शिर्डी येथील अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग केंद्रावर छापा तिघे ताब्यात; ४५ टाक्यांसह सात लाखांचा मुद्देमाल जप्त
नायक वृत्तसेवा, शिर्डी
शिर्डी उपविभागाचा कारभार हाती आल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारलेला आहे. शिर्डी जवळील हेलिपॅड रस्ता ११ नंबर चारीजवळ चारचाकी वाहनांमध्ये अवैधरित्या गॅस सिलेंडर रिफिलिंग करणार्या केंद्रावर मंगळवारी (ता.१२) छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले. तर ४५ गॅस टाक्यांसह सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत शिर्डी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांना अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंगची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यावरुन राहात्याचे तहसीलदार अमोल मोरे यांना संयुक्त कारवाई करण्याबाबत माहिती दिली असता त्यांनी तहसील कार्यालयाचे पुरवठा निरीक्षक भारत खरात यांना संयुक्त कारवाई करण्याकरीता पाठवले. सदर ठिकाणी पथकाने पंचासमक्ष छापा टाकून दोन चारचाकी वाहनांसह गॅस सिलेंडर भरण्याचे रिफिलिंग मशिन, ३५ घरगुती गॅस टाक्या आणि १० व्यावसायिक गॅस टाक्या जप्त केल्या.
शिर्डी पोलिसांत संदीप पांडुरंग मते (वय ३९, रा. कातोरे वस्ती निमगाव, ता. राहाता), अनिस मोहम्मद सय्यद (वय ४८, रा. श्रीरामनगर, शिर्डी), विवेक राजेंद्र आव्हाड (रा. चांगदेवनगर निमगाव, ता. राहाता) यांना ताब्यात घेण्यात आले असून, अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ कलम ३, ७ आणि भारतीय दंडसंहिता १८६० कलम २८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. आरोपींच्या ताब्यातून चारचाकी वाहने, गॅस टाक्या, मशिन असा एकूण ७ लाख ७ हजार ९५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, पुरवठा निरीक्षक भारत खरात, पोहेकॉ. इरफान शेख, पोना.अशोक शिंदे, पोहेकॉ. अप्पासाहेब थोरमिसे, पोकॉ.दिनेश कांबळे यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे शिर्डी परिसरातील अवैध धंदे करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.