल्याने या कारवाईच्या चर्चेचे कण अख्ख्या शहरात पसरले आहेत.


एकीकडे सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेने अद्याप गुलदस्त्यातच असलेल्या प्रकरणाची चौकशी करुन मोठे ‘घबाड’ सोबत नेल्याची चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे मंगळवारी असाच मात्र काहीसा दिलासादायक प्रकार घडल्याचेही समोर आले. या घटनेत पुणे पोलिसांनी चावडीवरील एका सुवर्णपेढीवर छापा घालीत त्याला ताब्यात घेतले आहे. गेल्या तीन दिवसांपासून तो त्यांच्याच ताब्यात असून पारनेर व संगमनेरातील एका डॉक्टरच्या घरात झालेल्या चोरीचा धागाही त्याच्या दुकानापर्यंत पोहोचत असल्याची नवीन चर्चाही शहरात सुरु आहे.

Visits: 28 Today: 1 Total: 119339

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *