खासगी कार्यक्रमांच्या रंगतमध्ये उठताहेत ‘मर्चंट्स बँक’ प्रचाराच्या पंगती! लग्न सोहळे व खासगी कार्यक्रमांमध्ये इच्छुकांची हजेरी; सत्ताधार्यांकडून मात्र बिनविरोधचे प्रयत्न..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्याची अर्थवाहिनी समजल्या जाणार्या संगमनेर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे. या बँकेच्या संचालकपदी वर्णी लागावी यासाठी शहरातील व्यापारी नेहमीच उत्सुक असतात. यावेळीही उद्योगपती राजेश मालपाणी यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी एकता पॅनल निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्या विरोधात चौघे शड्डू ठोकण्याच्या तयारीत आहेत. वास्तविक कोणत्याही आर्थिक संस्थांमध्ये राजकारण नसावे असा बँकेचे संस्थापक दिवंगत उद्योगपती ओंकारनाथ मालपाणी यांचा दंडक होता. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये अनेकांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा वाढीस लागल्याने या संस्थेच्या संचालक पदासाठी निवडणुका होत आल्या आहेत. यंदाही निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी गटाकडून सर्व समावेशक पॅनल उभा केला जात असून, ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. पॅनलमध्ये आपला समावेश व्हावा यासाठी काहींनी सार्वजनिक व खासगी कार्यक्रमांमध्ये ‘हात’ जोडण्यास सुरुवात केली असून त्यातून आपले नाव चर्चेत आणण्याच्या कवायती सुरु झाल्या आहेत. त्यामुळे खासगी कार्यक्रमांच्या रंगतमध्ये मर्चंट्स बँकेच्या प्रचाराच्या पंगती उठत असल्याचे चित्रही सध्या दिसू लागले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात व्यापार्यांच्या नावाने स्थापन झालेली संगमनेर मर्चंट्स बँक ही पहिली सहकारी अर्थसंस्था आहे. दिवंगत उद्योगपती ओंकारनाथ मालपाणी यांनी आपल्या काही सहकार्यांसह 1966 साली या बँकेची स्थापना करुन संगमनेर तालुक्यातील व्यापार्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन देण्याचा दूरगामी प्रयत्न केला. त्यांचा हा प्रयोग लीलया यशस्वी झाला असून मर्चंट्स बँकेच्या माध्यमातून संगमनेर व अकोले तालुक्यातील शेकडो व्यापार्यांना आर्थिक बळ प्राप्त होऊन त्यांच्यासाठी प्रगतीची कवाडे उघडली गेली आहेत. या बँकेला अपवाद वगळता सुरुवातीपासूनच मालपाणी परिवाराचे नेतृत्व लाभल्याने संस्थेचा लौकिक केवळ अहमदनगरच नव्हे तर पुणे व नाशिक जिल्ह्यांमध्येही पसरला आहे. त्याचाच परिणाम या संस्थेच्या संचालकपदी आपली वर्णी लागावी यासाठी दर पंचवार्षिक निवडणुकांमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी दिसून येते.

कोविड संक्रमणाच्या कालावधीत विविध पंचवार्षिक निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र आता जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-19 हा आजार महामारीच्या यादीतून कमी केल्याने यापुढे निर्बंधांचा विषय संपुष्टात आला आहे. त्यामुळे देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह सहकारी व अन्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा हंगाम सुरू झाला असून संगमनेरची अर्थवाहिनी असलेल्या दि संगमनेर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची घोषणाही करण्यात आली आहे. त्यानुसार 10 ते 17 मे या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार असून 18 मे रोजी प्राप्त उमेदवारी अर्जांची छाननी व 19 मे रोजी उमेदवारांच्या नावाची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 2 जून पर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. उमेदवारांना 5 जून रोजी निशाणी वाटप केले जाणार असून 17 जून रोजी मतदान व 18 जून रोजी मतमोजणी असा निवडणूक कार्यक्रम सहकारी संस्थांच्या उपनिबंधकांकडून जाहीर करण्यात आला आहे.

संगमनेर मर्चंट बँकेच्या संचालकपदी निवड होणं अतिशय प्रतिष्ठेचं मानलं जातं. त्यामुळे सत्ताधारी गटाच्या माध्यमातून बँकेच्या संचालकपदावर वर्णी लागावी यासाठी इच्छुकांची मोठी संख्या असते. सत्ताधारी गटाकडूनही संस्थापकांच्या आर्थिक संस्थांमध्ये राजकारण नको या धोरणाची परंपरा पुढे नेण्यासाठी प्रत्येक पंचवार्षिकला काही नवीन सदस्यांना संधी दिली जाते. त्यातून बँकेच्या संचालक पदासाठी होणार्या निवडणुका टाळल्या जाव्यात व संस्थेवर पडणारा आर्थिक भार सत्कारणी लागावा असा हेतू असतो. मात्र राजकीय महत्त्वकांक्षांच्या समोर तत्त्वांची किंमत शून्य होत असल्याने दोघा तिघांसाठी यापूर्वीही निवडणुका झाल्याची उदाहरणे आहेत. यावर्षीही होत असलेल्या निवडणुकांमध्ये तसेच चित्र निर्माण झाले असून चौघांनी आमचा समावेश ‘पॅनल’मध्ये करा किंवा निवडणुकीला सामोरे जा अशी भूमिका घेतल्याचेही शहरात बोलले जात आहे.

एकाचवेळी इतक्या मोठ्या संख्येने इच्छुकांचा समावेश करणे सत्ताधार्यांनाही अवघड आहे. तसेच इच्छुकांपैकी बहुतेकांनी यापूर्वीही बँकेचे संचालक म्हणून काम केले आहे. उमेदवारी दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक असताना आज दुपारपर्यंत जुगलकिशोर जगदीश बाहेती या एकमेव अर्जाशिवाय सत्ताधारी गटाकडून अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. अनेक इच्छुक अजूनही आशावादी आहेत. मंगळवारपर्यंत व्यापारी एकता पॅनलमधील बहुतेकांचे अर्ज दाखल होणार असून त्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होईल. शहरातील लग्न सोहळे, विविध धार्मिक व अन्य कार्यक्रम आणि रविवारी सकाळी गंगामाई घाट परिसरात झालेली भजे पार्टी या सगळ्या कार्यक्रमांमध्ये अधिकृत व इच्छुकांची हात जोडून उपस्थिती खासगी कार्यक्रमांच्या रंगतमध्ये आपल्या प्रचाराच्या पंगती उठवत असल्याचे चित्र मात्र संगमनेरकरांना चर्चेचे कारण ठरले आहे.

