पुण्यानंतर आता संगमनेरातही ‘कोयता गँग’ची दहशत! भरचौकात दुकानदारासह महिलेला लुटले; हवेत ‘कोयता’ फिरवित हप्त्याची मागणी..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
मध्यंतरी पुण्यातील गजबजलेल्या पेठांमध्ये हातात कोयता घेवून दहशत माजवणार्‍या टोळीने अवघा महाराष्ट्र हादरवला असतानाच आता त्याचे लोण थेट संगमनेरपर्यंत येवून पोहोचले आहे. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास पुणे स्टाईल हातात कोयता घेवून आलेल्या आठजणांच्या सशस्त्र टोळीने श्रीरामनगरमधील एका दुकानदारासह रस्त्याने जाणार्‍या महिलेवर दहशत निर्माण करुन दोघांच्याही गळ्यातील सोनसाखळ्यांसह दहा हजारांची रोकड असा एकूण चार लाखांचा मुद्देमाल लांबवला. भरचौकात घडलेल्या शहरातील या पहिल्याच धक्कादायक प्रकारानंतर सशस्त्र गँगने हवेत कोयता फिरवताना आसपासच्या व्यापार्‍यांनाही धाकात घेत ‘धंदा करायचा असेल तर, सगळ्यांना हप्ता द्यावा लागेल..’ अशी धमकी भरीत परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार समोर येताच पोलिसांनी छापासत्र राबवून मुख्य आरोपीसह तिघांना अटक केली असून उर्वरीत पाचजण पसार झाले आहेत. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून या गँगवर आजवर असंख्य गुन्हे दाखल असतानाही शहरात त्यांचा वावर कसा? असा प्रश्‍न विचारला जावू लागला आहे.


याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार मंगळवारी (ता.9) शहरातील श्रीरामनगर या अतिशय गजबजलेल्या ठिकाणी घडला. या प्रकरणातील फिर्यादी शिरीष शहाणे यांचे श्रीरामनगर परिसरात बालाजी कार दुरुस्ती व वाहनांच्या सुट्या भाग विक्रीचे दुकान आहे. मंगळवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे शहाणे आपल्या दुकानातील कर्मचारी बाळासाहेब भुजबळ यांच्यासमवेत आपल्या कामात व्यस्त असतानाच त्यांच्या दुकानाशेजारील एका मोकळ्या इमारतीत नेहमीच दारु पिणारे सात ते आठजण त्या इमारतीपासून थेट त्यांच्या दुकानाजवळ आले. त्यावेळी त्यांच्यातील एकाच्या हातात कोयता होता. अचानक समोर आलेल्या इतक्या लोकांना पाहुन दुकानदाराने कोण आहे म्हणून समोर पाहिले असता त्यात धिरज पावडे, पिल्या घोडेकर, वरद लोहोकरे, दीपक वैराळ, संदीप संजय वाल्हेकर उर्फ जब्या, निखिल उर्फ अजय विजय वाल्हेकर यांच्यासह अन्य अनोळखी दोघे उभे असल्याचे त्यांना दिसले.


यावेळी कोणतेही कारण नसताना त्या सर्वांनी दुकानदाराला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यातील काहींनी थेट शहाणे यांच्या दुकानात अनाधिकाराने प्रवेश करुन त्याच्यासह भुजबळ यांची कॉलर पकडून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. धिरज पावडे याने त्याच्या हातातील कोयत्याचा धाक दाखवत लाथाबुक्क्यांचा वापर सुरु केला. यावेळी दोघेही मारेकर्‍यांसह आसपास जमलेल्या बघ्यांना ‘आम्हाला वाचवा, मदत करा..’ अशी विनवणी करीत असताना पावडेने सिनेस्टाईल हातातील कोयता हवेत फिरवत ‘खबरदार, जर कोणी पुढे याल तर, याद राखा. त्यालाही तोडून टाकील..’ असे दरडावताना ‘आम्हाला हप्ता चालू करायचा, नाहीतर दुकानाची तोडफोड करुन जाळून टाकू’ अशी धमकी भरल्याने कोणीही नव्याने जन्माला आलेल्या या कोयत्या गँगसमोर जाण्याची हिम्मत दाखवली नाही.


बाहेर जमलेली मंडळी ‘कोयत्या’च्या दहशतीत येवून गुपचूप उभी राहिल्याची खात्री पटताच या गँगने पुन्हा आपला मोर्चा ‘त्या’ दोघांकडे वळवून त्यातील दोघांनी त्यांना मारहाण सुरु केली व भुजबळ यांच्याकडून गल्ल्याची चावी काढून घेत त्यात ठेवलेली दहा हजारांची रक्कम काढून घेतली. तर, पावडेने कोयत्याचा धाक दाखवून दुकानदाराच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाची सोन्याची साखळी ओरबाडून घेतली. असंख्य लोकांची उपस्थिती असतानाही अचानक घडलेल्या या भयानक प्रकाराने भयभीत झालेल्या शहाणेंनी या घटनेनंतर घाईघाईत दुकान बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पायी जाताजाता या गँगने जिजामाता उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळून जाणार्‍या भाग्यश्री दिलीप गायकवाड या महिलेलाही धाक दाखवून तिच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे मंगळसूत्र ओरबाडून घेतले व कोयता गँग तेथून पसार झाली.


भयभीत झालेल्या शिरीष शहाणे यांनी आपल्या कर्मचार्‍यासह शहर पोलीस ठाण्यात येवून घडला प्रकार सांगितला असता पोलिसांनी तत्काळ छापासत्र राबवून कोयता गँगचा सूत्रधार धिरज पावडे याच्यासह दीपक वैराळ व संदीप संजय वाल्हेकर उर्फ जब्या अशा तिघांना जेरबंद केले असून उर्वरीत आरोपी मात्र अंधाराचा फायदा घेवून पसार झाले आहेत. मध्यंतरीच्या काळात पुण्याच्या वेगवेगळ्या भागात अशाच पद्धतीने कोयता गँगची दहशत निर्माण झाली होती. मात्र पुणे पोलिसांनी मोठ्या शिताफीने एक-एक करीत तेथील गँग संपवली. आता त्याचे लोण संगमनेरपर्यंत पसरले असून शहरात बहुधा पहिल्यांदाच आठजणांच्या टोळीने हातात कोयता घेवून दहशतही माजवली आणि शस्त्राच्या बळावर भरचौकातील एका दुकानदारासह रस्त्याने जाणार्‍या महिलेला लुटून तब्बल चार लाखांचा ऐवजही लांबवला.


या प्रकरणी पोलिसांनी वरील निष्पन्न सहाजणांसह अज्ञात दोघांवर दरोड्यासह इच्छपूर्वक दुखापत, शांततेचा भंग व फौजदारी धाकदपटशा करण्याच्या कलम 310 (2), 115 (2), 352, 351 (2) सह भारतीय शस्त्र कायद्याच्या कलम 4/25 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक इम्रान खान यांच्याकडे देण्यात आला आहे. या प्रकाराने संगमनेर शहरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणात सहभागी आरोपींवर यापूर्वीही असंख्य गंभीर गुन्ह्यांची नोंद असताना ते शहरात मोकाट कसे असा प्रश्‍न विचारला जावू लागला आहे.


मध्यंतरीच्या काळात पुण्याच्या विविध भागांमध्ये हातात कोयता घेवून कोणालाही धमकावण्याचे व लुटण्याचे एकामागून एक प्रकार समोर आल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. अतिशय कमी कालावधीत पुण्याच्या चौफेर पसरलेली कोयता गँगची दहशत मोडून काढताना पुणे पोलिसांची अक्षरशः दमछाक झाली होती. मात्र त्या उपरांतही पुण्यातील अशा टोळ्यांची दहशत संपवण्यात पोलिसांना यश आल्यानंतर आता पुण्यापासून दीडशे किलोमीटर अंतरावरील संगमनेर शहरात पहिल्यांदाच कोयता गँगचा जन्म झाल्याचे समोर आले असून या टोळीच्या पहिल्याच कारवाईत एका दुकानदारासह महिलेला लुटल्याचा प्रकार घडल्याने शहर पोलिसांनी ‘कोयता गँग’चे लोण गावभर पसरण्यापूर्वीच सर्व आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांना जेरबंद करण्याची गरज आहे.

Visits: 90 Today: 3 Total: 1102703

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *