उत्तर नगरमधील ‘या’ तालुक्यांत पावसाची मोठी घट पुढील महिन्यापासून पाणी टंचाईच्या झळा बसण्याची चिन्हे


नायक वृत्तसेवा, राहाता
जिल्ह्यात यंदा पावसाने बर्‍यापैकी हात आखडता घेतल्याने सरासरीच्या तुलनेत ७३.७ टक्केच पाऊस झालेला असून त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यात उन्हाळ्यात शेतीसाठी पाण्याचा प्रश्न भेडसावणार आहे. विशेषत: उत्तर जिल्ह्यातील श्रीरामपूर, राहुरी, राहाता, कोपरगाव, संगमनेर आणि नेवासा तालुक्यात सरासरीच्या ५५ ते २२ टक्के पावसाची घट आहे. यामुळे या तालुक्यांना पुढील महिन्यापासून पाणी टंचाईच्या झळा बसण्याची चिन्हे दिसू लागली आहे. मात्र, अकोले तालुक्यात सरासरीच्या १०६ ते ९१ टक्के पावसाची नोंद आहे.

यावर्षी जिल्ह्यात सुरूवातीपासून पावसाचा मोठा खंड पाहावयास मिळाला. जून महिन्यात जेमतेम पाऊस झाला. जुलैनंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत पावसाचा मोठा खंड होता. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या कालावधीत जिल्ह्यात टप्प्याने सर्वदूर पावसाची नोंद झाली. विशेष नगर शहर आणि तालुक्यातील काही भागात आणि पारनेर तालुक्यात अनेक ठिकाणी कमी कालावधीत जादा पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. मात्र, पावसाचा हा कालावधी कमी होता. त्यानंतर पावसाने उघडीप दिली आणि ऑक्टोबरच्या सुरूवातीलाच अनेक ठिकाणी पहाटेपासून धुके पडण्यास सुरूवात झाली. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने परतीचा पाऊस गेला असल्याचे जाहीर केले.

जिल्ह्यात प्रशासनाकडील आकडेवारीनूसार जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या तुलनेत ७३.७ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील पावसाची सरासरी ही ४४८ मिलीमीटरची असून जिल्ह्यात यंदा ४१७ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. जिल्ह्याच्या एकूण पावसाच्या सरासरीत जवळपास २६ टक्क्यांची घट आहे. ही घट काही तालुक्यात ५५ टक्क्यांपर्यंत आहे. यामुळे यंदा उन्हाळ्यात विहिरीच्या पाण्याची शाश्वती कमी असून पाटपाणी असणारा भाग वगळता अन्य ठिकाणी पिकांसोबत चार्‍याचा प्रश्न निर्माण होणार आहे. अनेक ठिकाणी ऐन ऑक्टोबर महिन्यात विहिरीतील पाणी कमी होताना दिसत असून डिसेंबर-जानेवारीपासून टंचाईच्या झळा वाढणार आहेत.

कमी पाऊस झालेला तालुके…
श्रीरामपूर ४५ टक्के, राहुरी ५७ टक्के, राहाता ६६ टक्के, कोपरगाव ६९ टक्के, संगमनेर ७६ टक्के आणि नेवासा ७८ टक्के.

Visits: 150 Today: 2 Total: 1876261

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *