इनरव्हीलच्या माध्यमातून सेवाकार्याचा आदर्श निर्माण करणार ः मालपाणी नूतन पदाधिकार्‍यांचे पदग्रहण; मालपाणी उद्योग समूहाकडून 21 लाखांची देणगी


नायक वृत्तसेवा, संगमनेर
इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट चेअरमनपदी झालेली निवड वैश्विक संघटनेकडून मिळालेली समाजसेवेची खूप मोठी संधी आहे. डिस्ट्रिक्टमधील हजारो महिलांच्या साथीने सेवाकार्याचा नवा आदर्श निर्माण करण्यासाठी यापुढे सांघिक पातळीवर प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट 313 च्या नूतन चेअरमन रचना मालपाणी यांनी केले.

इनरव्हील क्लबच्या सर्व नूतन पदाधिकार्‍यांच्या पदग्रहण सोहळा डिस्ट्रिक्टमधील 76 शाखांमधील 630 महिलांच्या उपस्थितीत ढोले पाटील लॉन्सच्या सभागृहात पार पडला. डिस्ट्रिक्ट चेअरमनपपदी निवड झाल्यानंतर उपस्थित महिलांना संबोधित करताना मालपाणी यांनी वरील प्रतिपादन केले. यावेळी इंटरनॅशनल इनरव्हील क्लबच्या उपाध्यक्षा ममता गुप्ता, मावळत्या चेअरमन मुक्ती पानसे यांच्यासह डिस्ट्रिक्टच्या व्हाईस चेअरमन डॉ. शोभना पालेकर, सेक्रेटरी डॉ. आशा देशपांडे, खजिनदार डॉ. दीपशिखा पाठक, लता शिवशंकर, अपर्णा प्रधान, नेत्रा भक्कड, मोहिनी राठी, चारुलता चिंचणकर, स्मिता पिंगळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मालपाणी यांनी ‘शाईन अ लाईट’ या अनोख्या संकल्पनेवर यापुढील कालावधीत अधिक भर देणार असल्याचे सांगितले. नूतन टीमने डिस्ट्रिक्टमध्ये शंभर आनंदी शाळा करण्याचे महत्त्वपूर्ण लक्ष्य ठेवल्याचेही त्यांनी सांगितले. पर्यावरण रक्षणासाठी कागदाचा वापर कसा टाळता येईल यासाठी जनजागरण, महिला सबलीकरण अशा विविध लोकहितकारी प्रकल्प रबविणार असल्याचे सांगत सदस्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरविण्याचा प्रयत्न राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. मालपाणी यांनी विविध संस्कृत श्लोक, प्रेरक बोधकथा आणि कवितांचा वापर करुन केलेल्या भाषणाने उपस्थित महिला मंत्रमुग्ध झाल्या होत्या.

ममता गुप्ता व मुक्ती पानसे यांनी आपल्या मनोगतामध्ये मालपाणी यांनी इनरव्हील क्लबच्या माध्यमातून आजवर राबविलेल्या विविध प्रकल्पांचा उल्लेख करीत त्यांच्या नेतृत्त्वाखाली डिस्ट्रिक्ट क्लब सामाजिक सेवेचा नवा उच्चांक कायम राहील अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी मालपाणी उद्योग समूहाचे तरुण संचालक जय मालपाणी यांनी यावेळी इनरव्हीलच्या ‘आनंदी शाळा’ या महत्त्वकांक्षी उपक्रमासाठी 21 लाख रुपयांची देणगी जाहीर केली. सीमा अत्रे व सुनीता कोडे यांनी सूत्रसंचालन तर, डॉ. शोभना पालेकर यांनी आभार व्यक्त केले. संयोजक ज्योती कासट, दीप्ती राजूस्कर, सुनीता गाडे, संध्या मालपाणी, सुनीता कोडे, नेहा सराफ, शिल्पा नावंदर, ज्योती पलोड, वृषाली कडलग व वैशाली खैरनार यांनी विशेष परिश्रम घेतले.

Visits: 101 Today: 1 Total: 1112304

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *