संगमनेरात गायींच्या रक्ताचे पाट वाहतेच! लागोपाठ दोन कारवाया; दीड हजार किलो गोवंशाचे मांस जप्त..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
प्रदीर्घ कालावधीपासून सुरु असलेल्या कारवाया, हजारों जिवंत जनावरांची सुटका, कोट्यवधीचे गोवंश मांस आणि वाहनांच्या जप्तीसह आजवर शेकडो कसायांवर अटकेची कारवाई होवूनही संगमनेरातील गोवंशाच्या रक्ताचे पाट मात्र वाहतेच आहेत. गुरुवारी झालेल्या सलग दोन कारवायांमधून ही गोष्ट स्पष्ट झाली असून त्यातून कत्तलखान्यांबाबत शहर पोलिसांच्या भूमिकेवरही संशय निर्माण झाला आहे. या दोन्ही कारवायांमधून संगमनेर शहर व तालुका पोलिसांनी दोन वाहने व 1 हजार 400 किलो गोवंशाच्या मांसासह 9 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात येवून त्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत रायते येथील ग्रामस्थांनी पकडलेल्या वाहनावर कारवाई करण्यास शहर पोलिसांकडून झालेली दिरंगाई खूप काही सांगणारी असून पोलिसांच्या आशीर्वादानेच शहरातील बेकायदा कत्तलखाने सुरु असल्याचेही त्यातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील पहिली कारवाई गुरुवारी (ता.24) रात्री आठच्या सुमारास खराडी रस्त्यावरील रायते शिवारात करण्यात आली. गोरक्षकांच्या नजरेतून सुटण्यासाठी संगमनेरातील कसाई गोवंश मासांच्या वाहतुकीसाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरत असतात. अशीच क्लृप्ती वापरीत एका कसायाने मारुती रिड्स (क्र.एम.एच.42/टी.जी.3543) या अलिशान कारमध्ये चारशे किलो गोवंश मांस भरुन तो आडवाटेने खराडीमार्गे मुंबईच्या दिशेने निघाला होता. या दरम्यान त्याच्या वाहनाचे चाक एका खड्ड्यात अडकलले, बर्याचवेळ प्रयत्न करुनही त्याला खड्ड्यात फसलेला टायर बाहेर काढण्यात अपयश आल्याने आसपासच्या काही ग्रामस्थांनी वाटसरुला मदत म्हणून ‘त्या’ वाहनाकडे धाव घेतली.
मात्र म्हणतात ना; ‘चोराच्या मनात चांदणे!’, याप्रमाणे आपल्या वाहनाच्या दिशेने येणार्या माणसांना आपला संशय असल्याची भीती ‘त्या’ कसायाच्या मनात जागली आणि त्याने वाहन तेथेच सोडून धूम ठोकली. त्यामुळे संशय बळावलेल्या ग्रामस्थांनी वाहनाची तपासणी केली असता पाठीमागील बाजूला मोठ्याप्रमाणात कापलेले मांस भरल्याचे त्यांना दिसले. याबाबत संगमनेर शहर पोलिसांना तत्काळ माहिती देण्यात आली. मात्र तब्बल दोनतास वाट पाहिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सदरचे वाहन ताब्यात घेत कायदेशीर सोपस्कार उरकून 400 किलो मांसासह 2 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केले. या प्रकरणी पोलीस शिपाई विशाल करपे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात कसायाविरोधात गुन्हा दाखल करण्यात येवून पुढील तपास महिला पोलीस नाईक जाधव यांच्याकडे देण्यात आला.
यातील दुसरी कारवाई आज पहाटे सव्वा वाजण्याच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावरील कर्हेफाटा येथे घडली. रात्री गस्तीवर असलेल्या परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांना संशय आल्याने त्यांनी नाशिकच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारा टाटा कंपनीचा टेम्पो (क्र.एम.एच.4/एच.वाय.4082) थांबवला. यावेळी त्याची झडती घेतली असता त्यात मोठ्या प्रमाणात गोवंशाचे मांस आढळून आले. या प्रकरणी पोलीस शिपाई बाबासाहेब क्षिरसाठ यांच्या फिर्यादीवरुन मुजफ्फर जाकीर हुसैन कुरेशी (वय 28) व असलान अस्लम कुरेशी (वय 22, दोघेही रा.कुरेशीनगर, कुर्ला, मुंबई) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी 2 लाख 50 हजार रुपयांच्या एक हजार किलो गोवंशाच्या मांसासह 6 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करीत पुढील तपास पोलीस हवालदार वायाळ यांच्याकडे सोपविला आहे.
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाल्यापासून पोलिसांनी शहरातील कुप्रसिद्ध असलेल्या बेकायदा कत्तलखान्यांवर आजवर शेकडोंवेळा छापेमारी केली. त्यातून हजारों जिवंत गोवंशाची सुटकाही झाली आणि कापलेल्या जनावरांच्या हजारों किलो मांसासह कोट्यवधी रुपयांची वाहनेही जप्त करण्यात आली. अशा असंख्य प्रकरणात आजपर्यंत शकडों कसायांवर वारंवार गुन्हेही दाखल झाले, मात्र इतके सगळे होवूनही गेल्या दशकभरात संगमनेर पोलिसांना शहरातील बेकायदा कत्तलखाने बंद करता आले नाहीत. त्यामुळे अधुनमधून होणारी कारवाई हा फक्त ‘शो’ असून प्रत्यक्षात शहरातील कत्तलखाने कधी बंदच झाले नसल्याचे पुन्हा एकदा ठळकपणे समोर आले आहे. त्यावरुन पोलिसांची नितीमत्ता आणि कर्तव्याबाबतही संशय निर्माण झाला आहे.
संगमनेरच्या कत्तलखान्याची खिरापत केवळ अहमदनगर जिल्हाच नव्हेतर वाहतुकीच्या मार्गावर येणार्या प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दित वाटली जाते. त्यामुळे वारंवारच्या कारवायानंतरही संगनेरातील कसायांवर त्याचा कोणताही परिणाम झाल्याचे आजवर कधी बघायला मिळाले नाही. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही (एलसीबी) संगनेरातील कत्तलखान्यावर छापा घातला होता, त्यावरुन येथील कत्तलखान्यातून निघणार्या गायींच्या रक्ताचा ओघळ कोठवर जावून पोहोचतो हे देखील ठळकपणे समोर आले आहे.