… अखेर सोनेवाडी शिवारातील रस्त्याच्या कामास सुरुवात! ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला मिळाले यश; शेतकर्यांत समाधानाचे वातावरण
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील सोनेवाडी गावच्या शिवारातील गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या उगले वस्ती ते शिवराम डोंगरे वस्ती रस्त्याच्या कामास शुक्रवारी (ता.29) सुरुवात झाली आहे. याबद्दल परिसरातील शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
या रस्त्याच्या कामाचे अंदाजपत्रक व निविदा मंजूर होऊन कार्यारंभ आदेश दिलेले असतानाही गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून काही ग्रामस्थांकडून विनाकारण विरोध केला जात होता. अखेर या रस्त्याच्या कामाला रीतसर मंजुरी मिळून आणि निविदा कार्यारंभ आदेश देऊनही काही शेतकर्यांकडून जाणूनबुजून खोडा घातला जात होता. या रस्त्यामुळे शिवारातील सुमारे दोनशे शेतकर्यांसाठी शेतीमालाची वाहतूक करणे व दररोजचा गावाशी संपर्क करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. त्यामुळे शेतकर्यांमध्ये मोठी नाराजी पसरली होती.
याकामी हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करून शेतकर्यांची अडचण दूर होण्यासाठी सोनेवाडीचे माजी सरपंच बबन सांगळे यांच्या पुढाकाराने सुमारे दोनशे ते अडीचशे शेतकर्यांनी जिल्हा परिषद, तालुका पंचायत, तहसील कार्यालय, बांधकाम विभाग जिल्हा परिषद यांच्याकडे व लोकप्रतिनिधींकडे सातत्याने पाठपुरावा करित होते. त्यांच्या या लढ्यास अखेर यश आले आले. या रस्त्याचे काम मात्र सातत्याने काहीतरी अडचणी निर्माण होऊन सुरू होत नव्हते. अखेर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे व भारतीय जनता पक्ष अभियांत्रिकी सेलचे जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र चकोर यांनी या विषयामध्ये लक्ष घातले व महसूल, पंचायत समिती, जिल्हा परिषद बांधकाम विभागाची यंत्रणा, ग्रामपंचायत व संबंधित शेतकरी बांधव यांच्यांत समन्वय घडवून आणला. यासाठी सर्वांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने अखेर शुक्रवारी हरिश्चंद्र चकोर यांच्या हस्ते व माजी सरपंच बबन सांगळे, विद्यमान सरपंच शरद पवार, भागवत सांगळे, युवा नेते श्रीकांत गोमासे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ झाला. याप्रसंगी शोभा घुगे, शारदा सांगळे, किसन घुगे, गणेश सानप, शिवराम डोंगरे, नवनाथ आव्हाड, सुभाष डोंगरे, भास्कर सांगळे, दत्तू गोमासे, निवृत्ती गोमासे, ग्रामपंचायत सदस्य व परिसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.