अगस्ति आश्रमात लाखो भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ अबालवृद्धांसह तरुणांनी लुटला यात्रौत्सवाचा मनमुराद आनंद

नायक वृत्तसेवा, अकोले
अकोले तालुक्याचे आराध्य दैवत अगस्ति आश्रमात महाशिवरात्रीच्या महापर्वानिमित्ताने भाविकांची मोठी गर्दी होती. सायंकाळपर्यंत लाखोंच्या संख्येने भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

महाशिवरात्री निमित्ताने अगस्ति आश्रमात दरवर्षी मोठी यात्रा भरत असते. मात्र मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे यात्रा भरली नव्हती. यावर्षी यात्रौत्सव ऐवजी महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. हा उत्सव दोन दिवस राहणार आहे. पहाटे तीन वाजता आमदार डॉ. किरण लहामटे व नगर विकास विभागाचे उपसचिव विजय चौधरी यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा करण्यात आली. मोरेश्वर धर्माधिकारी यांनी पौराहित्य केले. देवस्थानचे अध्यक्ष वकील के. डी. धुमाळ यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प. पू. योगी केशवबाबा चौधरी, देवस्थानचे सचिव सुधाकर शाळीग्राम, खजिनदार किसन लहामगे, विश्वस्त गुलाब शेवाळे, पर्बत नाईकवाडी, संतुजी भरीतकर, हभप. दीपक महाराज देशमुख, भानुदास तिकांडे, रमेश नवले, नवनाथ गायकवाड, मधुकर वाकचौरे, अनिल गायकवाड, व्यवस्थापक रामनाथ मुर्तडक आदिंसह मान्यवर उपस्थित होते.

महापूजेनंतर मंदिर पहाटे 4 वाजेपासून भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या. रात्री उशीरापर्यंत भाविकांची गर्दी होती. यामुळे आश्रम परिसर गजबजून गेला होता. परिसरातील सर्व मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. स्वयंसेवी संस्था व खासगी व्यक्तींतर्फे शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी लहान-मोठ्या सुमारे 400 च्या वर दुकानदारांनी विक्रीसाठी आपली दुकाने लावली होती. दुकानदारांची देवस्थानतर्फे स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. यात्रेनिमित्त अगस्ति देवस्थान परिसरात मोठमोठे पाळणे, खेळणी यांचा आनंद लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांनी लुटला. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने भाविकांनी रांगेत अगस्ति ऋषींचे दर्शन घेतले. महिलांसाठी वेगळी व पुरुषांसाठी वेगळी रांग करण्यात आली होती. भाविकांनी मंदिर विकासासाठी मोठ्या प्रमाणात देणगी देऊन आपला सामाजिक, अध्यत्मिक कार्यात सहभाग नोंदविला.

तरुणाई भोंगे वाजवीत यात्रेचा आनंद लुटताना दिसत होती. मंदिर परिसरात छोटी-मोठी खेळणीची, थंड पेयांची, प्रसादाची, महिला वर्गासाठी जनरल स्टोअर्सची दुकाने लागली होती. अगस्ति देवस्थान ट्रस्टने यात्रेचे सुंदर नियोजन केलेले आहे. तसेच देवस्थान ट्रस्टच्यावतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी वारकरी व भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावत आहे. माजी नगरसेवक प्रमोद मंडलिक, प्रा. गणपत नवले, मनोहर नवले, गोविंद वाळुंज हे भाविक भक्तांचे स्वागत करून दानधर्म करण्यासाठी भाविकांना आवाहन करीत होते. तालुक्यासह अहमदनगर, नाशिक, पुणे व मुंबई येथील भाविकांनी हजेरी लावून दर्शन घेतले. सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस, गृहरक्षक दल व ग्रामीण भागातील तरुणांनी यात्रेमध्ये गोंधळ होणार नाही, सर्वांना व्यवस्थित दर्शन घेता येईल यासाठी चोख बंदोबस्त ठेवला आहे. मंदिरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावरच वाहने अडविण्यात आल्याने येणार्या भाविकांना कोणताही त्रास झाला नाही.
