संगमनेरातील ‘कॅफे हाऊस’ पुन्हा एकदा चर्चेत! दोघांनी केला अत्याचारासाठी वापर; कॅफे चालक व लॉज मालकही सहआरोपी..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
अल्पवयीन विद्यार्थिनीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणांवर नेवून सतरा वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (ता.२२) समोर आला. घुलेवाडी शिवारातील एकाने पीडितेला आयुष्यभर सोबत राहण्याचे आमिष दाखवित सुरुवातीला तिच्यावर अत्याचार केले. तर हा प्रकार समजलेल्या दुसर्‍याने तिला ब्लॅकमेल करीत नंतर दोघांनीही संगमनेर व शिर्डीतील काही लॉज, पर्यटनस्थळं आणि संगमनेरातील कुख्यात दोन कॅफे हाऊसमध्ये नेवून वारंवार तिचा गैरफायदा घेतला. याप्रकरणी आज पहाटे गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दोन्ही मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून या प्रकरणात आरोपींना मदत करणार्‍या एकासह संगमनेर व शिर्डीतील लॉजमालक आणि अकोले नाका व महामार्गावरील एका कॅफे चालकालाही आरोपी करण्यात आले आहे. या घटनेतून ‘कॅफे हाऊस’च्या गोंडस नावाखाली सुरु असलेला नंगानाच पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून त्या विरोधात धडक कारवाईची गरज निर्माण झाली आहे.

याबाबत सतरा वर्षीय पीडितेने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत आरोपी आशिष राऊत (वय २०, रा.मालुंजकरवस्ती, घुलेवाडी) हा महाविद्यालयातून ये-जा करताना सतत पाठलाग करीत असल्याने त्यातून त्याच्याशी ओळख झाल्याचे म्हंटले आहे. त्यातून भेटीगाठी आणि संवाद झाल्याने मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. आरोपीने पीडितेला आयुष्यभर सोबत राहण्याचे अभिवचन देत तिचा विश्वास संपादन केला आणि तिला गेल्या एप्रिलपासून आजवर वेळोवेळी शिर्डी येथील लॉजसह अकोले बायपास व पुणे-नाशिक महामार्गावरील एका ‘कॅफे हाऊस’मध्ये नेवून शारीरिक अत्याचार केले.

या दोघांमध्ये सुरु असलेला प्रकार पहिल्या आरोपीच्या परिसरातच राहणार्‍या किरण सोपान राऊत (वय ३०) याला समजला. त्यावरुन त्याने पीडितेला ‘ब्लॅकमेल’ करण्यास सुरुवात केली आणि त्यातून तो देखील तिला शिर्डी व संगमनेरातील काही लॉज, वरील दोन्ही कॅफे हाऊससोबतच विठ्ठलकडा, पेमगिरी, कर्‍हेघाट यांसारख्या ठिकाणांवर नेवून त्यानेही तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले. या सर्व कृत्यांमध्ये सागर मालुंजकर नावाच्या इसमाने आरोपींना साहाय्य केल्याचेही पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे.

यापूर्वी पठार भागातील एका प्रकरणात पोलिसांनी अत्याचार करणार्‍या आरोपीसह त्याला जागा उपलब्ध करुन देणार्‍या कॅफेचा मालक व चालक अशा दोघांनाही आरोपी करुन त्यांना अटक केली होती. या प्रकरणातही पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी तोच फंडा कायम ठेवताना प्रत्यक्ष अत्याचार करणार्‍या आशिष राऊत (वय २०) व किरण सोपान राऊत (वय ३०, दोघेही रा.मालुंजकर वस्ती, राऊत मळा, घुलेवाडी) या दोघांसह त्यांना साहाय्य करणारा सागर मालुंजकर, जागा उपलब्ध करुन देणारे शिर्डी व संगमनेर येथील लॉजमालक, संगमनेरातील अकोले बायपास व पुणे-नाशिक महामार्गावरील कॅफे हाऊसचे मालक अशा पाच जणांवर भारतीय दंडसंहितेच्या कलम ३७६ (२) (एन), ३६३ सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्‍या कायद्याचे कलम ४, ६, ८, १२ व १७ प्रमाणे गुन्हा दाखल करीत पहिल्या दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

आज त्या दोघांनाही न्यायालयासमोर हजर केले जाणार असून त्यांची पोलीस कोठडी मागण्यात येणार आहे. एकाने आमिष दाखवित तर दुसर्‍याने भीती दाखवित वेळोवेळी केलेल्या अत्याचाराच्या या घटनेत दोघांनी वापरलेली ठिकाणं, संगमनेरातील ‘त्या’ कॅफेंची नावे, त्यांना अजून कोणी साहाय्य केले का याचा तपास लागणार आहे. आरोपींच्या चौकशीतून लॉजमालक व कॅफेचालकांच्या नावांची उकल झाल्यानंतर त्यांना या प्रकरणात अटक केली जाणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव करीत आहेत.

मोबाईलच्या अतिवापरातून आजची पिढी काही प्रमाणात भरकटल्याचे वारंवार समोर येत असताना एका सतरा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर दोघांनी वारंवार केलेल्या अत्याचाराचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. अशा कृत्यांसाठी शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात कॅफे हाऊसच्या गोंडस नावाखाली सुरु झालेल्या अनेक ठिकाणांमुळे अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून अल्पवयीन मुलींना फूस लावून या ठिकाणांवर आणले जाते आणि अवघ्या दोन-पाचशे रुपयांच्या बदल्यात त्यांना अत्याचारासाठी ‘स्वतंत्र कप्पा’ मिळतो. गेल्या काही कालावधीतील अनेक प्रकरणांमध्ये संगमनेरातील लॉजसह नव्याने उभे राहिलेले कॅफे हाऊस चर्चेत आले असून त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.


संगमनेर बसस्थानकाच्या परिसरातील काही लॉजसह पुणे-नाशिक बायपास महामार्गाच्या कडेला असलेल्या काही बिअरबार व हॉटेलमध्येही तासानुसार पैसे घेवून खोल्या उपलब्ध करुन दिल्या जातात. बिहारमधून खांडगावच्या प्रेयसीला भेटायला आलेल्या ‘त्या’ दोघांनी गदारोळानंतर बायपासच्या ‘त्याच’ हॉटेलमध्ये जाण्याचे ठरविले होते. गेल्या काही दिवसांत शहर व परिसरात अशी ठिकाणं वाढल्याने त्या भागात गुन्हेगारांची वर्दळ वाढण्यासह वेश्या व्यवसाय व विद्यार्थिनींवर असे प्रकार घडण्याचे प्रकारही वारंवार समोर येवू लागले आहेत. या गंभीर सामाजिक समस्येकडे समाज आणि प्रशासन अशा दोहींनीही गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *