पोहेगाव परिसरातील गावांना ‘पुन्हा’ अवकाळीचा तडाखा उभ्या पिकांना फटका बसण्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
तालुक्यातील पोहेगाव, चांदेकसारे, सोनेवाडी आदी गावांत बुधवारी अवकाळी पाऊस झाल्यानंतर पुन्हा एकदा शुक्रवारी (ता.11) रात्री 7.30 वाजता अवकाळी पाऊस पडला. हा अवकाळी पाऊस विजेच्या कडकडाटासह झाला. यामुळे गहू, कांदा, मका आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या पावसाने शेतात उभ्या असलेल्या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

हवामान खात्याने दिलेल्या इशार्‍यानुसार वरील गावांत बुधवारी पावसाने हजेरी लावली होती. पिकांचे थोड्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र विजेच्या कडकडाटासह शुक्रवारी पुन्हा पावसाला सुरुवात झाली असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतामध्ये सध्या रब्बीचे गहू, हरभरा, भाजीपाला व कांदा पीक मोठ्या प्रमाणात आहेत. या अवकाळी पावसामुळे कांदा व गहू पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे. गहू काढणीला आला आहे तर कांदा पीकही शेवटच्या पाण्यावर असतानाच अवकाळी पावसाने कहर केला आहे. पुन्हा सुरू असलेल्या पावसामुळे गव्हाचे व मकाचे पीक पडले आहे.

कांदा पिकाच्या पाथीमध्ये पावसाचे पाणी गेल्याने कांदा साठवणीसाठी योग्य राहणार नसल्याने शेतकर्‍यांना मातीमोल भावामध्ये हा कांदा विकावा लागणार आहे. सोनेवाडी, पोहेगाव, चांदेकसारे, डाऊच खुर्द, घारी, देर्डे-कोर्‍हाळे, देर्डे चांदवड परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांच्या शेतामध्ये कांदा व गव्हाचे पीक आहे. मात्र, अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती शेतकर्‍यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Visits: 252 Today: 1 Total: 1958934

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *