नेवासा तालुक्यात ज्वारीवर लष्करी अळीचा हल्ला! शेतकर्‍यांची चिंता वाढली; कृषी विभागाकडून सूचना

नायक वृत्तसेवा, नेवासा
ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. या वातावरणामुळे ज्वारीवर काही प्रमाणात अमेरिकन लष्करी अळीने हल्ला केला आहे. जर असेच ढगाळ वातावरण आणखी काही दिवस राहिले तर गहू, हरभरा व कांदे पिकांवरही रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने बळीराजाची पुन्हा चिंता वाढली आहे.

अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेली खरिपातील पिके वाया गेली. यामुळे शेतकर्‍यांच्या हाती उत्पादन खर्चही पडला नाही. त्यामुळे अशा शेतकर्‍यांच्या नजरा रब्बीकडे लागल्या होत्या. दमदार पावसामुळे तालुक्यात मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदा शेतकर्‍यांनी रब्बीत गहू, हरभरा, ज्वारी पिकांवर भर दिला. तालुक्यात ज्वारीचे 2 हजार हेक्टर क्षेत्र आहे. सुरुवातीला पेरणी उरकलेल्या ज्वारीची वाढ चांगली झाली. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण असतानाच, काही दिवसांपासून पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. पिकांवर औषध फवारणी करण्याशिवाय शेतकर्‍यांपुढे दुसरा मार्ग नाही. परंतु, औषधांच्या किंमती शेतकर्‍यांच्या आवाक्याबाहेर आहेत. एकरी दीड हजारांचा खर्च येत असल्याने, उत्पादन हाती येण्यापूर्वीच शेतकर्‍यांचे अर्थकारण कोलमडले आहे.

कृषी सहाय्यकांच्या मदतीने तातडीने उपाययोजना सूचविल्या जात आहेत. कामगंध सापळ्यासह एकात्मिक कीड व्यवस्थापनसह क्लोरो अंट्रानिलीप्रोल 18.5 एस. सी. अथवा नोमुरिया रिलेयी 4 ग्रॅम प्रतिलिटर पाण्यातून मिसळून फवारणी केल्यास, या किडीचा प्रादुर्भाव रोखता येऊ शकतो. या अळीचा प्रसार रोखण्यासाठी नर पतंग पकडणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी फेरोमोन सापळे शेतात लावण्याचे आवाहन केले आहे.

अळीच्या डोक्यावर उलटा वाय आकारातील चिन्ह दिसते. शेवटच्या भागावर काळे चार ठिपके दिसतात. त्यावरुन ही अळी ओळखता येते. अळीची वाढ पूर्ण होण्यासाठी 15-16 दिवस लागतात. पूर्ण वाढलेली अळी कोषावस्थेत जमिनीत जाते. सात-आठ दिवसांतून त्यातून पतंग बाहेर पडतो. किडीचा जीवनक्रम 25-30 दिवसांत पूर्ण होतो. नर पतंग व मादीच्या मिलनातून पुन्हा अंडीपुंज तयार होऊन एका पुंजातून 7-8 अळी तयार होतात.
– दत्तात्रय डमाळे (तालुका कृषी अधिकारी, नेवासा)

Visits: 185 Today: 1 Total: 1870444

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *