समनापूर प्रकरणी ‘त्या’ सतराजणांना जामीन मंजूर! प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी; दर मंगळवारी पोलीस ठाण्यात हजेरीची अट..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या मंगळवारी संगमनेरातील भगवा मोर्चा आटोपून घराकडे जाणार्‍या जमावातील काहींनी समनापूरातील दुसर्‍या समुदायाच्या घरांवर दगडफेक व तिघांना मारहाण केल्याची घटना घडली होती. त्या प्रकरणात पोलिसांनी संगमनेर व राहाता तालुक्यातील विविध ठिकाणांहून 17 जणांना अटक केली होती. दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर आज न्यायालयाने प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्या सर्वांची जामीनावर सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. जामीन अर्ज मंजूर करतांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एम.वाघमारे यांनी सर्व आरोपींना या प्रकरणाचे आरोपपत्र दाखल होईस्तोवर आठवड्याच्या दर मंगळवारी पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याची अट घातली आहे. आज झालेल्या जामीनावरील सुनावणीवेळी न्यायालयाच्या परिसरात विश्‍व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची मोठी उपस्थित बघायला मिळाली. विधीज्ञ अतुल आंधळे यांच्यासह अन्य दहा वकिलांनी आरोपींची बाजू मांडली.


गेल्या महिन्यात 28 मे रोजी जोर्वेनाका येथे जोर्वे गावातील आठ तरुणांना सुमारे दोनशेहून अधिक जणांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेने संगमनेरच्या सौहार्दाच्या वातावरणावर विरझन पडल्याने शहरासह संपूर्ण तालुक्यातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. त्यासोबतच देशातून दररोज समोर येणार्‍या विविध घटनांमधूनही हिंदू समजात रोष खद्खद्त असल्याने विविध हिंदुत्त्ववादी संघटनांनी ‘सकल हिंदू समाज’ या बॅनरखाली एकत्रित येवून मंगळवारी (ता.6) संगमनेरात ‘भगवा मोर्चा’ आयोजित केला होता. या मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद देतांना संगमनेर, अकोले, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर अशा अनेक तालुक्यांमधून हजारोंचा जनसागर उसळला होता.


सदरचा मोर्चा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने, पोलिसांनी ठरवून दिलेल्या निकषांचे पालन करीत वेळेत पूर्ण झाल्याचे समाधान व्यक्त होत असतांनाच शहरापासून अहमदनगरच्या दिशेने अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या समनापूरात त्याला गालबोट लागले. या घटनेत मोर्चा आटोपून घराकडे निघालेल्या जमावातील काहींनी समनापूरातील दुसर्‍या समाजाच्या काही घरांवर दगडफेक करुन वाहनांची तोडफोड केली. यावेळी जमावाने केलेल्या मारहाणीत हुसेन फकिरमोहंमद शेख (वय 75) व इस्माईल फकिरमोहंमद शेख (वय 60) या दोघांना गंभीर दुखापती झाल्या.


त्याच दिवशी रात्री पोलिसांनी रुग्णालयात जावून इस्माईल शेख यांचा जवाब नोंदविला व त्यावरुन शहर पोलीस ठाण्यात अज्ञात 20 ते 25 जणांवर दंगलीसह प्राणघातक शस्त्रांचा वापर करुन हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन सीसीटीव्ही फूटेज व उपलब्ध झालेले अन्य व्हिडिओ चित्रीकरण यातून सत्यम भाऊसाहेब थोरात (वय 23), सुनील बाबासाहेब थोरात (वय 23), ललित अनिल थोरात (वय 24), प्रमोद संजय थोरात (वय 21), दत्तात्रय संपत थोरात (वय 25), आबासाहेब शिवराम थोरात (वय 30, सहाही रा.वडगाव पान), अविराज आनंदा जोंधळे (वय 21), विकास अण्णासाहेब जोंधळे (वय 50), भाऊसाहेब यादव जोंधळे (वय 60, तिघेही रा.कोकणगाव), कुणाल ईश्‍वर काळे (वय 19), करण ज्ञानेश्‍वर काळे (वय 19, दोघेही रा.माळेगाव हवेली), वैभव रंगनाथ बिडवे (वय 29, रा.मनोली),


शुभम बाळासाहेब कडू (वय 23), उज्ज्व सोपान घोलप (वय 20), ऋषीकेश शरद घोलप (वय 24), तनोज शरद कडू (वय 24) व महेश विजय कडू (वय 33, पाचही रा.पाथरे, ता.राहाता) अशा सतरा जणांना कोम्बिंग ऑपरेशन राबवून मंगळवारी रात्री अटक करण्यात आली होती. बुधवारी (ता.7) त्या सर्वांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्याची मुदत आज संपल्याने त्या सर्वांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एस.एम.वाघमारे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते.


यावेळी आरोपींच्यावतीने युक्तिवाद करतांना विधीज्ञ अतुल आंधळे यांनी उत्साहाच्या भरात घडलेला प्रकार, सर्व आरोपींची स्वच्छ पार्श्‍वभूमी आणि त्यांचे भविष्य या मुद्द्यांवर जोरदार युक्तिवाद करीत त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यासह जामीनावर सुटका करण्याची मागणी केली. न्यायालयाने सरकारी पक्ष आणि बचावपक्ष अशा दोघांचा युक्तिवाद ऐकून अटकेत असलेल्या सर्व आरोपींना 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडण्याचे आदेश दिले. त्यासोबतच सुटकेपूर्वी सर्व आरोपींनी आपल्या नातेवाईकांचे संपर्क क्रमांक व पत्ता देण्यासह आरोपपत्र दाखल होईस्तोवर आठवड्यातील दर मंगळवारी त्यांना शहर पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याची अट घातली आहे. या सुनावणीच्या वेळी न्यायालयाच्या परिसरात आरोपींच्या नातेवाईकांसह विश्‍व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

Visits: 187 Today: 3 Total: 1098750

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *