रास्त भाव मिळण्यासाठी बाळहिरडा खरेदी करू ः डॉ. गावित मंत्रालयात झालेल्या बैठकीत किसान सभेला दिले आश्वासन
नायक वृत्तसेवा, अकोले
बाळहिरड्यास रास्त भाव मिळावा यासाठी सरकार आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून प्रभावी हस्तक्षेप करेल. लिलावात शेतकर्यांना अपेक्षित भाव न मिळाल्यास किमान आधार भावाने सरकार प्रसंगी हिरडा खरेदी करेल. यासाठी दरवर्षी इतर पिकांप्रमाणे हिरडा पिकाचेही किमान हमीभाव जाहीर केले जातील असे ठोस आश्वासन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील मंत्रालयात झालेल्या बैठकीत किसान सभेला देण्यात आले.
अकोले ते लोणी पायी मोर्च्यात किसान सभेच्या नेतृत्वाखाली अकोले, आंबेगाव व जुन्नर तालुक्यांमधून हिरडा उत्पादक शेतकरी मोठ्या संखेने सामील झाले होते. आदिवासी शेतकर्यांची हिरडा व्यापार्यांकडून होणारी लुट थांबविली जावी यासाठी हिरड्याची सरकारी खरेदी तातडीने सुरु करण्याची मागणी शेतकर्यांनी केली होती. पायी मोर्चास दिलेल्या आश्वासनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात ही बैठक संपन्न झाली. ग्रामसभा, शेतकरी उत्पादक कंपनी व वनधन केंद्र या सक्षम करून त्या स्वतःच बाळहिरडा खरेदी व विक्रीचे काम कसे करतील, यासाठी त्यांना आवश्यक ते सहकार्य भविष्यात शासनाच्यावतीने केले जाईल असेही आदिवासी विकास मंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान, किसान सभेच्या शिष्टमंडळाने विविध मागण्या यावेळी लावून धरल्या. सदरच्या मागण्यांबाबत आवश्यक माहिती घेऊन पुढील पंधरा दिवसांत याबाबत पुन्हा किसान सभेच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीला आदिवासी विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड व आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका लीना बनसोड व आदिवासी विकास विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते. तर किसान सभेच्या शिष्टमंडळात डॉ. अजित नवले, डॉ. अमोल वाघमारे, राजाराम गंभीरे, अॅड. नाथा शिंगाडे, विश्वनाथ निगळे, अशोक पेकारी, गणपत घोडे, रामदास लोहकरे, जितेंद्र चोपडे, श्याम शिंदे यांचा समावेश होता.