पैठण-पंढरपूर महामार्गाचे काम तीन वर्षांपासून रखडले अर्धवट कामे व खड्ड्यांमुळे महामार्गाची दयनीय अवस्था
नायक वृत्तसेवा, शेवगाव
तालुक्याच्या हद्दीतून बोधेगावमार्गे जाणार्या पैठण-पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम भूसंपादनाअभावी तब्बल तीन वर्षांपासून रखडले आहे. रस्त्याची रखडलेली अर्धवट कामे व खड्ड्यांमुळे सध्या या महामार्गाची दुरवस्था झाली आहे. यामुळे या पालखी मार्गाचे भाग्य उजळणार तरी केव्हा, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
पैठण-पंढरपूर हा संत एकनाथ महाराज यांची पालखी जाणारा मार्ग असल्याने पालखी मार्ग म्हणून ओळखला जातो. हा मार्ग तालुक्यातील मुंगी, हातगाव, बोधेगाव, लाडजळगाव, शेकटे खुर्द आदी गावांच्या हद्दीतून जातो. या मार्गाला 752-ई म्हणून राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. भूसंपादनाअभावी या रस्त्याचे काम साधारणपणे तीन वर्षांपासून रखडले आहे. या रस्त्यात जाणार्या शेतकर्यांच्या जमिनींची रीतसर मोजणी व योग्य मोबदला न मिळाल्याने शेतकर्यांसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी वेळोवेळी आंदोलने केली. याची दखल घेऊन प्रशासनाने रस्त्याचे काम बंद ठेवले आहे.
काही काम झाले असून, काही अर्धवट आहे. त्यातच, रस्त्यावर सध्या ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी तर रस्त्याच्या मधोमध वेड्या बाभळी उगवल्या असून, त्या वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. या खराब रस्त्याचा वाहनधारकांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे.
शेवगाव तालुक्याच्या हद्दीतील पैठण-पंढरपूर मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सध्या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचल्याने वाटसरूंना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. अनेकदा अपघात होतात. यामुळे प्रशासनाने किमान मुरूम-मातीने खड्डे तात्पुरते बुजवून रहदारीयोग्य तरी रस्ता करावा.
– नीलेश ढाकणे (ग्रामस्थ, हातगाव)
शेवगाव तालुक्याच्या हद्दीतील महामार्गावरील दुरुस्तीच्या कामाबाबत संबंधितांना सूचना दिल्या आहेत. दोन-तीन दिवसांत गाळ काढणे, मुरूम-खडी टाकणे आदी दुरुस्ती कामे पूर्ण केली जातील.
– सूर्यकांत गलांडे (उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग, औरंगाबाद विभाग)