‘गणेश’च्या माध्यमातून बाळासाहेब थोरातांचे राजकीय सीमोल्लंघन! चाळीस वर्षात पहिल्यांदाच हद्द ओलांडली; कोल्हेंशी हातमिळवणी करीत विखेंना आव्हान


नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात शांत, संयमी आणि सुसंस्कृत राजकारणी म्हणून अवघ्या राज्याला परिचित आहेत. 1985 पासून संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणार्‍या थोरातांनी आपल्या चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या प्रेरणेतून विविध सहकारी संस्था फुलविल्या आणि वाढवल्या. मात्र त्यांनी यापूर्वी आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेर जावून कधीही राजकारण केले नाही. यावेळी मात्र त्यांनी आपल्या ‘संयमी’ स्वभावाचे विसर्जन केले असून चक्क कोपरगावच्या कोल्हेंशी हातमिळवणी करुन राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या गणेश कारखान्याच्या निवडणुकीत थेट महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघात मुसंडी मारीत त्यांच्यासमोरच कडवे आव्हान उभे केले आहे. ‘गणेश’च्या माध्यमातून थोरातांनी पहिल्यांदाच राजकीय सीमोल्लंघनही केल्याने जिल्ह्याची राजकीय गणितं बदलण्याचेही संकेत मिळू लागले आहेत.

काँग्रेसचे दिग्गज नेते, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आपल्या सुसंस्कृत राजकारणामुळे राज्यातील विरोधी पक्षातही आदराचे स्थान मिळवून आहेत. गेल्या चाळीस वर्षांच्या आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत त्यांनी कधीही विरोधकांच्या कार्यक्षेत्रात कधीही लक्ष घातले नव्हते. त्यातूनच संयमी नेते अशी त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली होती. राज्याच्या राजकारणात थोरात आणि विखे यांचे राजकीय वैर सर्वश्रृत असतानाही यापूर्वी कधीही या दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या क्षेत्रातील सहकारी संस्थांमध्ये ढवळाढवळ केल्याचे उदाहरण नाही. मात्र नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच महसूल मंत्री विखे पाटील यांनी संगमनेर बाजार समितीसाठी आपला अख्खा पॅनल उभा केल्याने माजी महसूल मंत्री यांनी आपला ‘संयम’ आता विसर्जित केला आहे. अर्थात या निवडणुकीच्या निकालात संगमनेरच्या सहकाराचा मेरुमणी थोरातच असल्याचेही सिद्ध झाले होते.

विखे पाटलांनी थेट थोरातांच्या कार्यक्षेत्रात ‘दखल’ देत बाजार समितीची निवडणूक लादल्याने त्याचे प्रतिध्वनी उमटणार असल्याचा अंदाज राजकीय जाणकारांनी वर्तविला होता. राहात्याच्या गणेश सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून आता ते स्पष्टही झाले आहे. विशेष म्हणजे गेल्या आठ वर्षांपासून विखे पाटलांच्या प्रवरा कारखान्याकडून भाडेतत्त्वावर हा कारखाना चालविण्यासाठी घेण्यात आला आहे. गेल्या महिन्यातच करार संपल्याने गणेश कारखान्याची निवडणूक जाहीर झाल्यानंतर खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी करारात पाच वर्षांनी वाढ केल्याने बर्‍याच राजकीय चर्चाही रंगल्या होत्या. डॉ. विखेंची ती घाई कशासाठी होती हे देखील आता थोरातांच्या राजकीय भूमिकेमुळे स्पष्ट झाले आहे. त्यातही बाळासाहेब थोरात यांनी या निवडणुकीत आपला पारंपरिक विरोधक असलेल्या भाजपाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्याशी हातमिळवणी करुन गणेशच्या निवडणुकीत शड्डू ठोकल्याने राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावण्यासह जिल्ह्यातील राजकीय समीकरणंही बदलणार आहेत.

वास्तविक 67 वर्षांचा इतिहास असलेला आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघात मोडणारा गणेश साखर कारखाना सर्वाधिक 38 वर्ष स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या ताब्यात होता. मात्र गेल्या दशकापासून या कारखान्यावर विखे पाटलांचे वर्चस्व आहे. विखेंच्या ताब्यात गेलेला कारखाना परत मिळवण्यासाठी कोल्हे यांचे सुपुत्र, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे चेअरमन अमित कोल्हे प्रयत्नशील असताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राजकीय संकेत मोडून थेट त्यांच्याशीच आघाडी केल्याने गणेशची निवडणूक रंगतदार होणार हे निश्चित मानले जात आहे. यापूर्वीच्या सर्व निवडणुकांमध्ये विखे विरुद्ध कोल्हे असाच सामना बघायला मिळाला होता, यावेळी मात्र विखे विरुद्ध कोल्हे-थोरात अशी लढत होणार असल्याने गणेशचे सभासद कोणाच्या पारड्यात मतदान करतात याबाबतचे औत्सुक्यही शिगेला पोहोचले आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून बाळासाहेब थोरात यांनी पहिल्यांदाच राजकीय सीमोल्लंघनही केल्याने या निवडणुकीला वेगळे महत्त्वही प्राप्त झाले आहे.

सहकारात पक्षीय राजकारण नसते तर ती विचारांची लढाई असते. स्थानिक पातळीवरील नेते, कार्यकर्ते आपापला निर्णय घेत असतात. बाजार समितीच्या निवडणुकांमध्येही स्थानिक कार्यकर्त्यांनी निर्णय घेत निवडणुका लढविल्या, मात्र आरोप आमच्यावर करण्यात आले. गणेश कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्याला नवीन मैत्री बघायला मिळाली असून भविष्यात आणखी बरेच काही वेगळे दिसेल.
– डॉ.सुजय विखे पाटील
खासदार – नगर दक्षिण

विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर स्नेहलता कोल्हे यांनी पराभवाचे खापर आमच्या माथी फोडले होते. गणेश कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी केलेल्या ‘अभद्र’ युतीला गणेशचे सभासद योग्य जागा दाखवतील.
– राधाकृष्ण विखे पाटील
महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य

गणेश सहकारी साखर कारखाना गेल्या आठ वर्षांपासून विखे पाटलांच्या प्रवरा कारखान्याकडे चालवण्यासाठी कराराने देण्यात आला होता. हा कारखाना सभासदांनीच चालवावा या मताचे आम्ही असल्याने गणेशच्या निवडणुकीत आम्ही उतरलो आहोत. आम्ही ‘गणेश’ बिघडवायला नाहीतर घडवायला आलो आहोत. आमचा हेतू स्वच्छ आहे, त्याला कोणी अभद्र म्हणत असेल तर आपण काय करणार?
– बाळासाहेब थोरात
आमदार – संगमनेर

Visits: 131 Today: 1 Total: 1422914

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *