वटपौर्णिमा, वृक्षमैत्रीचा संदेश देणारा सण : भाऊ जाखडी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
वटपौर्णिमा म्हणजे वृक्षमैत्रीचा संदेश देणारा जगातील एक अनोखा सण आहे. जो वृक्ष वाढवतो तो स्वतःच्या तसेच समाजाच्याही जीवनातील आनंद वाढवतो. आरोग्याचा स्तर उंचावतो. म्हणून वटपौर्णिमा सणाचे औचित्य साधून वृक्षारोपण मोहीम प्रत्येकाने योगदान देऊन वाढवली पाहिजे आणि भावी पिढ्यांच्या सुखी जीवनाची मुहूर्तमेढ रोवली पाहिजे असे प्रतिपादन पुरोहित प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊ जाखडी यांनी केले.

वटसावित्री पौर्णिमेनिमित्त शहरातील सुतार गल्लीतील पुरोहित प्रतिष्ठानच्या कार्यालयात महिलांसाठी वटवृक्ष पूजनाचा विधीवत सोहळा आयोजित करण्यात आला होता. वेदमंत्रांच्या घोषात शास्त्रशुद्ध रीतीने वडाची विधीवत यथासांग पूजा महिलांच्या हस्ते करण्यात आली. त्यावेळी उपस्थित भगिनींना मार्गदर्शन करतांना जाखडी बोलत होते. या सोहळ्यात विविध समाजांच्या सामजिक कार्य करणाऱ्या महिला मंडळातील सदस्या सहभागी झाल्या होत्या.वटवृक्षाचे आरोग्याच्या दृष्टीने असलेले असंख्य फायदे अभ्यासल्या नंतर आपल्या पूर्वजांनी वटवृक्ष जतन करणे, वृद्धिंगत करणे या हेतूने वटपौर्णिमा व्रताचा अंगीकार केला. सत्यवान आणि सावित्रीच्या कथेतून हाच संदेश देण्यात आला आहे की, मोठ्या प्रमाणात प्राणवायू देणारा जीवदान देण्याची क्षमता असलेला हा वृक्ष मानवाला वरदान आहे. अनेक वर्षांपासून सदर उपक्रमास भगिनी मोठ्या संख्येने प्रतिसाद देतात. त्यांनी पूजन केलेले वटवृक्षाचे रोप त्यांच्याच हस्ते अनेक ठिकाणी लागवड करण्यात येते. त्यामुळे मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे सहजपणे शक्य झाले आहे. नारीशक्ती किती किमया करू शकते हे यातून दिसून आले आहे. यावेळी अनेक भगिनींनी पुरोहित प्रतिष्ठानच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.यावेळी पूरोहित प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष संदीप वैद्य, अरुण कुलकर्णी, पवन काळे, प्रतीक जोशी आदी पुरोहित उपस्थित होते.

वेदमंत्रांच्या घोषात वटवृक्ष पूजन, कहाणी वाचन, चहा, पाणी व फराळाचे यावेळी आयोजन करण्यात आले होते. महिलांच्या हस्ते पूजन झालेल्या वृक्षांचे रोपण प्रवरा, म्हाळुंगी नदीच्या संगम स्थानी ‘शांती घाट’ परिसरामध्ये करण्यात आले. मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी पूरोहित प्रतिष्ठानच्या वतीने केल्या जाणाऱ्या वृक्षारोपणामुळे अनेक वृक्ष चांगले बहरले आहेत. त्यांच्या सावलीचा लाभ शांतीघाटावर दशक्रिया विधी निमित्त जमणाऱ्या परिवारांना गारवा देण्यासाठी होत आहे. वर्षानुवर्षे पुरोहित प्रतिष्ठान करीत असलेल्या या उपक्रमाची सर्व जाणकार प्रशंसा करीत असतात.

Visits: 148 Today: 4 Total: 1098566
