राज्यात शस्त्रांबाबतची नियमावली कठोर हवी सत्यजीत तांबेंचे पोलीस महासंचालकांना पत्र

नायक वृत्तसेवा, संगमनेर
बंदुक किंवा कायदेशीर परवाना असलेलं शस्त्र वापरताना निष्काळजीपणे त्यातून गोळी सुटल्याने मृ्त्यू झाल्याच्या घटना थांबविण्यासाठी कठोर नियमावली अमलात आणावी, अशी मागणी काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना पत्र पाठवून काही सूचनाही केल्या आहेत.

जुलै महिन्यात सत्यजीत तांबे यांच्या अहमदनगर जिल्ह्यात अशा प्रकारच्या दोन घटना घडल्यानंतर तांबे यांनी तातडीने याबाबत उपाय करण्याच्या दृष्टीने हे पत्र लिहिले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे जिल्हा बँक शाखेच्या आवारात एका साखर कारखान्याच्या सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून अनावधानाने सुटलेल्या गोळीमुळे एका 42 वर्षीय व्यक्तीचा मृ्त्यू झाल्याची घटना घडली. त्यानंतरही जिल्ह्यात अशीच एक घटना घडली. सुरक्षा रक्षकाकडून बंदुकीचा चाप कसा ओढला गेला, गोळी कशी सुटली, याबाबत काहीच माहिती मिळाली नाही. मात्र त्यामुळे शस्त्रास्त्रे बाळगण्याचा परवाना असलेल्यांना ती कशी हाताळावी याची माहिती असे का, त्या शस्त्रांची निगा राखली जाते का, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले.

राज्यातील अनेक बँका, एटीएम सेंटर, रुग्णालये, मॉल, कंपन्या, शिक्षणसंस्था, कार्यालये अशा सार्वजनिक ठिकाणी सुरक्षारक्षक तैनात असतात. काही धनिक मंडळीही सोबत खासगी सुरक्षारक्षक ठेवतात. यातील काहींकडे शस्त्र देखील असते. अशा सुरक्षा रक्षकांचं ऑडिट होणं, त्यांच्याकडे असलेल्या शस्त्रांची, ती चालवण्याचं ज्ञान संबंधित व्यक्तीकडे आहे का, अशा गोष्टींची तपासणी होणं गरजेचं आहे, असं सत्यजीत तांबे यांनी या पत्रात म्हटलं आहे. तांबे यांच्या पत्रात म्हटल्याप्रमाणे सुरक्षा रक्षक म्हणून अनेकदा सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना नेमलं जातं. त्यांनी अनेक वर्षे शस्त्रं वापरली नसतात अशा कर्माचार्‍यांच्या हातात अचानक बंदुक देऊन सुरक्षेची जबाबदारी सोपवली जाते. स्त्र नियम 2016 नुसार शस्त्रास्त्रे चालवण्याचं ज्ञान असलेल्यांनाच ती बाळगण्याची परवानगी दिली जाते असे असताना अशा दुर्घटना घडत असतील, तर परवाना असूनही शस्त्र बाळगण्यासाठीचं पुरेसं ज्ञान आणि सराव नसणे किंवा अवैध शस्त्रे बाळगणार्‍यांचा सुळसुळाट ही दोन कारणे असू शकतात, याकडेही सत्यजीत तांबे यांनी लक्ष वेधलं. तसेच शस्त्रनियम 2106 यातील हे नियम अधिक कठोर करण्याची गरज त्यांनी स्पष्ट केलं.

या पत्राद्वारे तांबे यांनी शस्त्रास्त्र नियमांबद्दल काही सूचनाही पोलीस महासंचालकांना केल्या आहेत. त्यानुसार सशस्त्र सुरक्षा रक्षक नेमताना त्याला ते शस्त्र चालवण्याचं आणि देखभाल दुरुस्तीचं ज्ञान असणं बंधनकारक करणं, शस्त्र हाताळण्याचा तीन ते सहा महिन्यांपेक्षा जुना नसलेला दाखला असणं, शस्त्रधारकाने ठरावीक काळाने त्या शस्त्राच्या परिस्थितीबद्दल माहिती सादर करणं, अवैध शस्त्र खरेदी-विक्रीला आळा घालणं, उचित कारणाशिवाय कोणत्याही प्रकारच्या शस्त्रांचे व्यासपीठावरील प्रदर्शन हा गुन्हा ठरवणं, आदी महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख आहे. या उपाययोजनांची शक्यता पडताळून तसेच पोलीस खाते किंवा या संदर्भातील तज्ज्ञ व्यक्तींकडून याबद्दल अभिप्राय मागवून या सूचना त्वरीत लागू कराव्या, अशी विनंती सत्यजीत तांबे यांनी पोलीस महासंचालकांकडे केली आहे.

Visits: 138 Today: 1 Total: 1113041

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *