श्रीरामपूर शहरात डेंग्यू, मलेरियासृदश्य आजाराचा फैलाव समाजवादी पक्षाकडून नगरपालिकेला आंदोलनाचा इशारा
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
शहर आणि परिसरात डेंग्यू, मलेरियासदृश्य रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. त्यावर उपाययोजना करण्याऐवजी श्रीरामपूर नगरपालिका प्रशासन झोपेचे सोंग घेतल्यासारखे वागत आहे. जर प्रशासनाने यावर तत्काळ पावले उचलली नाही तर समाजवादी पक्षाकडून उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
सध्या राज्यभर डेंग्यू, मलेरियासदृश्य आजाराने कहर केला असून सर्वच रुग्णालये रुग्णांनी फुल्ल झाल्याचे दिसत आहे. त्यात श्रीरामपूर शहर आणि परिसरात देखील संशयित रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. थंडी, ताप यासह पांढर्या पेशी झपाट्याने कमी होणे अशा आजारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. याचे मूळ कारण म्हणजे डासांचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यात नगरपालिका प्रशासन कारणीभूत ठरत आहे.
पालिकेकडून डासांचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी शहरात दररोज बीसी पावडर फवारणी केली जाते. धूर फवारणी देखील केली जाते. कचरा देखील वेळेवर उचलला जातो असे जरी सांगितले जात असले तरी ही सर्व कामे प्रत्यक्षात नव्हे तर कागदावरच दिसून येत असल्याचा आरोप केला आहे. गोंधवणी रस्त्यावरील पुलाखाली सांडपाणी, रस्त्याच्या कडेला कंबरेइतके वाढलेले गवत आणि कचर्याचे ढीग साचल्याचे पाहायला मिळतात. हेच डासांच्या उत्पत्तीचे मुख्य कारण बनले आहे. अशीच स्थिती शहरातील अनेक ठिकाणची आहे.
त्यामुळे येत्या आठ दिवसांत कार्यवाही झाली नाही तर समाजवादी पक्षाच्यावतीने नगरपालिकेसमोर बेमुदत आंदोलन, घंटानाद, साखळी उपोषण, आमरण उपोषण अशा लोकशाहीच्या विविध मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार, अमजद शेख, कलीम शेख, रमजान पठाण, शहेजाद शेख, रिजवान बागवान, सचिन डुबे, शाहरुख शाह, दानिश शेख, प्रतीक नरोडे, रफीक शेख आदिंनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती राज्याचे आरोग्य मंत्री, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आदिंना पाठविण्यात आल्या आहेत.