पन्हाळा – पावनखिंडची प्रेरणादायी मोहीम यशस्वी शिवराष्ट्र हायकर्स महाराष्ट्राचे आयोजन; साठ धारकर्‍यांचा सहभाग

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शिवराष्ट्र हायकर्स महाराष्ट्र आयोजित ‘पन्हाळा- पावनखिंड’ मोहिमेत यावर्षी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले, श्रीरामपूर, कोपरगाव आणि राहता तालुक्यातून सुमारे साठ धारकर्‍यांनी आणि रणरागिणींनी भर पावसात सहभाग घेऊन ही पावसाळी मोहीम अतिशय प्रतिकूल परिस्थितीत यशस्वीपणे पूर्ण केली आहे. 12 आणि 13 जुलै हे दोन दिवस वीर शिवा काशिद आणि वीर बाजीप्रभू देशपांडे यांचा स्मृती दिन असतो. तसेच त्यांच्या समवेत असलेले अनेक शूर मावळे यांच्या पावनखिंडीत झालेल्या पवित्र हौतात्म्याचे पुण्यस्मरण करण्याचा दिवस आहे. त्यानिमित्त पन्हाळा आणि पावनखिंडीतील या धारातीर्थावर जाऊन शौर्यपूजन करण्यासाठी कोरोना आपत्तीनंतर प्रथमच या मोहिमेचे राज्यस्तरावर आयोजन करण्यात आले होते.

कोल्हापूर जिल्हा गेल्या काही वर्षांपासून पूरग्रस्त जिल्हा म्हणून गणला जात असताना सुद्धा अतिशय प्रतिकूल परिस्थितीत महाराष्ट्रातून सुमारे पाचशे धारकरी संततधार पडत्या पावसात रेनकोट घालून सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज इ. स. 1660 मध्ये याच काळात ज्या मार्गाने पन्हाळगडावरून निसटून विशाळगडाकडे गेले होते. अगदी त्याच मार्गाने ही धारकर्‍यांची वारी तीन दिवसांत सुमारे साठ किलोमीटरचे अंतर पार करत पावनखिंडीपर्यंत जात असते. अगदी तोच कालखंड, तसाच पाऊस, तीच शिवभक्ती आणि तोच थरार अनुभवत यावर्षीची ही मोहीम यशस्वीपणे पार पडली.

या मोहिमेची सांगता पावनखिंडीत धारातीर्थ पूजनाने करण्यात आली. याप्रसंगी रायाजी बंदलांचे वंशज अभिनेते अनिकेत बांदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सचिव मंगेश चिवटे, डॉ. महादेव अरगडे, प्रा. किसन दिघे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मोहिमेची पार्श्वभूमी आणि शिव इतिहास यावर युवा शिवव्याख्याते भूपाल शेळके आणि शिव चरित्राचे अभ्यासक प्रा. दीपक कर्पे यांची व्याख्याने झाली. शिवराष्ट्रचे अध्यक्ष आणि दुर्ग अभ्यासक प्रशांत साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. तर शिवराष्ट्रचे अहमदनगर जिल्हाप्रमुख संतोष शेळके, बीड जिल्हाप्रमुख विजयसिंह सोळंकी, संभाजीनगर प्रमुख अमित सोळंकी यांचा स्मृतिचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला. या मोहिमेत प्राचार्य बाबासाहेब देशमुख, अ‍ॅड. किसन हांडे, दिलीप मोरे, किसन आहेर, डॉ. नवनीत जोशी, सुखदेव इल्हे आदी ज्येष्ठांनी सपत्नीक सहभाग घेतला. तसेच ज्ञानदेव कोकणे, अनिल कडलग, नंदकिशोर राहणे, संदीप शिंदे, डॉ. विखे आदिंनी स्थानिक आदिवासींच्या मुलाखती घेऊन इतिहासाच्या स्मृती जागवल्या.

Visits: 3 Today: 1 Total: 27385

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *