‘कॅफे हाऊस’च्या नावाखाली चालणार्या अश्लिल चाळ्यांना चाप! संगमनेर पोलिसांची धडक कारवाई; तिघा कॉफी शॉप चालविणार्यांवर कारवाई..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात ‘कॅफे हाऊस’ या गोंडस नावाने अश्लिल चाळ्यांची केंद्र उभी राहीली होती. अशा ठिकाणांवर अल्पवयीन मुले व मुलींची मोठी संख्या असल्याचे वारंवार बोलले जात होते. आता या ठिकाणांवर पोलिसांनी आपले लक्ष केंद्रीत केले असून शहरात सुरु असलेल्या अशा पाच ठिकाणांवर स्थानिक पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने आज कारवाई केली. त्यात पाचातील तीन ठिकाणी अश्लिल कृत्य सुरु असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी 29 मुला-मुलींना ताब्यात घेतले, त्यात 13 मुलींचा समावेश आहे. तर अशा कृत्यांसाठी व्यवस्था करुन देणार्या तिघा कॉफी शॉप चालकांवर मुंबई पोलीस अधिनियमातील कलम 129 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. या वृत्ताने शहरात एकच खळबळ उडाली असून कॅफे चालकांचे धाबे दणाणले आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या मुला-मुलींना पुन्हा असे कृत्य करणार नसल्याच्या हमीवर सोडून देण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षात संगमनेरातील विविध शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात कॅफे हाऊस, कॉफी सेंटर अशा गोंडस नावाखाली अनेक केंद्र सुरु झाली आहेत. साधारणतः शाळा-महाविद्यालयाच्या रस्त्यावरच काहीशा आडवाटेला थाटलेल्या अशा ठिकाणांवर खरेतर चहा-कॉफी अथवा स्नॅक्ससारख्या गोष्टी उपलब्ध होणे अपेक्षीत आहे. मात्र प्रत्यक्षात ही ठिकाणं पाहिली तरी सहज संशय यावा अशा पद्धतीने ती तयार करण्यात आली आहे. येथे येणार्या ‘जोडप्यांना’ चहा-कॉफी नव्हेतर आतमध्ये निवांतपणा मिळावा यासाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली असते. तेथे वेळ घालवण्यासाठी एकदा का काऊंटरवर तासानिहाय अपेक्षीत वेळेचे पैसे दिले की तितका वेळ संपेपर्यंत त्या जोडप्याकडे कोणीही फिरकत नाही.
त्याचा परिणाम अशा ठिकाणांवर विद्यार्थीदशेतील मुला-मुलींची मोठी गर्दी होते व उपलब्ध झालेल्या सुविधेचा मोठ्या प्रमाणात गैरवापरही केला जातो. यातून यापूर्वी अनेकदा अशा ठिकाणांवर अगदी हाणामार्या होण्यापर्यंतचेही प्रकार घडले आहेत. त्यातच ही ठिकाणं म्हणजे अश्लिल चाळे करण्याचे उत्तम साधन ठरु लागल्याने शहरात त्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे आपला पाल्य शाळेत अथवा महाविद्यालयात गेला असल्याची भाबडी भावना बाळगणार्या पालकांची मात्र एकप्रकारे फसवणूकच होत आहे. पोलिसांनी यापूर्वी काहीवेळा अशा ठिकाणांवर अंकुश लावण्यासाठी तुरळक कारवायाही केल्या होत्या. मात्र गेल्या मोठ्या कालावधीपासून त्यांच्याकडूनही या गंभीर गोष्टीकडे दुर्लक्ष होत गेल्याने शहर व परिसरात अशा अश्लिल केंद्रांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळते.
याबाबत आज सकाळी संगमनेरातील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शहर पोलीस ठाण्यात जावून पोलीस उपअधीक्षक राहुल मदने व पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांची भेट घेतली व या प्रकारांना पायबंद घालण्याची विनंती केली. यावेळी बजरंग दलाच्या शिष्टमंडळाने शहरातील काही कॉफी शॉपमध्ये घडलेल्या अशा प्रकारांची जंत्रीही त्यांच्यासमोर मांडली. हा सर्व प्रकार ऐकून त्यांनीही तत्काळ कारवाई करण्याची तयारी दाखवतांना पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचार्यांना तातडीने कारवाईसाठी रवाना केले.
या टीमनेही आदेश प्राप्त होताच शहर व परिसरातील एकूण पाच कॉफी शॉपवर धडक कारवाई करीत तपासणी मोहीम राबविली. या कारवाईत गुंजाळवाडी शिवारातील गोल्डनसिटी नजीकच्या अक्षय विक्रम घुले याच्या ‘वेटलॉस कॅफे’, अकोले बायपास रस्त्यावरील मयुर विनायक जाधव याचे ‘टाईम आऊट कॅफे’ व याच परिसरातील अक्षय बाजीराव जाधव याच्या ‘क्राऊन कॅफे’ या ठिकाणांमध्ये अश्लिल कृत्य करीत असतांना 13 जोडप्यांसह एकूण 29 जण आढळून आले. त्या सर्वांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. तसेच असे गैरप्रकार करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देणार्या वरील तिघाही कॅफे चालकांनाही ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी छापा घालून पकडलेल्या 29 मुला-मुलींना पुन्हा अशा ठिकाणांवर जावून असे कृत्य करणार नसल्याची हमी घेण्यात आली व त्यांना समज देवून सोडण्यात आले. तर कॉफी शॉपच्या नावाने मनोरंजनाच्या ठिकाणांचा अशाप्रकारच्या कृत्यांसाठी वापर केल्याप्रकरणी त्या तिघांवरही मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम 129 नुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी आज राबविलेल्या या धडक कारवाईमुळे अशाप्रकारचे अड्डे निर्माण करुन विद्यार्थीदशेतील मुला-मुलींना वाम मार्गाचा रस्ता दाखवणार्या कॅफे चालकांचे धाबे दणाणले असून पोलिसांनीही यापुऐ नियमीतपणे अशा ठिकाणांवर तपासणी मोहीम राबविणार असल्याचे सांगितले आहे.