वृद्ध माता-पित्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण जातप येथील गंभीर प्रकार; राहुरी पोलिसांत मुलाविरुद्ध गुन्हा

नायक वृत्तसेवा, राहुरी
ज्याला जन्म दिला, पोटाला चिमटे घेऊन लाडात वाढविले, त्यानेच वृद्ध माता-पित्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. गंभीर जखमी माता-पित्यांवर अहमदनगर येथे उपचार घेण्याची वेळ आली. ‘मुलगा ना तू वैरी…’ असे म्हणण्याची दुर्दैवी वेळ जन्मदात्यांवर आली.

राहुरी तालुक्यातील जातप येथे हा गंभीर प्रकार घडला. याप्रकरणी राहुरी पोलिसांत आईने मुलाविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी संतोष मुरलीधर मुसमाडे (रा. जातप, ता. राहुरी) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जमुना मुरलीधर मुसमाडे (वय 65, रा. जातप) यांनी फिर्यादीत म्हटले आहे, की मोठा मुलगा संतोष कुटुंबासह शेजारी स्वतंत्र राहतो. 24 जून रोजी दुपारी 12 वाजता घरासमोर उभी असताना संतोष दारू पिऊन आला. ‘तुम्ही माझ्या पिकाला पाणी का दिले नाही? तुम्ही पाणी न दिल्याने शेतातील पीक वाळून गेले आहे,’ असे म्हणाला.

त्यावर त्याला, ‘आमचे वय झाले आहे. तुझी शेती तू पाहून घे,’ असे म्हटल्याचा राग आला. त्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. पती सोडविण्यासाठी आले. त्यांनाही शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. पती गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असेही फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेने तालुक्यासह जिल्ह्यातून संताप व्यक्त होत आहे.
