यंदा काजवा महोत्सवासाठी पर्यटकांची तोबा गर्दी होणार वन विभागासह राजूर पोलिसांचा राहणार कडक पहारा


नायक वृत्तसेवा, अकोले
अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या परिसरातील कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात काजवा महोत्सवास यावर्षी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असून अनेकांनी अगोदरच बुकींग केले आहे.

अकोले तालुक्यातील पश्चिमेला असणार्‍या सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात पावसाळ्याच्या अगोदर काजव्यांची चमचम सुरु होत असते. ही चमचम म्हणजे पावसाची चाहुल असते. हिरडा, बेहडा, सादडा यासारख्या झाडांवर स्वयंप्रकाशित काजवे एकाच वेळेस लयपद्ध पद्धतीने चमकत असतात. हा काजव्यांचा चमत्कार बघण्यासाठी दरवर्षी 25 मे ते 15 जूनपर्यंत हजारो पर्यटक भंडारदर्‍यात हजेरी लावत असतात. याही वर्षी काजव्यांची चमचम वेळेवर सुरु होण्याची शक्यता असून अनेक पर्यटकांनी काजव्यांचा करिष्मा व्यवस्थित बघता यावा म्हणून टेंटधारक व हॉटेलमध्ये डव्हान्स बुकींग केले आहे. काही ऑर्गनायझर्सनी काजवा महोत्सवामध्ये वेगवेगळे इव्हेंट आयोजित केले आहेत. अनेक आयोजकांनी पर्यटकांना काजवा महोत्सवात आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. काजवा महोत्सवासाठी होणारी गर्दी लक्षात घेता वन विभागाकडून जोरदार तयारी सुरु असून पर्यटकांना काजव्यांचा आनंद घेता यावा म्हणून अभयारण्यातील प्रत्येक गावातील सदस्यांची आढावा बैठकही घेण्यात येणार आहे.

भंडारदरा धरण परिसरातील हॉटेल व्यावसायिक, सुशिक्षीत बेरोजगार तरुण, गाईड व महाराष्ट्र पर्यटन निवास यांनीही पर्यटकांना काजवा महोत्सवात आकर्षित करण्यासाठी विशेष सवलती दिल्या आहेत. मागील दोन तीन वर्षांपूर्वी कोरोनामुळे काजवा महोत्सवावर विपरीत परिणाम होऊन आदिवासी युवकांचा रोजगार थांबला गेला होता; मात्र गतवर्षापासून पुन्हा काजवा महोत्सव जोमाने सुरु झाला आहे. यावर्षी भंडारदर्‍याचा काजवा महोत्सव हाऊसफुल होणार आहे.

यंदा काजवा महोत्सवासाठी तोबा गर्दी होणार असल्याने रात्री साडेनऊ नंतर अभयारण्य क्षेत्रात प्रवेश दिला जाणार नसून दहानंतर पर्यटकांना अभयारण्य परिसरात फिरता येणार नाही. तर ठिकठिकाणी पर्यटक व त्यांच्या वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे.
– गणेश रणदिवे (सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी)

पर्यटकांनी काजवा महोत्सवाचा मनमुराद आस्वाद घ्यावा. परंतु, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहकार्य करावे. अन्यथा कारवाई करण्यात येईल.
– गणेश इंगळे (सहायक पोलीस निरीक्षक-राजूर)

Visits: 358 Today: 1 Total: 1416722

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *