ज्येष्ठनेते बाळासाहेब थोरात यांचा विधीमंडळात आक्रमक पवित्रा! विरोधी पक्षनेत्याची उणीव भरुन काढली; पदासाठी प्रबळ दावेदार असल्याचेही सिद्ध..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाविकास आघाडीतील एकामागून एक पक्ष फुटून सत्तेच्या झाडावर चढत असतांना आत्तापर्यंत वेगवेगळ्या घडामोडींनंतरही एकसंघ असलेल्या काँग्रेसमधून अत्यंत दिलासादायक चित्र समोर आले आहे. मंगळवारी विधीमंडळातील कामकाजा दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठनेते बाळासाहेब थोरात राज्यातील कायदा व सुव्यवस्थेसह निसर्गाच्या कोपाने पिचलेल्या बळीराजाची सद्यस्थिती मांडतांना प्रचंड आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. गेल्या चार दशकांच्या त्यांच्या राजकीय प्रवासात मंगळवारी दिसलेला त्यांचा आक्रमकपणा काँग्रेसमध्ये प्राण फुंकण्यासह विरोधी पक्षनेत्याशिवाय सुरु झालेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांची बूज राखणारा ठरला. त्यांची ही कृती प्रासंगिक भासत असली तरी त्यातून विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवरील त्यांचा दावा अधिक दमदार झाला असून मंगळवारच्या त्यांच्या आक्रमपणाचे प्रतिध्वनी थेट दिल्ली दरबारी उमटल्याची जोरदार चर्चा राजकीय वुर्तळात सुरु झाली आहे.


राज्यात 2014 ते 2019 या कालावधीत भाजपा-सेना महायुतीचे सरकार अस्तित्वात असतांना विधीमंडळातील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे होते. त्या कालावधीत त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्या पदावर कार्यरत होते. मात्र 2019 च्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु होताहोता त्यांनी काँग्रेसचा त्याग करुन भाजपाच्या गोटात प्रवेश केला. मात्र 2019 च्या निवडणुकांमध्ये निर्माण झालेली अवस्था राजकीयदृष्ट्या आपल्याकडे वळवून ज्येष्ठनेते शरद पवार यांनी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी या पारंपरिक जोडीसह 25 वर्ष भाजपासोबत असलेल्या शिवसेनेला आपल्याकडे वळवित महाविकास आघाडीची माळ गुंफली. त्यामुळे मुख्यमंत्रीपदी विराजमान होताहोता विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षनेतेपदी बसावे लागले.


मात्र गेल्यावर्षी एकसंघ शिवसेनेचे दोन तुकडे होवून तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत जात मूळ शिवसेनेची शकले उडविल्याने महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि भाजपा-शिवसेना (शिंदे गट) राज्यात सत्तेवर आले. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदावर संख्याबळानुसार राष्ट्रवादीच्यावतीने अजित पवार यांची वर्णी लागली. मात्र चालू महिन्यात राष्ट्रवादीतही उभी फूट पडून सलग दुसरे विरोधी पक्षनेतेही भाजपाच्या मार्गावर गेल्याने सध्या विधीमंडळातील महत्वाचे समजले जाणारे हे पद रिक्त आहे. त्यातच राष्ट्रवादीतील संभ्रम अद्यापही कायम असतांना काँग्रेसने अधिकृतपणे या पदावर दावा केलेला असतांना व त्यावरील निर्णय अद्यापही प्रलंबित असतांनाच सोमवारपासून दोन्ही सभागृहांमध्ये पावसाळी सत्राची सुरुवात झाली.


पहिला दिवस गोंधळात गेल्यानंतर मंगळवारी (ता.18) विधी मंडळाचे कामकाज सुरु होताच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांच्या विषयासह भाजपनेते किरीट सोमय्या यांच्या कथीत व्हिडिओ लीक प्रकरणावरुन दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही विषयांवर निवेदन करतांना सदस्यांना शांत केल्यानंतर विरोधकांची धार कमी झाल्याचे दिसत असतांना काँग्रेसचे ज्येष्ठनेते बाळासाहेब थोरात यांनी नगरमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी अंकुश चत्तर यांच्या खुलेआम खुनाचा विषय उपस्थित करुन राज्यात सरकारचे अस्तित्वच दिसत नसल्याचा घणाघात केल्याने विरोधी पक्षात नव्याने प्राण फुंकले गेले. अहमदनगरचे खासदार सत्ताधारी पक्षाचे आणि आता विद्यमान आमदारही सत्तेत सहभागी झालेले असतांना दुसरीकडे नगर शहरासह जिल्ह्यात वाढत असलेल्या गुन्हेगारीकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.


या प्रवृत्तींना सत्ताधारी मंडळीचे अभय आहे का? असा खडा सवाल करीत त्यांनी राज्यात सरकार नावाचे अस्तित्व असल्याचे नगरमधील गुंडांना दिसू द्या. तेथील गुंडगिरी मोडून काढण्यासाठी जात-धर्म यांचा विसर पडू द्या असे बजावतांना त्यांनी 20 जूनरोजी हिंदुत्ववादी कार्यकर्ते ओंकार भागानगरे यांचा कसा खुलेआमपणे खून झाला होता तो प्रसंग सांगितला. यावेळी झालेल्या खुनातील आरोपी सत्ताधारी पक्षाचा आहे याकडे लक्ष वेधून थोरात यांनी या गुंडांना सरकारचे समर्थन नसेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करुन दाखवण्याचे आव्हानच गृहमंत्र्यांना दिले. त्यावर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कारवाईचे आश्‍वासन द्यावे लागले. बाळासाहेब थोरात यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे उपस्थित केलेल्या प्रश्‍नावर मांडलेल्या आक्रमक भूमिकेची चर्चा विधीमंडळात सुरु असतांनाच त्यांनी नियम 293 अंतर्गत शेकर्‍यांविषयी उपस्थित चर्चेत सहभागी होत वास्तवाचे कथन करण्यास सुरुवात केली.


यावेळी त्यांनी सरकारने जाहीर केलेले कांद्यावरील अनुदान अजुनही मिळाले नसल्याचे सांगत सद्यसरकार योजनांना सुंदर नावे देते, मात्र त्याची अंमलबजावणी काही करीत नाही असे म्हणत कोपरखळीही हाणली. सरकारने 20 ते 25 योजना जाहीर केल्या, पण त्या किती खर्‍या व खोट्या हे तपासले पाहिजे असे म्हणत त्यांनी ‘मागेल त्याला शेततळे’ या सरकारी घोषणेचीही चिरफाड केली. खरीप हंगामाच्या कर्जवाटपाचा मुद्दा उपस्थित करतांना थोरात यांनी आजही 25 ते 30 टक्क्यांहून अधिक शेतकर्‍यांना कर्जच मिळाले नसल्याची बाब मांडली. यावेळी त्यांनी शेतकर्‍यांसाठी मुख्य भूमिका बजावणार्‍या जिल्हा बँकांच्या स्थितीवरही भाष्य केले.


राज्यात बियांणाचा काळा बाजार सुरु असून शेतकर्‍यांची फसवणूक होत आहे. असे असतांनाही तत्कालीन कृषीमंत्र्यांचे स्वीय्य सहाय्यक दीपक गवळी यांनी लुटारुचंी टोळी करुन कृषी दुकानदारांना कशा पद्धतीने लुटले गेले याचीही आठवण करुन दिली. दहशतीखाली आलेल्या अशा दुकानदारांना दिलासा देण्यासाठी सरकार म्हणून काय कारवाई करणार असा खडा सवालही थोरात यांनी केला. आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किंमती घसरलेल्या असतांनाही शेतकर्‍यांना वाढीव दरानेच खतांची खरेदी करावी लागत असल्याचा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करतांना त्यांचा अनुभव, अभ्यास आणि आक्रमकपणा दिसून येत होता.


सभागृहातील विरोधी पक्षनेता खंबीर आणि शासनाला जाब विचारणारा असावा लागतो. यापूर्वी या पदावर असलेले अजित पवार आज सरकारमध्ये सामील झाल्याने सदरचे पद रिक्त आहे. त्यातच सोमवारपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाल्याने विरोधकांना वाली कोण असे सवाल विचारले जात असतांनाच राज्यातील गुन्हेगारी, पर्जन्यमान आणि शेतकर्‍यांचे विविध प्रश्‍न या विषयांवर ज्येष्ठनेते बाळासाहेब थोरात यांनी अतिशय आक्रमक पवित्रा घेत विरोधकांच्यावतीने सरकारवर आसूड ओढल्याने रिक्त असूनही विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीची कमतरता मात्र त्यांनी भासू दिली नाही. त्यामुळे विधीमंडळाच्या विरोधी पक्षनेतेपदी अशोक चव्हाण, नाना पटोले व विजय वडेट्टीवर यांच्या नावांच्या चर्चेने काहीसे मागे पडलेले बाळासाहेब थोरात यांचे नाव पुन्हा एकदा अग्रभागी आले असून मंगळवारच्या कामकाजाची दखल थेट दिल्ली दरबारने घेतल्याचे समजत असल्याने या पदासाठी थोरात यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.


अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधानसभेतील विरोधीपक्षनेते पदावर संख्याबळानुसार काँग्रेसने दावा केला आहे. त्यामुळे या पदावर वर्णी लावण्यासाठी काँग्रेसमधील अशोक चव्हाण, नाना पटोले व विजय वडेट्टीवर यांच्यासारख्या नेत्यांनी जोरदार ‘लॉबिंग‘ सुरु केलेले असतांना मंगळवारी ज्येष्ठनेते बाळासाहेब थोरात यांनी आपला प्रदीर्घ अनुभव आणि अभ्यासाच्या जोरावर एकतर्फी धुवाँधार बॅटींग केल्याने या सर्वांची नावे मागे पडून थोरात यांचे नाव पुन्हा एकदा अग्रभागी आले आहे. मंगळवारच्या कामकाजाचे प्रतिध्वनी दिल्लीपर्यंत पोहोचले असून लवकरच त्यावर निर्णय होण्याचीही शक्यता आहे.

Visits: 245 Today: 1 Total: 1590884

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *