‘भारतीय लोकशाहीचा इतिहास ः भ्रम आणि वास्तव’ हे पुस्तक ठरणार विद्यार्थ्यांना उपयुक्त
‘भारतीय लोकशाहीचा इतिहास ः भ्रम आणि वास्तव’ हे पुस्तक ठरणार विद्यार्थ्यांना उपयुक्त
राज्यसभा सचिवालयाचे सेवानिवृत्त संयुक्त सचिव लक्ष्मण शिंदे यांनी ग्रंथित केले पुस्तक
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावचे सुपुत्र व दिल्ली राज्यसभा सचिवालयाचे सेवानिवृत्त संयुक्त सचिव लक्ष्मण शिंदे यांनी वेद काळापासून आजपर्यंत भारत वर्षाच्या लोकशाहीचा अभ्यास करून ‘भारतीय लोकशाहीचा इतिहास ः भ्रम आणि वास्तव’ हे पुस्तक लिहिले आहे. भारत वर्षाच्या हजारो वर्षांच्या गौरवशाली इतिहासातील दुर्मिळ माहिती मनोरंजक घटनांसह या पुस्तकात ग्रंथित केली असून हे पुस्तक उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणार आहे.

लक्ष्मण शिंदे हे 1982 मध्ये मुंबई विद्यापीठात पीएचडी करत असताना त्याचवेळी त्यांना भारतीय संसदेचे ‘राजपत्रित अधिकारी’ म्हणून नियुक्त केले गेले. त्यानंतर त्यांनी लंडन येथील ‘रिपा इंटरनॅशनल’ या संस्थेमध्ये ‘पार्लमेंट्री अॅडमिनिस्ट्रेशन’चे प्रशिक्षण पूर्ण केले आणि ब्रिटीश पार्लमेंटच्या हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्डच्या कार्यपद्धतीचे अध्ययन केले. शिंदे यांनी जवळ-जवळ 33 वर्षे संसदेत अनेक पदांवर कार्यरत राहून त्यानंतर ते संयुक्त सचिव म्हणून सेवानिवृत्त झाले.

भारत वर्षाच्या लोकशाहीचा इतिहास प्राचीन आहे. त्या प्राचीन इतिहासाचे त्यांनी सखोल अध्ययन व संशोधन केले आणि वर्तमान आधुनिक संसदीय लोकशाही शासनव्यवस्थेचे केलेले अवलोकन आणि संशोधन त्यांनी या पुस्तकाच्या रूपाने संग्रहित केले आहे. दिल्ली राज्यसभेचे माजी महासचिव (आय.ए.एस) डॉ.विवेककुमार अग्निहोत्री यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली असून डायमंड पब्लिकेशन, पुणे यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. वैदिक काळ, रामायण काळ, महाभारत काळ, बौद्ध काळ, राजा-महाराजा आणि सम्राटांचा काळ, यूरोपियनांचा काळ, ईस्ट इंडिया कंपनीचा काळ आणि शेवटी इंग्रज राजशाहीद्वारे भारतावर नियंत्रण केल्यानंतर भारतात लोकशाही परंपरा कशाप्रकारे लागू केल्या याचे वास्तव लेखन केले आहे. या पुस्तकात अनेक अप्रकाशित घटनांचा सुद्धा उल्लेख केला आहे. देशाचे संविधान लागू झाल्यानंतर देशाची संसद कसे कार्य करते याची माहिती भारतीय संसदेची कार्यपद्धती या प्रकरणात पहायला मिळते. याशिवाय जगातल्या अनेक देशांमध्ये समकालीन लोकशाही व्यवस्था, देशाचे विभाजन आणि स्वातंत्र्य, संविधान सभा या समावेशांसह हे पुस्तक भारतीय लोकशाही इतिहासावर लिहिलेला एक संपूर्ण ग्रंथ असून या पुस्तकाचा वाचक विद्यार्थी असेल असे गृहीत धरून पुस्तकाची रचना अत्यंत सोप्या भाषेत केली आहे.

