तालुक्यातील कोविड बाधितांमध्ये आजही पडली बावीस रुग्णांची भर! ज्येष्ठ नागरिकांचा लसीकरणाला किरकोळ प्रतिसाद; खासगी लसीकरण केंद्र अद्यापही बंदच..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
जानेवारीत थंडावलेल्या कोविडच्या संक्रमणाने मानवीय चुकांमुळे पुन्हा वेग घेतला असून दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण समोर येण्याचा सिलसिला सुरुच आहे. सोमवारी तालुक्यातील 41 रुग्ण समोर आल्यानंतर आज सकाळीही रुग्णवाढीची श्रृंखला कायम राहतांना 22 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील रुग्णांची संख्या आता झपाट्याने सात हजारांच्या दिशेने मार्गक्रमण करीत 6 हजार 950 वर जावून पोहोचली आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सोमवारपासून (ता.1) ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाला देशभरात सुरुवात झाली. संगमनेरातील खासगी लसीकरण केंद्र मात्र अद्याप सुरु झाले नसून ग्रामीण रुग्णालयातून अवघ्या चौघांनी लसीकरण केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
जानेवारीपासून संगमनेर तालुक्यात शिगेला पोहोचलेला कोविडचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र निर्माण झाले होते. पोलीस व पालिका प्रशासनाकडून कोविडबाबतच्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी दंडात्मक कारवाईची प्रक्रीयाही सुरु असल्याने नववर्षाचा पहिला महिना संगमनेरकरांसाठी समाधानकारकच ठरला होता. तत्पूर्वी डिसेंबरमध्ये तालुक्यातील कोविड रुग्णवाढीचा दर थेट 36 वर होता, जानेवारी संपता संपता तो 9.71 इतक्या खालच्या पातळीवर आल्याने तालुक्यातील कोविडस्थिती पूर्णतः नियंत्रणात आल्याचेही दृष्य दिसू लागले होते.
मात्र फेब्रुवारीत शहर व तालुक्यातील काही पांढरपेशे व काही नागरिकांच्या घरातील विवाह सोहळ्यांना मोठी गर्दी झाली. या सोहळ्यांमध्ये गर्दी सोबतच मुखपट्टी व सामाजिक अंतराचेही पालन न झाल्याने जानेवारीने सुधारलेल्या स्थितीवर फेब्रुवारीने पाणी फेरले. या सगळ्यांचा परिणाम गेल्या महिन्याच्या पहिल्या सात दिवसांतच रुग्णगतीने वेग घेत 9.71 वरुन 11.14 ची सरासरी गाठली. त्यानंतरच्या सात दिवसांत रुग्णवाढीला काही प्रमाणात ब्रेक लागून ती 9 रुग्ण प्रती दिवसापर्यंत खाली आली. मात्र त्यानंतर पुन्हा काहींचे लग्नकार्य अगदी धुमधडाक्यात आणि शेकडोंच्या उपस्थितीत पार पडल्याने त्याचे दुष्परिणाम सुरु झाले ते आजही कायम आहेत.
गेल्या 17 फेब्रुवारीपासून तालुक्यातील रुग्णवाढीचे आकडे रोज नवनवीन विक्रम करणारे ठरत असून सामान्य नागरिकांच्या मनात कोविडने पुन्हा एकदा दहशत निर्माण केली आहे. त्या साखळीत सोमवारी (ता.1) सकाळी 41 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्रात झालेले असतांना आज सकाळीच त्यात आणखी 22 जणांची भर पडली आहे. अर्थात आज समोर आलेले रुग्ण सोमवारी शिल्लक राहीलेल्या अहवालातीलच असल्याने गेल्या काही महिन्यांनंतर इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण समोर येण्याचा नवा विक्रमही झाला आहे. कोविड नियमांकडे दुर्लक्ष करुन शेकडोंच्या गर्दीत साजरे होत असलेले ‘गुपचूप’ विवाह कोविडचा संक्रमण वाढण्यास कारणीभूत ठरत असल्याचेही आता स्पष्टपणे समोर आले असून असे विवाह सोहळे आयोजित करणारेही कोविडने जायबंदी झाले आहेत.
आज (ता.2) सकाळी प्राप्त झालेल्या अहवालातून पुन्हा 22 रुग्ण समोर आले असून त्यात शहरातील सात जणांचा समावेश आहे सोमवारी गणेशनगर येथील 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, बाजारपेठेतील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 60 वर्षीय महिला, वकील कॉलनीतील 56 व 31 वर्षीय महिला आणि अभिनव नगरमधील 82 व 44 वर्षीय महिलांना कोविडचे संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. त्यासोबतच ग्रामीणभागातील पंधरा जणांचे अहवालही पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात आश्वी खुर्दमधील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, शिबलापूरमधील 57 वर्षीय इसम व 48 वर्षीय महिला, उंबरी बाळापूर येथील 35 वर्षीय तरुण, निमज येथील 52 वर्षीय इसम, संगमनेर खुर्दमधील 23 वर्षीय दोघींसह 22 वर्षीय तरुणी, कासारा दुमाला येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकसह 28 वर्षीय तरुण, वेल्हाळे येथील 40 वर्षीय तरुण, गुंजाळवाडीतील 30 वर्षीय महिला, घुलेवाडीतील 46 वर्षीय इसमासह 37 वर्षीय महिला आणि धांदरफळ खुर्दमधील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तालुका आता सात हजार रुग्णसंख्येच्या जवळ जातांना 6 हजार 950 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे.
सोमवारी (ता.1) देशभरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरणाला सुरुवात झाली. संगमनेरातही पाच ठिकाणी लसीकरण केंद्र जाहीर करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात अवघ्या चार ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली, तर उर्वरीत खासगी लसीकरण केंद्र सुरुच झाली नसल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप कचेरिया यांनी दिली. घुलेवाडीत मात्र ठरलेल्या वेळेत लस उपलब्ध असूनही ज्येष्ठ नागरिकांचा मात्र निरुत्साह पहायला मिळाला.