कुरणसह भारतनगरमध्ये पोलिसांचा स्थिर बंदोबस्त! एकाही गोवंशाची कत्तल होवू देणार नाही – पो.नि.देशमुख..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरातील गोवंश कत्तलखान्यांवर राज्यातील सर्वात मोठी कारवाई झाल्यानंतर राज्यभर त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतरही संगमनेरात काही ठिकाणी चोरुन-लपून गोवंशाची कत्तल सुरुच असल्याचे समोर आल्यानंतर त्या विरोधात संगमनेर पोलिसांनी आता कंबर कसली आहे. त्यासाठी कुरण येथे तपासणी मोहीम राबविल्यानंतर तेथे स्थिर बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शहरातील कत्तलखान्यांचा परिसर म्हणून ओळखल्या जाणार्या भारतनगर परिसरातही दोन ठिकाणी राहुट्या उभारुन बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय मंगळवारी शहर पोलिसांना आणखी एक अतिरीक्त वाहन मिळणार असून त्याचा वापर शहरातील गोवंश तस्करीसह कत्तलखान्यांवर लक्ष्य ठेवण्यासाठी करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी दिली आहे.

गेल्या शनिवारी (ता.2) संगमनेरातील जमजम कॉलनी परिसरातील कत्तलखान्यांवर अहमदनगर पोलिसांच्या छापा पडल्यानंतर येथील कत्तलखान्यांचा विषय ऐरणीवर आला होता. संगमनेरातील विविध हिंदुत्त्वादी संघटनांनी आक्रमक होत गेल्या सोमवारी (ता.4) प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलनही पुकारले होते. त्याची फलनिष्पती आंदोलकांच्या मागण्यांवर कालबद्ध कारवाईचे आश्वासन देण्यात झाले, त्याची मुदत आज सायंकाळी संपुष्टात येत असतांना शहरातील कत्तलखाने पुर्णतः बंद व्हावेत यासाठी पोलिसांनी धडक कृती करण्यास सुरुवात केली आहे.

आज सायंकाळी चारच्या सुमारास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी फौजफाट्यासह कुरण परिसरातील संशय असलेल्या ठिकाणांची झाडाझडती केली. संगमनेरातील कत्तलखान्यांना गोवंशाचा पुरवठा कुरणमधूनच केला जातो असा संशय आहे. त्या पार्श्वभूमीवर येथून एकही गोवंश जनावर कत्तलखान्यांच्या दिशेने जावू नये यासाठी पोलिसांनी कुरण चौफुलीवर स्थिर बंदोबस्त तैनात केला असून त्यासाठी या भागात राहुटी ठोकून 24 तास कर्मचार्यांची नियुक्ति करण्यात आली आहे. त्यासोबतच शहरातील कत्तलखान्यांचा कुप्रसिद्ध परिसर म्हणून परिचित असलेल्या भारतनगर परिसरातही दोन ठिकाणी अशाच स्वरुपाचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलिसांच्या निवार्यासाठी तेथेही दोन राहुट्या उभारण्यात आल्या आहेत.

याशिवाय मंगळवारी (ता.12) संगमनेर शहर पोलिसांना आणखी एक अतिरीक्त सरकारी वाहन उपलब्ध होणार असून या वाहनाचा संपूर्ण वापर शहरातील कत्तलखाने पुर्णतः बंद ठेवण्यासाठी केला जाणार आहे. त्यासाठी एका पोलीस उपनिरीक्षकासह सहा कर्मचार्यांची नियुक्ति करण्यात आली असून त्यांना 24 तास कुरणसह भारतनगर, जमजम कॉलनी, कोल्हेवाडी रोड, मदिनानगर व मोगलपूरा या कत्तलखान्यांच्या परिसरात गस्ज घालण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यासोबत संशयात्मक हालचाल दिसताच छापा घालून कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देशही देण्यात आले आहेत. यापुढे संगमनेरात एकाही गोवंशाची कत्तल होणार नाही या दृष्टीने पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी दैनिक नायकशी बोलतांना सांगतिले.

