कांदा खरेदीच्या निर्णयावर किसान सभेची तीव्र नाराजी निर्यात कर रद्द करून कांद्याला योग्य भाव द्या ः डॉ. नवले


नायक वृत्तसेवा, अकोले
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यात कर लावल्याने राज्यात विशेष करून कांदा पट्टा असलेल्या नाशिक, अहमदनगर, पुणे जिल्ह्यातील शेतकर्‍यांमधून तीव्र प्रतिक्रिया येत आहे. आक्रमक झालेल्या शेतकर्‍यांची भूमिका पाहून केंद्र सरकारने २ लाख मेट्रिक टन कांदा नाफेडच्या माध्यमातून प्रतिक्विंटल २,४१० रुपयाने खरेदी करण्याची घोषणा केली आहे. मात्र सरकारच्या या घोषणेबद्दल किसान सभेने असमाधान व्यक्त केल्यामुळे कांदाप्रश्न सरकारला रडवणार, असे बोलले जात आहे.

शेतकर्‍यांकडे आजमितीला ४० लाख मेट्रिक टन कांदा निर्यातीसाठी पडून आहे. अशी स्थिती असतानाही एकीकडे निर्यात कर लावलेली आहे, तर दुसरीकडे निर्यात थांबवून केवळ २ लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करण्याची घोषणा झाली आहे. यामुळे फार काही मोठे केल्याचे दाखवणे, हा या समस्येवर उपाय नसल्याचे अकोलेतील शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी म्हंटले आहे.

याबाबत बोलताना डॉ. अजित नवले म्हणाले, दोन लाख टन खरेदीचा सरकारचा निर्णय म्हणजे तात्पुरता उपाय आहे. मात्र शेतकर्‍यांकडे ४० लाख टन कांदा पडून आहे. विदेशात कांद्याला मागणी असताना जर का ४० टक्के निर्यात कर मागे घेतले गेले तर, शेतकर्‍यांच्या खिशात दोन अधिकचे पैसे पडणार आहेत. त्यामुळे निर्यात कर रद्द करून कांद्याला सरकारने योग्य भाव देणे, हाच कांदा प्रश्नावर योग्य मार्ग असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सरकारने केवळ २ लाख टन कांदा खरेदीवर टीका करतानाच, गेली तीन वर्षे कांद्याला भाव नाही, अतिवृष्टीमुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले. त्यासाठी घोषित अनुदानाचे पैसे अजून शेतकर्‍यांच्या खात्यात आलेले नाहीत. या परिस्थितीत आता कुठे शेतकर्‍याला चांगला भाव मिळू लागताच, केंद्र सरकारने निर्यात कर लावला. यामागे सरकारची शेतकरीविरोधी असलेली भूमिका पुन्हा पुढे आली असल्याची घणाघाती आरोपही डॉ. अजित नवले यांनी केली आहे.

Visits: 131 Today: 1 Total: 1773535

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *