अकोलेत प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराने तरुणाचा बळी कोल्हार-घोटी रस्त्याच्या अर्धवट कामामुळे वाढले अपघात


नायक वृत्तसेवा, अकोले
सार्वजनिक बांधकाम विभाग व अकोले नगरपंचायतच्या ढिसाळ कारभाराने मूळ वीरगाव (ता.अकोले) येथील परंतु हल्ली संगमनेर येथे राहणार्‍या हेमंत भानुदास अस्वले (वय ४०) या तरुणाचा अपघातात बळी गेला आहे. तर त्याची पत्नी राणी अस्वले (वय ३२) ही गंभीर जखमी झाली आहे. दरम्यान शहरातील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नाईकवाडी व अन्य कार्यकर्त्यांनी या घटनेबद्दल सार्वजनिक बांधकाम विभाग व अकोले नगरपंचायतच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.

हेमंत अस्वले व त्याची पत्नी राणी अस्वले हे सोमवारी तालुक्यात हरिश्चंद्रगड परिसरात पर्यटन करून घरी परतत असताना अकोले येथील कराळे किराणा दुकानासमोर सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास आले होते. त्यावेळी रस्त्याच्या अर्धवट कामामुळे खटकीवरून मोटारसायकल कोल्हार-घोटी रस्त्यावर पडल्याने पाठीमागून येणार्‍या सिमेंट काँक्रिट मिक्सरच्या गाडीने त्यांना चिरडले. यात दोघेही पती-पत्नी गंभीर जखमी झाले. त्यांना येथील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांची परिस्थिती चिंताजनक असल्याने तातडीने संगमनेर येथील एका खासगी रुग्णालयात पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान हेमंत अस्वले या तरुणाचा रात्री मृत्यू झाला. त्याच्यावर वीरगाव येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार आले.

या घटनेचे तीव्र पडसाद अकोले शहरात उमटले. सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नाईकवाडी, सचिन शेटे, राहुल शेटे, अन्य कार्यकर्ते, स्थानिक व्यापारी व नागरिक यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व अकोले नगरपंचायतच्या गलथान कारभाराने हेमंत अस्वले याचा बळी घेतला असल्याचा आरोप करत तीव्र शब्दांत निषेध केला. दरम्यान, पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला असणारी मातीमीश्रित गाळामुळे अनेक दुचाकी वाहने रस्त्यावर घसरून अपघात झाले आहे. गटारीवर मोठी वाहने जाऊन अनेकदा अपघातही झाले आहेत. मात्र तरीही हे काम अद्यापही पूर्ण झाले नसल्याबद्दल नगरपंचायत पदाधिकारी, नगरसेवक, स्थानिक ग्रामस्थ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी संबंधित विभागांनी आपापली कामे पूर्ण करण्याचा निर्णय पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग व अकोले नगरपंचायत मात्र सूस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Visits: 11 Today: 1 Total: 117144

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *