पावसाने उघडीप दिल्याने पेरणीच्या कामांना आला वेग हंगाम यशस्वी निघण्यासाठी शेतकर्‍यांची निसर्गराजाला प्रार्थना


नायक वृत्तसेवा, अकोले
गत आठवड्यात मान्सूनने अकोले तालुक्यात सर्वदूर हजेरी लावली. प्रवरा, मुळा व आढळा खोर्‍यात खरीप पेरण्यायोग्य पाऊस पडला. आता दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने वापसा होवू लागल्याने रखडलेल्या पेरण्या करण्यासाठी शेतकरी सरसावले आहेत. मात्र, आधीच्या हंगामात अतिवृष्टीने मोठे नुकसान झाल्याने आणि बी-बियाणे आणि खते महाग झाल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. तरी देखील बळीराजा हा हंगाम यशस्वी काढण्यासाठी तयारीला लागला आहे.

यंदा बिपरजॉय चक्रीवादळाने मान्सूनच्या प्रवासात अडथळे निर्माण केले. त्यामुळे शेतकर्‍यांना वरुणराजाची दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतर जूनच्या अखेरीस सर्वत्र जोरदार हजेरी लावल्याने सर्वत्र चैतन्य पसरले. भंडारदरा परिसरातील प्रवरा, मुळा व आढळा खोर्‍यातही पावसाची बरसात झाल्याने ओढे-नाले सक्रीय झाले. तर डोंगरांवरुन पाणी धरणाच्या दिशेने झेपावत आहे. आदिवासी भागातील भात खाचरांत मुबलक पाणी साचल्याने भात उत्पादक शेतकरी आता भात लागवडीच्या तयारीसाठी लागले आहे. या शेतकर्‍यांचा उदरनिर्वाह हा भाताच्या उत्पादनावर अवलंबून असतो. त्यामुळे गेल्या वर्षी पूर्णतः वाया गेलेल्या हंगामातून कसेबसे सावरुन यावर्षीचा हंगाम यशस्वीरित्या काढण्यासाठी निसर्गराजाला शेतकरी प्रार्थना करत आहे.

याचबरोबर इतर भागात बाजरी, सोयाबीन व मका आदी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. आता दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने पेरणीच्या कामांना वेग आला आहे. काही ठिकाणी बैलजोडीने तर काही ठिकाणी ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यंदा देखील बाजरी, सोयाबीन व मकाचा पेरा वाढण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. शेतकर्‍यांनी पेरणीनंतरही पिकांची आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहनही केले आहे.

Visits: 126 Today: 1 Total: 1417869

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *