पालिकेच्या शवविच्छेदन गृहाबाबत आक्रोश! बारा तास मृतदेह पडून; मयतांच्या नातेवाईकांचा मोठा संताप..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यात घडणार्‍या विविध अपघाती व अन्य घटनांमध्ये मयत झालेल्या व्यक्तींचे शवविच्छेदन पालिकेच्या शवविच्छेदनगृहात केले जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून काही वैद्यकीय अधिकारी मनमानी पद्धतीने काम करीत असल्याने आज नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाल्याचे पहावयास मिळाले. शुक्रवारी तालुक्याच्या वेगवेगळ्या भागातील अशा घटनांमध्ये दोन महिलांसह पाचजणांचा बळी गेला. त्या सर्वांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथे आणण्यात आले होते. मात्र बारा ते पंधरा तासांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही त्यांचे शवविच्छेदन न झाल्याने ताटकळत असलेल्या मयतांच्या नातेवाईकांच्या संयमाचा उद्रेक झाला आणि काहींनी थेट पालिकेच्या कार्यालयात जावून आपला आक्रोश व्यक्त केला.

सतत अपघात आणि अन्य घटनांमुळे व्यस्त असलेल्या संगमनेर नगरपालिकेच्या शवविच्छेदन गृहातून आता संतापजनक प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी जवळे कडलग येथे ज्योती पाटेकर या 48 वर्षीय महिलेचा विहिरीत तरंगणारा मृतदेह आणि पेमगिरी येथील पुष्पा डुबे या 42 वर्षीय महिलेचा शेततळ्यात तरंगणार्‍या मृतदेहासह निमगाव टेंभी येथील आत्महत्या केलेल्या अश्विन वर्पे, रात्री निळवंडे येथे अपघात झालेल्या अनुकूल मेंढे व कोकणगाव येथील अपघातात मरण पावलेल्या अमोल सानप अशा पाचजणांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथे आणण्यात आले होते.

अपवादात्मक परिस्थिती वगळता सूर्यास्तानंतर उत्तरीय तपासण्या होत नसल्याने नियमाने या पाचही जणांच्या मृतदेहाची आज (ता.3) सकाळी उत्तरीय तपासणी होणे आवश्यक होते. मात्र प्रत्यक्षात दुपारचे बारा वाजूनही संबंधित वैद्यकीय अधिकारी शवविच्छेदन गृहाकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे आपल्या आप्ताचा मृतदेह घेण्यासाठी सकाळपासून शवविच्छेदन गृहाबाहेर ताटकळत बसलेल्या मृतांच्या नातेवाईकांचा संताप उसळून आला. त्यातील काहींनी तेथून थेट पालिकेच्या कार्यालयात जावून आपला संताप व्यक्त केला.

वास्तविक सदरचे शवविच्छेदनगृह पालिकेचे असले तरीही तेथे येणार्‍या मृतदेहांची उत्तरीय तपासणी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांकडून केली जाते. मात्र त्यातील काही अधिकारी मानवतेला तिलांजली देवून मनमानी पद्धतीने वागत असल्याने अनेकदा मृतांच्या नातेवाईकांचा संतापही होतो, मात्र माणसं दुखःत असल्याने आजवर त्याचा उद्रेक झाला नव्हता. आज मात्र या सर्व गोष्टी उफाळून बाहेर पडल्या. शवविच्छेदन गृहात तब्बल पाच-पाच मृतदेह बारा ते पंधरा तासांपासून उत्तरीय तपासणीसाठी पडून असतानाही संबंधित वैद्यकीय अधिकार्‍यांना त्याचे गांभीर्य समजले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या मयतांच्या नातेवाईकांनी आज सकाळी शवविच्छेदन गृहासह पालिकेच्या कार्यालयात जावून आपला संताप व्यक्त केला. त्यामुळे पालिकेतील वातावरण काहीकाळ तणावपूर्ण बनले होते. या उद्रेकातून वैद्यकीय अधिकार्‍यांवरच हल्ला होवू नये यासाठी चक्क पोलिसांनाही पाचारण करावे लागले होते. त्यावरुन ग्रामीण रुग्णालयाच्या काही वैद्यकीय अधिकार्‍यांमुळे येथील परिस्थिती बिघडण्याचीही शक्यता निर्माण झाली होती. मानवतेला काळीमा फासणार्‍या या प्रकाराची संबंधितांनी गांभीर्याने नोंद घेण्याची व दोषींवर कारवाईची गरजही यावेळी व्यक्त केली गेली.

Visits: 80 Today: 1 Total: 432342

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *