‘त्या’ सतरा जणांची आज न्यायालयासमोर हजेरी पोलीस वाढीव कोठडीची मागणी करणार; निर्णयाकडे तालुक्याचे लक्ष

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरातील भगवा मोर्चा संपवून माघारी जाणार्या जमावातील काहींनी समनापूरातील दुसर्या समाजाच्या घरांवर दगडफेक करुन तिघांना जखमी केले होते. यावेळी जमावाने सदरील घरांच्या समोर लावलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांचेही नुकसान केले होते. याप्रकरणी जखमी इस्माईल शेख यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात 25 जणांविरोधात दंगलीसह प्राणघातक शस्त्राने हल्ला केल्यावरुन गुन्हा दाखल करीत 17 जणांना अटक केली होती. बुधवारी न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली त्याची मुदत आज संपली असून त्या सर्वांना दुपारनंतर न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. यावेळी पोलिसांकडून अधिकची कोठडी मागितली जाणार असल्याची माहिती मिळाली असून न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

गेल्या मंगळवारी (ता.6) शिवराज्याभिषेक दिनाचे निमित्त साधून संगमनेरातील विविध हिंदुत्त्ववादी संघटनांनी एकत्र येवून ‘सकल हिंदू मोर्चा’ आयोजित केला होता, या मोर्चाला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला. मोर्चासाठी केवळ संगमनेरच नव्हेतर अकोले, राहाता, कोपरगाव व शिर्डी येथूनही मोठ्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावल्याने संगमनेरच्या इतिहासात हा मोर्चा अभूतपूर्व ठरला होता. मोर्चाची परवानगी देताना पोलिसांनी आयोजकांना काही अटी व शर्थीही घालून दिल्या होत्या. त्याचे तंतोतंत पालन करतांना सदरचा मोर्चा अतिशय शांततेत आणि वेळेत पूर्ण झाला.

या मोर्चासाठी तालुक्याच्या सर्वभागातून मोठ्या संख्येने तरुण व नागरिक हजर होती. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास वडगावपान, कोकणगाव व राहाता तालुक्यातील पाथरे येथील तरुण आपापल्या दुचाकीवरुन माघारी जात असताना शांततामय मार्गाने समारोप झालेल्या मोर्चाला समनापूरात हिंसक वळण लागले. यावेळी मोर्चातील 20 ते 25 तरुणांनी रस्त्यालगत असलेल्या दोन-तीन घरांवर दगडफेक करीत वाहनांची तोडफोड केली होती. या हल्ल्यात हुसेन फकीरमोहंमद शेख (वय 75) व इस्माईल फकीरमोहंमद शेख (वय 60) या दोघांना गंभीर दुखापती झाल्या.

याप्रकरणी त्याच दिवशी रात्री पोलिसांनी अज्ञात 25 जणांवर गुन्हा दाखल करुन सीसीटीव्ही फूटेज आणि उपलब्ध झालेले अन्य व्हिडिओ चित्रीकरण यातून सत्यम भाऊसाहेब थोरात (वय 23), सुनील बाबासाहेब थोरात (वय 23), ललित अनिल थोरात (वय 24), प्रमोद संजय थोरात (वय 21), दत्तात्रय संपत थोरात (वय 25), आबासाहेब शिवराम थोरात (वय 30, सहाही रा.वडगाव पान), अविराज आनंदा जोंधळे (वय 21), विकास अण्णासाहेब जोंधळे (वय 50), भाऊसाहेब यादव जोंधळे (वय 60, तिघेही रा.कोकणगाव), कुणाल ईश्वर काळे (वय 19), करण ज्ञानेश्वर काळे (वय 19, दोघेही रा.माळेगाव हवेली), वैभव रंगनाथ बिडवे (वय 29, रा.मनोली), शुभम बाळासाहेब कडू (वय 23), उज्ज्वल सोपान घोलप (वय 20), ऋषीकेश शरद घोलप (वय 24), तनोज शरद कडू (वय 24) व महेश विजय कडू (वय 33, पाचही रा.पाथरे, ता.राहाता) अशा सतरा जणांना कोम्बिंग ऑपरेशन राबवून मंगळवारी रात्री अटक करण्यात आली होती. बुधवारी (ता.7) त्या सर्वांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्याची मुदत आज संपली असून दुपारी त्यांनी पुन्हा न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. यावेळी पोलिसांकडून त्यांच्या वाढीव कोठडीची मागणी केली जाणार असून त्यावर न्यायालय त्यांना पोलीस कोडीत पाठवते की न्यायालयीन कोठडीत याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष्य खिळले आहे.
