अरे देवा! आता सत्तर वर्षांच्या आजोबांना लुटले!! पोलीस असल्याचा बनाव; अडीच लाखांचे दागिने घेवून दोघे लंपास..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यावर घडणारे चोरीचे प्रकार थांबलेले असतांना रविवारी रात्री पावबाकी रस्त्यावर एका 65 वर्षीय महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीचा प्रकार घडला आणि या घटनेतून अनेक महिन्यांचा रस्त्यांवरील भयमुक्त नागरी संचार संपुष्टात आला. रस्तालुटीच्या अशा प्रकारांमध्ये सलग दुसर्‍या दिवशी आणखी एका खळबळजनक घटनेची नोंद झाली आहे. या घटनेत मोपेडवरुन आपल्या नातवासह अकोल्यातून संगमनेरात आलेल्या 69 वर्षीय आजोबांना दोघांनी पोलीस असल्याचा बनाव करुन तब्बल 2 लाख 64 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला. या घटनेने संगमनेरातील भयमुक्त रस्त्यांवर पुन्हा एकदा चोरट्यांचा वावर वाढल्याचेही स्पष्ट झाले असून अलंकार घालून फिरणार्‍यांवर आपल्या सुरक्षिततेबाबत मानसिक दबाव वाढला आहे.


याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अकोले तालुक्यातील धुमाळवाडी येथे राहणारे लक्ष्मण पंढरीनाथ धुमाळ हे आपल्या नातवासह सोमवारी (ता.12) तळेगाव येथील आपल्या नातीला भेटण्यासाठी निघाले होते. त्यांची मोपेड दुपारी सव्वाबाराच्या सुमारास अकोले रस्त्यावरील सागर बारजवळ आली असता पाठीमागून पल्सर मोटर सायकलवरुन आलेल्या दोघांनी त्यांना थांबवले. यावेळी पल्सरवर पाठीमागे बसलेल्या इसमाने ओळखपत्र दाखवून आपण पोलीस असल्याचा बनाव निर्माण केला. त्यामुळे त्या आजोबांच्या मनात त्यांच्याविषयी विश्‍वास निर्माण झाला.


यावेळी पोलीस असल्याचे भासवणार्‍या चोरट्याने पुढे शिंदे साहेब उभे आहेत, तुम्ही इतके दागिने घालून पुढे गेलात तर ते आम्हालाच रागावतील. त्यामुळे तुम्ही अंगावर इतके दागिने घालून पुढे जावू नका, असे सांगत त्याने आपल्याकडील एक कागद काढला व त्या आजोबांना त्यात आपले दागिने ठेवण्यास सांगितले. त्यावर भरवसा ठेवून आजोबांनीही आपल्या गळ्यातील 70 ग्रॅम वजनाची 2 लाख 10 हजार मूल्याची सोनसाखळी, 22 हजार 500 रुपये किंमतीची साडेसात ग्रॅमची अंगठी, प्रत्येकी 15 हजारांच्या व पाच ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या व दीड हजार रुपये किंमतीची पाच ग्रॅम वजनाची चांदीची एक अंगठी असा अंगावरील संगळा मुद्देमाल काढून त्या कागदात ठेवला.


यावेळी संबंधित चोरट्याने त्याची पुडी बांधली व सदरचे दागिने खिशात ठेवू नका मोपेडच्या डीकीत ठेवा असे सांगितल्याने त्यांनी आपल्या मोपेडची डीकी उघडली, त्यानंतर ‘त्या’ चोरट्याने स्वतःच्या हाताने त्यात दागिन्यांची पुडी ठेवली आणि क्षणात सुसाट वेगाने अकोल्याच्या दिशेने धूम ठोकली. त्यांचे वेगाने निघून जाणे आजोबांच्या मनात संशय निर्माण करणारे ठरल्याने त्यांनी लागलीच पुन्हा डीकी उघडून दागिने तपासले असता त्यात दागिन्यांच्या जागी वाळू असल्याचे त्यांना आढळले. या प्रकाराने जबर धक्का बसलेल्या त्या 69 वर्षीय आजोबांनी एकच ओरडा केला, मात्र तो पर्यंत बराच उशिर होवून गेला होता. यावेळी तेथे जमलेल्या लोकांनी त्यांना लागलीच पोलीस ठाण्यात जावून तक्रार करण्यास सांगितले.


त्याप्रमाणे आजोबांनी आपल्या नातवासह शहर पोलीस ठाण्यात जावून घडला प्रकार पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना सांगितला. त्यांनी तत्काळ सरकारी वाहनातून पोलीस पथक पाठवित चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तो असफल ठरला. या प्रकरणी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार यांच्याकडे देण्यात आला आहे. अवघ्या 12 तासांत रस्तालुटीचा तिसरा प्रकार समोर आल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून थांबलेल्या अशाप्रकारच्या चोरीच्या घटना पुन्हा सुरु झाल्याचे दिसत असून अलंकार परिधान करुन बाहेर पडणार्‍या महिलांसह आता पुरुषांनीही सावधानता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.


रविवार आणि सोमवार या दोन दिवसांत अवघ्या 12 तासांत शहर पोलीस ठाण्याच्या हद्दित घडलेला रस्तालुटीचा हा तिसरा प्रकार आहे. रविवारी रात्री आठ वाजता पावबाकी रस्त्यावर 65 वर्षीय महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मंगळसूत्र ओरबाडले गेले, तर मध्यरात्रीनंतर गुंजाळवाडी शिवारातून चक्क मशिनरी भरलेला पिकअपचा पळवण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर अवघ्या बारा तासांत अकोले नाक्यावर वयोवृद्ध इसमाला तब्बल 2 लाख 64 हजार रुपयांना लुटण्याची घटना घडल्याने संगमनेरात एकच खळबळ उडाली आहे.

Visits: 102 Today: 1 Total: 1419540

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *