सलग तेरा वर्षे डॉ. विराज शिंदे करताहेत वारकर्यांची आरोग्य सेवा यंदाही दहिगाव येथे जावून केले वारकर्यांवर मोफत औषधोपचार

नायक वृत्तसेवा, अकोले
श्री अगस्ति महाराजांचा पायी दिंडी पालखी सोहळा तेराव्या वर्षी पंढरपूरकडे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात मार्गक्रमण करत आहे. या वाटेवर अनेक भाविक आपापल्या परीने वारकर्यांची सेवा करत आहेत. अन्नदाते चहा नाश्ता जेवणाची व्यवस्था करून सेवा करतात. वाहनचालकांनी आपापली वाहने दिंडीला अल्पदरात उपलब्ध करून देताहेत. तसेच अनेक भाविक आपल्याला शक्य ती सेवा करून या वारीत खारीचा वाटा उचलतात. यातीलच गेली तेरा वर्ष सुगावचे भूमिपुत्र डॉ. विराज शिंदे हे निरपेक्ष भावनेने वारकर्यांची आरोग्य सेवा करत आहेत. यंदा देखील ते आपले कर्तव्य बजावत आहे.

खरेतर वैद्यकीय क्षेत्र म्हटलं की अत्यंत व्यस्त दिनक्रम असतो. तरी देखील गेली 13 वर्ष डॉ. विराज शिंदे सातत्याने अगस्ति महाराजांच्या पालखीत सोहळ्यातील वारकर्यांना आरोग्य सेवा देण्यासाठी दिवसाआड दिंडीत येतात व आपल्याच खर्चाने इंजेक्शन, औषधे, मलम प्रसंगी सलाईन उपलब्ध करून देतात. दिवसभर आपला दवाखाना सांभाळून सायंकाळी प्रवासाला सुरुवात करायची आणि दिंडीच्या मुक्कामाच्या जागी पोहचून वारकर्यांची तपासणी व रात्री अकरानंतर पालखीतच जेवण करून मग पुन्हा मुक्कामी अकोल्यात यायचं हा त्यांचा पालखीच्या सुरवातीपासूनचा नित्यक्रम ठरला आहे.

वारकरी सुद्धा त्यांची नेहमीच्या ठिकाणी वाट पाहतात. पायी चालून पाय दुखतात व इतर शारीरिक तक्रारींपासून आराम मिळून पुन्हा उद्या नव्या दमाने चालण्यासाठी आतुरतेने डॉक्टरांची चातकाप्रमाणे वाट पाहतात. सगळे वारकरी त्यांना आदराने वारकरी सेवक म्हणतात. हे सर्व वारकरी इतरवेळी देखील डॉक्टरांकडे तपासणी जातात. वारकरी व डॉ. शिंदे यांचे एक अतूट नाते तयार झालेले आहे. यावर्षीच्या पालखीत सहाव्या मुक्कामी दहिगाव (ता.नगर) येथे येऊन त्यांनी वारकर्यांची आरोग्य तपासणी केली. त्यामुळे वारकर्यांच्या चेहर्यावर प्रसन्नता पाहायला मिळाली. यावेळी येथे मुक्कामास असलेल्या मुकुंददास पायी दिंडीतील वारकर्यांवर देखील मोफत औषधोपचार केले. त्यांच्या समवेत अकोले नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, रोटरी क्लबचे सदस्य नीलेश देशमुख, संजय जाधव, शरद खैरनार, गणेश महाराज वाकचौरे, दीपक महाराज देशमुख आदी होते. पालखी सोहळ्याच्यावतीने त्यांचा अॅड. के. डी. धुमाळ यांनी श्रीफळ देऊन सत्कार केला.
