नगरसेवक व कार्यकर्त्यांचे राहाता पालिकेत ‘टाळ बजाओ’ आंदोलन

नायक वृत्तसेवा, राहाता
येथील नगरपालिकेत सोमवारी (ता.7) अपवाद वगळता कर्मचारी काही वेळांकरिता कार्यालयात उपस्थित नसल्याने नगरसेवक व कार्यकर्त्यांनी पालिकेच्या प्रवेशद्वारात ‘टाळ बजाओ’ आंदोलन केले.

सरकारने सर्व सरकारी कार्यालयात पाच दिवसांचा आठवडा जाहीर केल्याने शनिवार व रविवार कार्यालयास सुट्टी दिली असते. मात्र आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सकाळी कार्यालय सुरू झाल्यानंतर नगरपालिका कार्यालयात हजेरी लावल्यानंतर अनेक कर्मचारी अनुउपस्थित असल्याने कामानिमित्त येणार्या नागरिकांना याचा मनःस्ताप सहन करावा लागला. याबाबत नागरिकांनी पालिका नगरसेवकांच्या लक्षात ही घटना आणून देताच नगरसेवक व कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारातील पायर्यांवर बसून टाळ वाजवत जागर आंदोलन करीत कामाच्या वेळेत उपस्थित नसणार्या सबंधित कर्मचार्यांचा हा दिवस बिनपगारी करुन त्यांच्यावर कारवाई करावी, या प्रकारची मागणी करीत आंदोलन केले. यावेळी नगरसेविका नीलम सोळंकी, साहेबराव निधाने, निवृत्ती गाडेकर, बाळासाहेब गिधाड, राजेंद्र अग्रवाल, दीपक सोळंकी, शंतनू सदाफळ, सुनील जाधव, समीर बेग, रामनाथ सदाफळ, जगन्नाथ गोरे, लक्ष्मण पडोळकर आदी उपस्थित होते.

