संगमनेर उपविभागात पोलिसांची ‘ऑल आऊट’ मोहीम! उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे अ‍ॅक्शन मोडमध्ये; दीडशेवर गुन्हेगारांची झाडाझडती..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
पुढील आठवड्यात आषाढी एकादशी आणि बकरी ईदचा सण एकाच दिवशी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झाले आहेत. त्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी मंगळवारी संगमनेर उपविभागातील सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ‘ऑल आऊट’ मोहीम राबविली. सायंकाळी 8 ते पहाटे दोन वाजेपर्यंत सुरु असलेल्या या कारवाईत पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशनमधून दीडशेहून अधिक गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यासह आजवर पसार असलेल्या सातजणांना कारागृहात टाकले. याशिवाय गोवंश कत्तलखान्यांवर छापे घालत 43 जनावरांना अभय देण्यासह शैक्षणिक संस्थांच्या परिसरात धूम्रपानाचे साहित्य विकणार्‍या सात जणांवर कारवाई करण्यात आली आहे. सोबतच उपविभागातील शांतता भंग करण्याचा संशय असलेल्या 71 जणांना आठवडाभरासाठी उपविभागातून हद्दपार करण्याचा प्रस्तावही सादर करण्यात आला आहे.

याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक राकेश ओला व अप्पर अधीक्षक स्वाती भोर यांच्या आदेशान्वये मंगळवारी (ता.20) संगमनेर शहर, तालुका, घारगाव, आश्वी, अकोल व राजूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सदरची कारवाई करण्यात आली. त्यात आरोपींना समन्स बजावणे, न्यायालयाचे अटक वॉरंट असूनही हाती लागत नसलेल्या आरोपींचा शोध घेणे, पोलिसांच्या अभिलेखावरील गुन्हेगारांची सद्यस्थिती पडताळणे, दारु पिवून वाहने चालविणार्‍यांवर कारवाई करणे, अवैध दारु व अंमली पदार्थ, जुगार व अन्य अवैध व्यवसायांवर कारवाई करणे, शैक्षणिक संस्थांच्या परिसरात असलेल्या पानमसाला दुकानावर धुम्रपानासाठी आवश्यक गोष्टींची विक्री सुरु असल्यास गुन्हे दाखल करणे यासारख्या गोष्टींचा समावेश होता.

मंगळवारी सायंकाळी 8 वाजता सुरु करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी अभिलेखावर असलेल्या उपविभागातील 122 आरोपींना समन्स बजावले. सोबतच जामिनावर बाहेर असलेल्या 18 आरोपींचा शोध घेवून त्यांनाही नोटीसा बजावण्यात आल्या असून फरार असलेल्या 31 आरोपींच्या घरांची झाडाझडती घेवून त्यांच्या घरांवर अटक वॉरंटही बजावण्यात आले आहेत. या मोहिमेदरम्यान वेगवेगळ्या 12 ठिकाणच्या अवैध व्यवसायांवरही पोलिसांनी छापे घालीत कारवाई केली. शाळा व महाविद्यालयाच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ व सिगारेट विकण्यास मनाई असतानाही त्याचे उल्लंघन करणार्‍या वेगवेगळ्या ठिकाणच्या सात पानटपरी चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून फरार असलेल्या संगमनेरातील तिघांसह तालुक्यातील चौघांना अटक करण्यात आली आहे.

यासोबतच रस्ता वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि मद्य पिवून वाहन चालविणार्‍यांविरोधातही पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला असून शंभराहून अधिक जणांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. उपविभागातील सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचवण्याची शक्यता असलेल्या 71 जणांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली असून त्या सर्वांना आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आठवड्यासाठी उपविभागातून हद्दपार करावे यासाठी मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम 144/2 नुसार त्यांच्या तडीपारीचे प्रस्तावही प्रांताधिकारी तथा दंडाधिकार्‍यांकडे सोपविण्यात आला असून लवकरच त्यावर निर्णय होणार असल्याची माहिती उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे.

मंगळवारी राबविण्यात आलेल्या या मोहिमेत भारतनगरमधील राजीक मुनीर शहा या आरोपीच्या सुफियान कुरेशीच्या वाड्यात असलेल्या कत्तलखान्यावर छापा घालत 1 लाख 60 हजार रुपये किंमतीचे 16, तर जमजम कॉलनी परिसरातील राजीक रज्जाक शेख यांच्या कत्तलखान्यावर छापा घालत 1 लाख 35 हजार रुपये किंमतीची 27 गोवंश वासरे सोडवण्यात आली आहेत. या दोघांवरही महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यासह प्राण्यांना निर्दयतेने वागणूक देण्यास प्रतिबंध करणार्‍या कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील दोन्ही आरोपी पसार झाले असून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एकूण 43 गोवंश जनावरांना सायखिंडी येथील जीवदया पांजरपोळमध्ये सोडण्यात आले आहे.

मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास वाघापूर शिवारातील रायते रस्त्यावरील बाबासाहेब सीताराम पानसरे याच्या हॉटेल लक्ष्मी येथे छापा घालत पोलिसांनी 560 रुपयांच्या देशी दारुच्या आठ तर निंबाळे चौफुलीनजीक दीपक ओंकार साळुंके यांच्या ताब्यातून 910 रुपयांच्या 15 देशी दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. या दोघांवरही मुंबई दारुबंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. यासोबतच उपविभागात बहुधा पहिल्यांदाच शासकीय कार्यालये, धार्मिक स्थळे व शैक्षणिक संस्थांच्या परिसरात प्रतिबंधित असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची व सिगारेटची विक्री करणार्‍या तहसीलजवळील मोईद्दीन जैनुद्दीन शेख (वय 38,रा.मोमीनपुरा), अविनाश नामदेव जगदाळे (वय 36, पेटीट हायस्कूलजवळ) व राजू शिवाजी कोठवळ (वय 40, सिद्धकला महाविद्यालयाजवळ, देवगाव रोड) या तिघांवर राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण मोहिमेंतर्गत सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ कायदा कलम 6 (ब), 24 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई दरम्यान अ‍ॅक्टिव्हा ही मोपेड चोरुन घेवून जाणारा बंडू उमाजी माळी (वय 30, रा.वाघापूर) हा पोलिसांच्या हाती लागला आहे. पोलिसांनी अचानक राबविलेल्या या मोहिमेने गुन्हेगारांमध्ये घबराहट निर्माण झाली आहे.


तत्कालीन पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी जिल्ह्यात पहिल्यांदाच सुरु केलेल्या ‘ऑल आऊट’ मोहिमेत त्यावेळी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासह गावठी कट्टे, तलवारी, सुरे, कोयते व प्राणघातक हत्यारे बाळगणार्‍यांचा शोध घेवून त्यांच्याकडील हत्यारांसह त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. या कारवाईत पोलिसांनी गुन्हेगारांचा शोध आणि त्यांची सद्यस्थिती अवगत करुन घेतली आहे, मात्र आजवर शहरातील अशा प्रवृत्तींकडे असलेली हत्यारे कधीही तपासली गेलेली नाहीत, पोलिसांनी त्यादृष्टीनेही एकदा झाडाघडती घेण्याची गरज आहे.

Visits: 224 Today: 5 Total: 1108130

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *