शिवजयंती उत्सवाच्या देखाव्यांवर अखेर तोडगा! जागेची उत्तर-दक्षिण विभागणी; मिरवणुकीबाबत आज निर्णय होणार..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शिवजयंतीचा देखावा सादर करण्यासाठी बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरील दर्शनीभाग मिळावा यासाठी गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेल्या संघर्षावर अखेर बुधवारी रात्री उशिराने तोडगा काढण्यात आला. तत्पूर्वी एकाच जागेवर दावा सांगत दोन्ही गट वारंवार एकमेकांसमोर येवून घोषणाबाजी करु लागल्याने प्रशासनाने ‘ती’ जागा संवेदनशील म्हणून घोषित केली होती. त्यामुळे यंदा या परिसरात कोणालाही देखावा साजरा करण्याची परवानगी मिळणार नसल्याचे चित्र निर्माण झाले असतानाच रात्री उशिराने प्रशासनाच्या मध्यस्थीने दोन्ही गटांनी एक पाऊल मागे घेतल्याने त्यावर सर्वमान्य तोडगा काढण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षीच्या शिवजयंती उत्सवानिमित्त संगमनेरकरांना शिवमंदिरासह किल्ल्याची प्रतिकृती पाहण्याची संधी मिळणार आहे. जागेचा वाद मिटवण्यात प्रशासन यशस्वी झाले असले तरीही सायंकाळी निघणार्या मिरवणुकीबाबत मात्र अद्याप अंतिम निर्णय झाला नसून आज सायंकाळपर्यंत त्याचाही फैसला होण्याची शक्यता आहे.
संगमनेर विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडल्यापासूनच शहरात महायुती विरुद्ध काँग्रेस असा राजकीय संघर्ष बघायला मिळत आहे. शहर व तालुक्यातील विविध विकास कामांचे श्रेय आणि सभागृहात मांडल्या जाणार्या वेगवेगळ्या विषयांवरुन त्याला अधिक धार चढत असतानाच यंदा तीथीनुसार साजर्या होणार्या शिवजयंती उत्सवावरुन त्याचा भडका उडाला. खरेतर तत्कालीन आघाडी सरकारने तारखेनुसार शिवजयंती उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतल्यापासून शिवसेनेसह अन्य हिंदुत्त्ववादी संघटनांनी त्याला विरोध करीत तीथीनुसार हा उत्सव साजरा करण्याची परंपरा आजतागायत कायम ठेवली. त्यामुळे राज्यात तीथीनुसार साजर्या होणार्या या उत्सवावर शिवसेनेचाच पगडा दिसून येतो. तर, काँग्रेससह अन्य समविचारी पक्ष व संघटनांकडून मात्र तेव्हापासून तारखेनुसारच शिवजयंती सोहळा आयोजित केला जातो.
यंदा मात्र राज्यासह संगमनेरातील राजकीय स्थितीत अमुलाग्र बदल झाला आहे. त्यातही गेल्या महिन्यात समारोप झालेल्या प्रयागराज कुंभमेळ्यासह ‘छावा’ चित्रपटाला मिळणार्या मोठ्या प्रतिसादातून देशाचा मूड बदलत असल्याचे चित्र उभे राहिल्याने सर्वच राजकीय पक्षांची भूमिकाही बदलत असल्याचे दिसू लागले आहे. शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून ते अधिक ठळकपणे समोर आले असून संगमनेरात तर याच मुद्द्यावरुन महायुती विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष उभा राहीला होता. यंदा काँग्रेस प्रणित शिवजन्मोत्सव सोहळा समितीने पहिल्यांदाच तीथीनुसार शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेत बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ आकर्षक शिवमंदिर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी परवानगी मिळावी असा अर्जही गेल्या महिन्यात देण्यात आला होता. त्याचवेळी शिवसेनेकडूनही पारंपरिक मिरवणुकीसह बसस्थानकावरील त्याच जागेत किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यासाठी अर्ज दाखल झाल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली होती.
यातून मार्ग काढण्यासाठी प्रशासनाने दोनवेळा बैठक घेतल्यानंतरही त्यातून काहीच हाती लागत नसल्याने परवानगीचा विषय प्रलंबित ठेवण्यात आला होता. त्यातून दोन्ही बाजूने चलबिचल वाढून मंगळवारी सायंकाळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रांताधिकारी कार्यालयात जावून परवानगीसाठी ठिय्या दिल्याने वातावरण तापले होते. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून शहराची शांतता धोक्यात येवू नये यासाठी प्रशासनाने बुधवारी (ता.12) सकाळी बसस्थानकाच्या आवारातील ‘ती’ जागा ‘संवेदनशील क्षेत्र’ म्हणून जाहीर केल्यानंतर पोलिसांच्या सावलीसाठी त्याच जागेत छोटेखानी मांडव घातला गेला. त्यावरुन गैरसमज निर्माण झाल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक होवून दोन्ही बाजूने हमरातुमरीही झाली. त्यातून बसस्थानकावरील जागेचा विषय स्फोटक बनल्याने दोन्ही गटांना परवानगी मिळण्याची शक्यता धुसर झाली होती.
मात्र सायंकाळी उशिराने यातून मार्ग काढण्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर महायुतीने वादग्रस्त जागा कोणालाही न देता प्रवेशद्वाराच्या दोन बाजूला दोघांनाही परवानगी देण्याचा पर्याय दिला. त्यावर दोन्ही बाजूने होकार मिळाल्यानंतर रात्री उशिराने पोलीस प्रशासनाने बसस्थानकाच्या दक्षिणेकडील राजहंस दूधाच्या गाळ्यासमोरील भागात काँग्रेस प्रणित शिवजन्मोत्सव समितीला तर, उत्तरेकडील दत्त मंदिराजवळील जागा महायुतीला देण्याचा निर्णय घेतला. आमदार खताळ यांनी रात्रीच देखावा उभारण्याच्या कामाचा शुभारंभ केल्यानंतर महायुतीच्या किल्ला देखाव्यासह समितीच्या शिवमंदिराच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. समन्वयातून दोन्ही बाजूने अखेर या वादावर तोडगा निघाल्याने शहरातून समाधान व्यक्त होत आहे.
तीथीनुसार साजर्या होणार्या शिवजयंतीच्या निमित्ताने शिवसेनेकडून सायंकाळी पालिकेच्या प्रवेशद्वारापासून शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. मात्र गेल्या दोन-तीन वर्षातील बदललेल्या राजकीय घडामोडीत एकसंध शिवसेना फुटून हा पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्याने यावर्षीच्या मिरवणुकीची परवानगी कोणाला मिळणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. शिवसेनेसह हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मित्र मंडळाने या मिरवणुकीवर दावा केला असून उद्धव ठाकरे गटाने मात्र परवानगी मागितलेली नाही. त्यामुळे शिवजयंतीच्या दिनी निघणार्या मिरवणुकीची परवानगी शिवसेनेलाच मिळण्याची दाट शक्यता असून आज सायंकाळपर्यंत त्यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.