… तर ठेकेदाराला पकडून तोंडाला काळे फासू! नगर-मनमाड महामार्गाच्या कामकाजावरुन खासदार विखेंचा इशारा

नायक वृत्तसेवा, शिर्डी
नगर-मनमाड महामार्गासाठी केंद्र सरकारकडून 450 कोटी रुपये मंजूर करून कार्यारंभ आदेश देखील दिला गेला आहे. पावसाच्या कारणास्तव रस्त्याच्या कामाला विलंब होत असेल. परंतु येत्या पंधरा दिवसांत काम सुरू होईल असा विश्वास नगर दक्षिणचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे. मात्र त्यानंतरही काम सुरू न झाल्यास ठेकेदाराला पकडून तोंडाला काळे फासू त्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असा इशारा त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे.

नगर दक्षिणचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी मंगळवारी (ता.14) सकाळी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांची भेट घेऊन सत्कार केला यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी शिर्डी नगरपंचायतचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद म्हस्के, डॉ.गोकुळ घोगरे, भाजप ओबीसी जिल्हाध्यक्ष अशोक पवार, भाजपयुमोर्चाचे शिर्डी शहराध्यक्ष योगेश गोंदकर आदी मान्यवर उपस्थित होते. खड्ड्यांसाठी वारंवार चर्चेत असलेल्या नगर-मनमाड महामार्गासाठी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून या महामार्गासाठी 450 कोटी रुपये मंजूर करून घेतले आहेत. तसेच रस्त्याच्या कामाला हिरवा कंदील देखील दाखवला आहे.

यावेळी खासदार डॉ.विखे पाटील यांनी सांगितले की, पावसाळ्याअभावी कामाला उशीर होत आहे, तोपर्यंत खड्डेे बुजवण्यासाठी माजी मंत्री विखे पाटील यांनी आदेश दिले आहेत असे सांगत येत्या पंधरा दिवसांत सदरच्या रस्त्याचे काम सुरू न झाल्यास ठेकेदाराच्या तोंडाला काळे फासू, असा इशारा त्यांनी दिला. नगर-मनमाड महामार्गावर प्रचंड मोठमोठे खड्डे पडले असून या रस्त्यावर प्रवास करताना चांगला रस्ता शोधूनही सापडणार नाही अशी दयनीय अवस्था झाली आहे. अतिशय त्रास सहन करत या रस्त्यावरून जाणार्या-येणार्या प्रवाशांना सहन करावा लागत आहेत. आजही ‘रस्ता खड्ड्यात आहे की खड्ड्यात रस्ता’ आहे हे समजणे अशक्य झाले आहे. दुचाकीस्वारांना तर तारेवरची कसरत करून आपली वाहने चालवावी लागत आहेत.

निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणार्या नगर-मनमाड महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. काश्मिर ते कन्याकुमारी म्हणून या महामार्गाची ओळख आहे. नुकत्याच पावसाळ्यापूर्वी करोडो रुपये खर्च करून खड्डे बुजविण्यात आले होते, मात्र पावसाळ्यात पुन्हा खड्ड्यातील मुरूम वाहून गेल्याने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. याप्रश्नी अनेक राजकीय पक्षांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी खड्ड्यात बसून व वृक्षारोपण करून आंदोलने केली. त्यानंतर तात्पुरती डागडुजी करूनही सदरचा रस्ता दुरुस्त होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे सदरील रस्त्याचे काम येत्या पंधरा दिवसानंतर सुरू होईल असा विश्वास डॉ.विखे पाटील यांनी व्यक्त केल्याने आता हा रस्ता खड्डेमुक्त होईल, अशी अपेक्षा प्रवासी आणि वाहनचालकांनी बोलून दाखवली आहे.
