ग्रामीण भागातील रुग्णसंख्येला मिळाली काहीशी गती..! शहरातील सहाजणांसह तालुक्यातील एकूण तेहतीस जणांचे अहवाल पॉझिटिव..

नायक वृत्तसेवा संगमनेर

चढ-उतार करीत आज ग्रामीण क्षेत्रातील रुग्णसंख्येला काहीशी गती मिळाली. आज ग्रामीण क्षेत्रात किंचित उसळी घेत कोविडने शहरानजीकच्या जोर्वे गावातील तब्बल अकरा जणांना बाधित केल्याचा अहवाल समोर आला आहे. विशेष म्हणजे यातील बहुतेक रुग्णांचा परस्परांशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे प्रशासनाच्या चिंताही वाढल्या आहेत. नवरात्रोत्सवाच्या प्रारंभापासून मोठा दिलासा देणाऱ्या कोविडचा आलेख आज काहीसा उंचावल्याने आपल्या प्रत्येकाची जबाबदारीही वाढली आहे. आज खासगी प्रयोगशाळेसह रॅपिड अँटीजेन चाचणीच्या निष्कर्षातून शहरातील सहा जणांसह तालुक्यातील एकूण 33 जणांचे अहवाल पॉझिटिव आले आहेत. आज जोर्वेच्या रूपाने रुग्णसंख्येने काहीशी गती घेतल्याने तालुका आता 4 हजार 65 वर पोहोचला आहे.

नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी अवघे अठरा रुग्ण समोर आल्याने संगमनेरकरांना मोठा दिलासा मिळाला होता. यंदाच्या नवरात्रोत्सवात सार्वजनिक डामडौल नसला तरीही, नागरिकांच्या मनातील भावनांचा बंध जोडला गेल्याने आणि त्यालाही तसाच प्रतिसाद मिळत गेल्याने संगमनेरातील वातावरण काहीसे समाधानकारक बनले आहे. आज त्याला काहीसा छेद देत तालुक्यातील जोर्वे येथून तब्बल 11 रुग्ण समोर आल्याने किंचित चिंता वाढल्या आहेत. मात्र घाबरून जाण्यासारखे कोणतेही कारण नसून नागरिकांनी केवळ सतर्क राहून नियमांचे पालन केल्यास कोविडचा पराभव टप्प्यात आहे.

आज शहरातून सहा रुग्ण समोर आले त्यातील तिघे इंदिरानगर परिसरातील आहेत. या भागातील 31 वर्षीय तरुणासह 29 वर्षीय महिला व अकरा वर्षीय मुलगा, पावबाकी रोड परिसरातील 52 वर्षीय महिला, सह्याद्री महाविद्यालयाजवळल 46 वर्षीय इसम व स्वामी समर्थ नगर मधील 50 वर्षीय इसमाला संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरातील रुग्णसंख्येत भर पडून ती आता 1 हजार 148 वर पोहोचली आहे.

आज जोर्वे येथील 75, 60 व 40 वर्षीय महिलेसह 20 वर्षीय तरुणी, 42 वर्षीय दोघे, 40, 37, 35, 28 व 26 वर्षीय तरुणांसह 10 वर्षीय बालक, रहिमपूर येथील 40, 18 व 16 वर्षीय तरुण, ढोलेवाडी येथील 28 वर्षीय तरुण, अश्वि खुर्द मधील 26 वर्षीय तरुण, पिंपळगाव कोंझिरा येथील 52 वर्षीय इसम, कोकणगाव येथील 32 वर्षीय तरुण, मनोली येथील 46 वर्षीय इसम, निमगाव टेंभी येथील अकरा वर्षीय मुलगा, समनापुर येथील 75 वर्षीय महिलेसह 56 वर्षीय इसम, कासारा दुमाला येथील 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, गुंजाळवाडी शिवारातील राहणे मळा येथील 41 वर्षीय महिला, पेमगिरी येथील 50 वर्षीय इसम व सारोळे पठार येथील 42 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव आला आहे. ग्रामीण भागातील रुग्ण संख्येत आज सत्तावीस रुग्णांची भर पडल्याने ग्रामीण रुग्णसंख्या 2 हजार 917 वर पोहोचली आहे. आज  तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येत 33 रुग्णांची भर पडल्याने बाधितांची संख्या आता 4 हजार 65 झाली आहे.

Visits: 258 Today: 1 Total: 1869570

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *