कांगोणीत माहिती अधिकार कार्यकर्त्यास मारहाण सरपंचासह नऊ जणांवर शनिशिंगणापूर पोलिसांत गुन्हा

नायक वृत्तसेवा, नेवासा
शिक्षक, ग्रामसेवक आदी मुख्यालय ठिकाणी राहत नाही म्हणून त्यांच्या गाड्यांची हवा सोडण्याचे आंदोलन करणारे माहिती अधिकार कार्यकर्ते सोपान रावडे यांच्या कुटुंबियांना मारहाण केल्याप्रकरणी कांगोणी (ता. नेवासा) सरपंचासह 9 व्यक्तींवर शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत नामदेव आसाराम रावडे (रा.कांगोणी, ता.नेवासा) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, माझा पुतण्या सोपान बाबासाहेब रावडे याने शिक्षक, ग्रामसेवक, कृषी अधिकारी, डॉक्टर हे मुख्यालय ठिकाणी राहत नाही म्हणून त्यांच्या गाड्यांची हवा सोडण्याचे आंदोलन चालू आहे. दुपारच्या वेळी घरी असताना गावातील सरपंच अप्पासाहेब कारभारी शिंदे, रवींद्र घुले, संभाजी सोनवणे, दत्तात्रय बोरूडे, शेखर बोरूडे, राजेंद्र कर्डिले, ज्ञानदेव भुसारी, सोमनाथ कातुरे, एडके व इतर गावातील 100 ते 150 लोक जमून आले व तुम्ही शिक्षकांविरोधात कशाला आंदोलन करता? असे म्हणून आम्हांला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

सरपंच अप्पासाहेब शिंदे याने तोंडावर बुक्का मारून मारहाण केली. संभाजी सोनवणे याने लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली. नंतर भाऊ बाबासाहेब आसाराम रावडे, रामदास आसाराम रावडे व भावजय असे सोडविण्यास आले असता वरील सर्वांनी त्यांनासुद्धा लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावरून शनिशिंगणापूर पोलिसांनी भादंवि कलम 143, 147, 148, 149, 452, 504, 506, 37(1), 37(3), 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Visits: 17 Today: 1 Total: 117228

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *