पोलीस निरीक्षकांच्या कार्यपद्धतीवर जनतेला विश्वास नाही! राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन; ‘खमक्या’ अधिकार्याच्या नियुक्तिची मागणी..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारणारे पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन आपल्या पहिल्याच सार्वजनिक बैठकीत वादग्रस्त ठरल्यानंतर आता शहरातूनही त्यांच्या येथील नियुक्तिला विरोध होवू लागला आहे. ‘त्या’ बैठकीतील त्यांच्या वागणुकीचा धागा पकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार) गणेशोत्सवापूर्वीच त्यांची बदली करण्याची जोरदार मागणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पक्षाचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी पोलीस उपअधिक्षकांकडे दिलेल्या निवेदनात त्यांच्या बदलीची मागणी केली असून महाजन यांच्या कार्यपद्धतीवर संगमनेरकरांना विश्वास नसल्याचाही आरोप केला आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर पोलीस निरीक्षकांवरुन शहरातील सार्वजनिक वातावरण गढूळ होवू लागल्याने पोलीस अधिक्षक त्यातून कोणता मार्ग काढतात हे पाहणं आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
गेल्या 21 ऑगस्टरोजी जिल्हा विशेष शाखेतून संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्याची सूत्रे हाती घेणार्या पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांनी ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर मंगळवारी (ता.2) घाईघाईत शांतता समितीची बैठक बोलावली. नियोजनशून्य ठरलेल्या या बैठकीसाठी शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकार्यांसह विविध संस्था, संघटना, राजकीय पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांना निमंत्रण देण्याची आवश्यकता असताना त्यांनी केवळ बैठकीचा ‘फार्स’ राबवण्याच्या उद्देशाने ठराविक जणांनाच आवतणं धाडल्याने या बैठकीच्या रुपाने पहिली नाराजी निर्माण झाली. त्यातून सावरण्याची रुजवात होण्यापूर्वीच त्यांनी आपल्या पहिल्याच बैठकीत संगमनेरातील सामाजिक कार्यकर्त्यांना ‘कायद्यात रहाल तर, फायद्यात रहाल’ असा सिनेस्टाईल डायलॉग हासडून ‘खाकी’चा जोश दाखवण्याचा प्रयत्न केला.
त्यातून उडालेल्या खडाजंगीतून त्यांची कार्यपद्धती संगमनेरसारख्या संवेदनशील शहरासाठी पोषक नसल्याचेही उपस्थित वरीष्ठ अधिकार्यांसमोरच स्पष्ट झाले. त्यामुळे आगामी गणेशोत्सवात संगमनेरचा भार त्यांच्याच खांद्यावर राहिल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भितीही शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकार्यांमधून वर्तवण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार) पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांना निवेदन देत शहराचे सामाजिक वातावरण, येथील गणेशोत्सवाची परंपरा आणि आगामी कालावधीतील निवडणुकांचा ऊहापोह करीत पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांच्या बदलीची मागणी केली आहे.
याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, येणार्या काळात अनेक सण-उत्सव साजरे होण्यासह विधानसभेच्या निवडणुकाही दृष्टीपथात आहेत. संगमनेर हे अत्यंत संवेदनशील व भावनिक शहर असून येत्या शनिवारी (ता.7) गणरायाचे आगमन होत आहे. त्या पुढील दहा दिवस शहरात विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसह विसर्जन मिरवणूक हा अत्यंत संवेदनशील विषय पार पडणार आहे. याच कालावधीत पोलीस उपअधिक्षकांची पदोन्नतीवर बदली झाली आहे. त्यातच शहरात आलेले पोलीस निरीक्षक अद्यापही ‘नविनच’ असले तरीही त्यांच्या कार्यपद्धतीवर मात्र संगमनेरकरांना अजिबात विश्वास नाही. विशेष म्हणजे त्यांचीही बढतीवर बदली होवूनही त्यांना संगमनेरात थांबवण्यात आले आहे.
उत्सवाच्या काळात संगमनेर शहरात एखाद्या खमक्या आणि जबाबदार अधिकार्याची गरज आहे. या विषयावर गांभीर्याने विचार करुन योग्य ती कारवाई करावी व एखाद्या खमक्या अधिकार्याबाबत योग्य शिफारस करावी अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. तसेच, गणेश विसर्जनाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार अथवा दुर्घटना घडणार नाही यासाठी पोलीस व पालिका प्रशासनाने समन्वयाने उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणीही करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रति राज्याच्या गृहमंत्र्यांसह पालकमंत्री व जिल्हा पोलीस अधिक्षकांनाही पाठवण्यात आल्या आहेत. त्यावर शासन अथवा पोलीस अधिक्षक काय कारवाई करतात याकडे आता संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे.
सहा वर्षांपूर्वीपर्यंत दरवर्षी गणेश विसर्जनादरम्यान प्रवरा नदीपात्रात बुडिताच्या घटना घडल्या आहेत. त्यावर उपाय योजतांना तत्कालीन उपविभागीय अधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, पोलीस उपअधिक्षक रोशन पंडित, तहसीलदार अमोल निकम, मुख्याधिकारी सचिन बांगर, राहुल वाघ व पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व एकविरा फौंडेशनच्या सहकार्याने विसर्जनाची आदर्श पद्धत रुजवली. त्यामुळे गेल्या सहा वर्षात गणेश विसर्जनाच्या दिनी एकाही अप्रिय घटनेची नोंद झालेली नाही. यंदा मात्र सगळीच परिस्थिती विस्कळीत असल्याचे दिसत असून पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांनी बोलावलेल्या शांतता समितीच्या बैठकीत वरील पदावर असलेल्या आजच्या अधिकार्यांच्या अनुपस्थितीसह उपस्थित झालेला वाद आणि विसर्जनाचा मुख्य घटक असलेल्यांनाच बैठकीतून टाळण्याचा प्रकार धोकादायक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.