तिरडे येथील आदिवासींच्या धर्मांतराचा कार्यक्रम कार्यकर्त्यांनी उधळला! चर्चचे भूमिपूजनही रोखले; ग्रामस्थांचे कारवाई करण्याबाबतचे पोलिसांना निवेदन

नायक वृत्तसेवा, अकोले
नाताळचे औचित्य साधून टाकेद (ता.इगतपुरी) येथील फादर व त्यांचे अनुयायींनी तिरडे येथील कचरू सखाराम सारुक्ते यांचे मालकीच्या जमिनीवर ‘सियोन प्रार्थना केंद्र’ म्हणजे चर्चचे भूमिपूजन आयोजित करून त्यात आदिवासींच्या धर्मांतराचा कार्यक्रम ठेवला होता. याची कुणकुण आदिवासी विकास परिषद व कार्यकर्त्यांना लागताच त्यांनी आदिवासी भागातील आपल्या कार्यकर्त्यांसह तिरडे येथे जाऊन ‘हर हर महादेव, जय आदिवासी’ म्हणत हा कार्यक्रम उधळून लावला आणि बळजबरीने होणारे गरीब, अज्ञानी आदिवासींचे धर्मांतर रोखले. यावेळी भूमिपूजन करणार्‍या व्यक्तींची पळता भुई थोडी झाल्याचे पहायला मिळाले. कार्यकर्त्यांनी त्यांचा पाठलाग केला मात्र ते सापडले नाही. तर साधकांनाही गावातून बाहेर काढून दिले.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, गेल्या अनेक दिवसांपासून तिरडे, पाडोशी, एकदरे, देवगाव, भंडारदरा या परिसरात टाकेद (ता.इगतपुरी) येथील फादर व त्यांचे ठेकेदार आदिवासी भागात फिरून आदिवासींना तुमचे आजार बरे करू असे सांगत आपल्या धर्माकडे आकर्षित करत असल्याची चर्चा या परिसरात होती. 25 तारखेला नाताळचे औचित्य साधून तिरडे येथे चर्चचे भूमिपूजन करण्याचे नियोजन झाले. त्याकरिता आजूबाजूच्या गावात प्रचार करून साधकांना बोलावण्यात आले. त्यापूर्वी कचरू सारुक्ते यांची जमीन रवी केशव बागुल याचे नावे बक्षीसपत्र करून त्या जागेवर सियोन प्रार्थना केंद्र म्हणजे चर्चचे भूमिपूजन ठरले. याची कुणकुण आदिवासी विकास परिषदेचे लकी जाधव व कार्यकर्त्यांना कळताच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी भेट देऊन हा कार्यक्रम उधळून लावला.

तर सरपंच संगीता गोडे व सदस्यांनी ग्रामसभा बोलवून ‘आपले गाव, आपले सरकार’ म्हणत गावात अंधश्रद्धा फोफवणार्‍या व बळजबरीने धर्मांतर करणार्‍या व्यक्तींविरोधात पोलीस केस दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यात उपस्थित पोलिसांकडे निवेदनाद्वारे तक्रार देण्यात आली. यावेळी बोलताना आदिवासी विकास परिषदेचे राज्य युवा अध्यक्ष लकी जाधव यांनी ख्रिश्चन मिशनरीचे फादर व त्यांचे ठेकेदार आदिवासींच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांच्या जमिनी बळकावत आहे. तसेच त्यांना आजाराचे औषधे देऊन व लालच दाखवून त्यांचे बळजबरीने धर्मांतर करत असून गावातील कचरू सखाराम सारुक्ते यांची जमीन घेऊन त्यांच्या जागेवर चर्च बांधण्याचा कार्यक्रम करून आदिवासींना बळजबरीने धर्मांतर करण्यास भाग पडत आहे. त्यामुळे प्रशासनाने त्यांचेवर पोलीस कारवाई करावी अन्यथा आदिवासी संघटना आक्रमक होतील.

तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव दराडे यांनी हा धर्मांतराचा प्रकार दोन वर्षांपासून सुरू असून सरकारी कर्मचारी देखील यात सहभागी आहेत. आदिवासी सेलचे अध्यक्ष सुरेश भांगरे, सरपंच परिषदेचे राज्य सचिव पांडुरंग खाडे, बाळू भांगरे, काळू भांगरे, चित्रा जाधव, दिनेश शहा, विजय भांगरे, राम गोडे, बाळू साबळे, संदीप गवारी, रामा पथवे, सचिन गोडे, वामन गोडे, भरत मेंगाळ, शरद जाधव, संतोष साबळे, प्रतीक साबळे, विजय साबळे, जयदेव गोडे आदिंनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

आमच्या गावात कुठल्याही परिस्थितीत चर्च होणार नाही. तसेच अंधश्रद्धा पसरविणार्‍या व्यक्तींवर कारवाई होईल , व बळजबरीने धर्मांतर करणार्‍यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. तर अकोले पोलीस ठाण्याचे हवालदार व्ही. एस. साबळे यांनी निवेदन स्वीकारून वरिष्ठांना कळविण्याचे मान्य केले आहे.
– संगीता गोडे (सरपंच तिरडे)

Visits: 103 Today: 2 Total: 1099343

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *