घ्या आता! पोलीस निरीक्षकांच्या उशाला असलेल्या न्यायाधीशांच्याच बंगल्यात घरफोडी! संगमनेर पोलिसांचा गुन्हेगारांवरील ‘धाक’ संपला; शहराचे सामाजिक स्वास्थच आले धोक्यात..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या काही दिवसांपासून सगळ्याच प्रकारच्या गुन्हेगारी घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यामुळे सर्वत्र अनागोंदी माजल्याचे चित्र निर्माण होत असतानाच त्यात आता चोरट्यांचा उपद्रवही वाढल्याने संगमनेरचे सामाजिक स्वास्थ पूर्णतः ढासळले आहे. गुन्हेगारांसह चोरट्यांनाही पोलिसांचे भय नसल्याच्या एकामागून एक घटना घडूनही त्यात बदल होत नसल्याने एकूणच व्यवस्था रामभरोसे बनली आहे. त्यातच प्रत्येक अवैध व्यवसायात वरपासून खालपर्यंत सगळीच साखळी निर्माण झाल्याने सध्या सबकुछ ‘आलबेल’ आहे, अशावेळी नागरी सुरक्षेची मागणी करणंही बेकायदा ठरावं अशीच काहीशी स्थिती आहे. ही गोष्ट अधिक ठळक करणारी घटनाच आज पहाटेच्या काळोखातून उजेडात आली असून चक्क पोलीस निरीक्षकांच्या उशाला असलेला न्यायाधिशांचा बंगलाच चोरट्यांनी फोडला. अर्थात संपूर्ण बंगल्यात आधुनिक सुरक्षा व्यवस्था असल्याने आत शिरण्यासाठी चोरट्यांनी केलेल्या तोडफोडीशिवाय इतर नुकसान झाले नाही. मात्र ही घटना चोरट्यांना अथवा गुन्हेगारांना पोलिसांचा कोणताच धाक राहिला नसल्याचे दाखवणारी ठरली.

याबाबत ओम कोकणे (रा.कोकणेवाडी) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार घुलेवाडी शिवारातील गुरुदेव गृहनिर्माण सहकारी संस्थेत त्यांचे मामा व सध्या पुणे येथे कार्यरत असलेले न्यायाधीश राजेंद्र तांबे यांचा बंगला आहे. न्यायाधीश तांबे कुटुंबासह पुण्यातच राहत असल्याने त्यांचा भाचा ओम कोकणे अधुनमधून या बंगल्यावर येत असतो. सदर बंगल्यात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असल्याने पुण्यात बसून बंगल्याकडे लक्षही ठेवले जात होते. आज (ता.१७) सकाळी मालती तांबे या मोबाईलवर सीसीटीव्ही बघत असताना त्यांना बंगल्याच्या तळमजल्याच्या पार्किंगमधून पहिल्या मजल्यावर जाण्यासाठीच्या जिन्याचा दरवाजा उघडा दिसला. त्यावरुन चोरीचा हा प्रकार समोर आला.

या घटनेत दोघा चोरट्यांनी बंगल्याच्या तळमजल्यावरील अभ्यासिका व बैठक खोलीच्या दोन खिडक्या व दोन्ही दरवाजे तोडले. मात्र त्यांना मुख्य दरवाजा उघडता आला नाही. अभ्यासिकेत पुस्तकांची उचकापाचक केल्यानंतर त्यांनी तेथून पळ काढला. या संपूर्ण प्रकारात चोरट्यांना बंगल्यात प्रवेश करण्यासाठी केलेल्या नुकसानीशिवाय काहीही चोरी झालेले नाही. मात्र हा प्रकार ज्या भागात घडला त्या सहकार नगरमध्ये याच वसाहतीत चौदाव्या क्रमांकाच्या बंगल्यात शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे राहतात. सदर घटना याच वसाहतीमधील अकराव्या क्रमांकाच्या बंगल्यात घडली आहे. यावरुन शहर पोलिसांचा गुन्हेगार आणि चोरट्यांवरील धाक पूर्णतः संपुष्टात आल्याचेच ठळकपणे दिसून आले आहे.

गेल्या काही महिन्यात जिल्ह्यातील गुन्हेगारी घटना, अवैध व्यवसायांमध्ये झालेली वाढ आणि चोरट्यांच्या सुरळसुळाट यांसारख्या घटना रोजच बघत आहोत. यामागे सूत्रबद्ध पद्धतीने साखळी कार्यरत असून प्रत्येक अधिकार्‍याने आपापले स्वतंत्र कर्मचारी नेमले आहेत. त्या सर्वांचा स्वतंत्र धाक जिल्ह्यातील त्यांच्या त्यांच्या ‘वतनां’मधील गुन्हेगारी क्षेत्रावर आहे. आता राजाच मेहरबान म्हंटल्यावर बाकी काय पाहायचंय, सबकुछ आलबेलच आहे!. खरेतर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उत्तम प्रशासक म्हणूनही ओळखले जातात. त्यांच्या कामाच्या शैलीतूनही ते नेहमीच दिसूनही आले आहे. असे असतानाही जिल्ह्यात सध्या सुरु असलेली ही बेधुंदशाही संशय निर्माण करणारी आहे. शांतता व सुव्यवस्थेशिवाय कोणत्याही क्षेत्राचा विकास होवू शकत नाही, त्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीवर कायद्याचा धाक असण्याची गरज आहे. मात्र संगमनेरात चक्क पोलीस निरीक्षकांच्या उशाला असलेला न्यायाधीशांचाच बंगला फोडला गेला आहे, ही घटना संगमनेरच्या बिघडलेल्या सामाजिक स्वास्थाचे दर्शन घडवणारीच ठरली आहे.

कधीकाळी शहर पोलीस ठाण्यातील एक पोलीस कर्मचारी हजारोंचा जमाव रोखत होता. आज ‘ती’ विश्वासार्हताच नष्ट झाल्याचे पदोपदी दिसते. मटक्यापासून जुगारापर्यंत आणि गांजापासून एमडीपर्यंत सगळेच प्रकार यापूर्वी वेळोवेळी समोर आले आहेत. यावरुन शहरात पसरत असलेल्या गुन्हेगारीचा अंदाज येतो. त्याची पाळेमुळे नष्ट करण्याची गरज असताना त्यांच्या पेढ्या मात्र राजरोस ओसंडून वाहत असल्याने पोलिसांच्या धाकाचा ‘तो’ काळ आता भूतकाळ झाल्याचेच दिसत आहे.

Visits: 113 Today: 1 Total: 1105899

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *